Friday, 23 December 2022

राज्यातून गोवरचे समूळ उच्चाटन करणार

 राज्यातून गोवरचे समूळ उच्चाटन करणार

 - मंत्री डॉ.तानाजी सावंत


            नागपूर, दि. 22 : राज्यातील 142 ठिकाणी तसेच शहरी भागात गोवर आजाराचा उद्रेक झाला आहे. ठाणे, भिवंडी, मालेगाव, वसई विरार अशा विविध ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी कृती दलाची (टास्क फोर्स) निर्मिती केली आहे. या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागाने लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत गोवर आजाराची रुग्ण संख्या 100 टक्के आटोक्यात आणू, असे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.


            राज्यात साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सदस्य रमेश कोरगावकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री डॉ. सावंत बोलत होते.


            मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, आरोग्य विभाग धोरणात्मक निर्णय घेऊन गतीने काम करत आहे. संबंधित योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन त्या विभागातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येईल. या समितीच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे आरोग्य कसे सुधारेल, याबाबत उपाययोजनांसाठी महिनाभरात धोरण आणण्यात येईल.


            या चर्चेत सदस्य सर्वश्री योगेश सागर, अबू आझमी, ॲड. आशिष शेलार, यामिनी जाधव, रइस शेख यांनी सहभाग घेतला होता.


००००


 


आरोग्य विभागात भरती प्रक्रिया


            आरोग्य विभागात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही.


 बालकांच्या लसीकरणावर कृती दलाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. या पथकाला गोवरचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे निर्दशनास येत आहे. तसेच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे.


उंदीर मारण्यासाठी केलेल्या खर्चाची चौकशी


            मुंबई महानगरपालिकेने उंदीर मारण्यासाठी केलेल्या खर्चाची बाब गंभीर असून याबाबत समिती नेमून चौकशी केली जाईल, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.


0000



 




कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही

 कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही

- सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

            नागपूर, दि. २२ : जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केले.


            मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या संसर्गाची तीव्रता ओमीक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तसेच कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यात येईल. आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.


            राज्यात आतापर्यंत 95 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच येत्या सोमवारपासून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना नुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची ताप चाचणी करण्यात येईल.


०००००


गोपाळ साळुंखे/स.सं.



 


वृत्त क्र. ६६


 



जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फेशनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन.

 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फेशनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन.

            मुंबई, दि. 22 : रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर यांच्यावतीने शनिवार दि. 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 ते सायं.5.00 या वेळेत महानगर पालिका शाळा, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी नाका, वरळी-18 येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा" आयोजित करण्यात आला आहे.


            यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


            या महारोजगार मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती इम्पेरेटीव्ह, हिंदू रोजगार, एअरटेल इ. उद्योजक सहभागी होणार असून दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक व इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एच आर, अॅप्रेंटीसशीप, डोमॉस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ॲण्ड एन्टरटेंमेंट अशा प्रकारे विविध क्षेत्रातील पदे उपलब्ध असणार आहेत.


            या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय उपलबध करून देणारे विविध शासकिय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इ. ची माहिती पुरविणारी दालने लावण्यात येणार असून याव्दारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही यामध्ये समावेश असणार आहे.


            मुंबई शहर येथील बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयाचे सहायक आयुक्त रविंद्र सुरवसे यांनी केले आहे.



राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा


राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

कोविड परिस्थिती नियंत्रणात ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये

जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची पालकमंत्र्यांनी दक्षता घ्यावी


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.

            नागपूर, दि. २२ : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन, पंचसूत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.


            मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.


            राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रूग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला.


            आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


            चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


००००

वाढवण बंदराचा विकास करताना स्थानिकांचे सर्व प्रश्न चर्चेतून सोडविणार

 वाढवण बंदराचा विकास करताना स्थानिकांचे सर्व प्रश्न चर्चेतून सोडविणार

                                        - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            नागपूर, दि. २२ : वाढवण बंदर हे राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. या बंदराचा विकास करतांना स्थानिक मच्छिमार, शेतकरी यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक तो निधी व यंत्रणा उपलब्ध करुन देण्याबरोबरच स्थानिकांचे सर्व प्रश्न चर्चेतून सोडविणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले.


            वाढवण (जि. पालघर) बंदरात स्थानिक शेतकरी व मच्छिमारांचा विरोध होत असल्याबाबत सदस्य कपिल पाटील, सचिन अहिर, विलास पोतनीस आणि सुनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. फडणवीस बोलत होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, म्हणून जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणामार्फत वाढवण बंदर हे मोठे बंदर म्हणून विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पर्यावरण अभ्यास, मासेमारीवरील परिणाम आदी संदर्भात जेएपीएमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण यांचा निर्णय लक्षात घेऊन बंदर प्रकल्पाबाबत योग्य तो निर्णय घेण्याची बाब केंद्र शासनाच्या अखत्यारित आहे. मासेमारी करण्याकरीता अत्याधुनिक फिशिंग हार्बर तयार करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. याव्यतिरिक्त मच्छिमारांसाठी विशेष योजना राबविण्यात येतील. या योजनांच्या माध्यमातून मच्छिमारांना अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच मासेमारी वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी सदस्य सर्वश्री जयंत पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.


000



Thursday, 22 December 2022

मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले

 मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली.

            नागपूर, दि. 22 : पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मुक्ताताई या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. सुमारे 30 वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली होती. विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले. अलिकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी आजारपणातही मतदानात सहभाग नोंदवून लोकशाहीवरील आपली निष्ठा तसेच पक्षाचा उमेदवार जिंकलाच पाहिजे, यासाठी पक्षनिष्ठा दाखवून दिली होती. मी त्यांना या आजारपणात न येण्याची विनंती करून सुद्धा त्या दोन्ही निवडणुकीत रुग्णालयातून मतदानाला आल्या होत्या. पुण्यात विविध सामाजिक कामे करताना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याला त्यांचे प्राधान्य होते. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

मिशन वात्सल्य योजनेंतर्गत बालसंगोपन अनुदानात वाढ करणार

 मिशन वात्सल्य योजनेंतर्गत बालसंगोपन अनुदानात वाढ करणार 


- मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा.

            नागपूर, दि. २२ : राज्यात कोरोना कालावधित विधवा झालेल्या महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांसाठीच्या बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानामध्ये २ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असून येत्या तीन महिन्यांत सदरहू रक्कम वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली.


            राज्यात मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत अनुदानात वाढ तसेच पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना अंमलात आणण्याबाबत सदस्य ॲड.आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री. लोढा बोलत होते.


            मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कोरोना संसर्गाने कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने विधवा महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांच्या संगोपनासाठी मिशन वात्सल्य योजना सुरु करण्यात येणार आहे. बालसंगोपन आणि महिलांच्या रोजगारासाठी पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना अंमलात आणून या योजनेअंतर्गत मिळणारे सहायक अनुदान १ हजार १०० रुपयांवरून २ हजार ५०० करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. त्यानुसार ही योजना अंमलात आणण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.  


            बालसंगोपन योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाबाबत वाढ करण्याच्या अनुषंगाने सर्व विभागांची सहमती मिळाली आहे. या योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विभागाच्यावतीने राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये या योजनेबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधवा महिलांचे बचत गट बनवून या गटांना १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार असून त्याचे व्याज शासनाच्या माध्यमातून अदा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.


            सध्या राज्यात कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यांचे आई-वडील मृत्यू पावले आहेत, अशी एकूण 847 प्रकरणे आहेत. तसेच माता किंवा पिता यांच्यापैकी एक मृत्यू पावले आहे अशी एकूण 23 हजार 533 प्रकरणे आहेत. एकूण 24 हजार 380 पैकी 1100 रुपये प्रमाणे 19 हजार प्रकरणात लाभ देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे लवकरच निकाली काढण्यात येतील. कोरोनात ज्यांनी माता किंवा पिता गमावले आहेत त्यांच्यासाठी बचत गट स्थापन करण्यात येणार आहेत. कोरोना काळात ज्याचे माता किंवा पिता यापैकी कोणी मृत्यू पावला असेल अशा परिवारातील ज्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे. त्यांच्या वरील व्याज कमी करण्याबाबत बँकेशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            या चर्चेत सदस्य सर्वश्री संजय गायकवाड, मोहन मते, राम सातपुते यांनी सहभाग घेतला.


0

Featured post

Lakshvedhi