Wednesday, 21 December 2022

शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी

 शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठीराज्यात प्रभावी उपाययोजना


- उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस.

            नागपूर, दि. 21 : शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रिकरण यांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टीकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार/ हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.


            मुंबईतील माटुंगा येथील महानगरपालिकेच्या शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत सदस्य उमा खापरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, “माटुंगा येथील घटना चिंताजनक आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. अशा विकृतींना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सायबर गुन्ह्यांबाबत संबंधित प्राप्त तक्रारीची तांत्रिक तपासणी करण्यासाठी राज्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांमध्ये अश्लील चित्रिकरणाच्या प्रभावामुळे विकृती वाढतेय. ही चिंताजनक बाब आहे. लैंगिक अत्याचारासंबंधी व्हिडिओ व अन्य मजकूर याबाबतची माहिती मिळाल्यावर समाजमाध्यम व वेबसाईटवरून हटवण्यासंबंधी त्वरित कारवाई करण्यात येत आहे.तसेच राज्यामध्ये इंटरनेटवरील अशाप्रकारच्या मजकुरावर आणि वेबसाईटवर प्रतिबंध घालण्याचे काम सुरु आहे. राज्यातील सायबर गुन्ह्यांबाबत सायबर इंटेलिजन्स युनिट प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे. यामाध्यमातून सायबर गुन्हेगारीवर वचक ठेवता येईल’’, असे श्री.फडणवीस यांनी उत्तरात सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, “राज्यातील काही मोठ्या शाळा, महाविद्यालयामध्ये सीसीटिव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, काही साधारण शाळा, महाविद्यालयांमध्ये सीसीटिव्ही बसविण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी टप्प्याटप्प्याने सीसीटिव्ही बसविण्यासंदर्भात सूचना देण्यात येतील. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासंदर्भात चांगला, वाईट स्पर्श (good touch-bad touch) बाबत मार्गदर्शनपर प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शाळा, महाविद्यालय परिसरातील कॅफेटेरिया व अन्य सुविधा यांचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आणि गृह विभागाच्या सचिवांची समिती नेमून एक स्वतंत्र धोरण ठरविण्यात येईल”, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.


            “राज्यात किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्यासाठी ‘पोलीस दिदी’ यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.पोलीस दिदींची संख्या वाढविण्यात येत आहे. यात खासगी स्वयंसंस्थांचाही सहभाग घेत आहोत. शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून शाळा प्रशासनास यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि गृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी बृहत कार्यक्रम हाती घेण्यात येईल”, असे श्री. फडणवीस म्हणाले.


            शाळेच्या वाहनांवरील वाहनचालकांच्या नियुक्ती/ कामाबाबत लेखापरीक्षण (ऑडिट) करणे गरजेचे आहे. यासंदर्भात कायदे, नियम आणि संहिता आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री यांनी दिली.


            या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.


००००




 



शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार!

 शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार!


आ. भातखळकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची सकारात्मक दाद


मुंबई, दि. 20 डिसेंबर (प्रतिनिधी)


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (शताब्दी) रुग्णालायात सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची गैरसोय होत असून यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी तारांकित प्रश्नाद्वारे केली. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भात बैठक घेऊन मुंबईकरांच्या आरोग्यासाठी जे-जे करावे लागेल ते सर्व पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.


उपनगरातील अत्यंत महत्वाचे असलेल्या या रुग्णालयात अतिरिक्त शास्त्रक्रिया विभाग सुरु करावा, पदभरती करावी, औषधे उपलब्ध करून द्यावीत यासह विविध मागण्या आमदार भातखळकर यांनी केल्या. सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे सामान्य रुग्णाला केईएम, सायन रुग्णालयात जावे लागते. यावरील उपाययोजनांसाठी कालबद्ध धोरण ठरवण्यासाठी बैठक घ्यावी, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी केली.


या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार भातखळकर यांनी उपस्थित केलेला रुग्णालयाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता कार्यवाही करू. मुंबईकरांचे आरोग्य उत्तम कसे राहील हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे. यापूर्वीच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशी अवस्था निर्माण झाली आहे. लवकरच यासंदर्भात आमदार, संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्यासाठी जे-जे म्हणून करावे लागेल ते सर्व करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा निकाल जाहीर

 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा निकाल जाहीर

रत्नागिरीचे पालघरवाडी मंडळ, कोल्हापूरचे दिपक हजारे प्रथम


मुंबई, दि, २० : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा - सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी जाहीर केला आहे.


३१ ऑगस्ट २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत आयोजित स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण ४७९ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांपैकी घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत ३७९, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १०० या गटात स्पर्धक सहभागी झाले. घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत दीपक हजारे (कोल्हापूर) यांना प्रथम पारितोषिक, राजेश परदेशी (अहमदनगर) यांना द्वितीय पारितोषिक, कोमल अग्रवाल (औरंगाबाद) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गटात पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रत्नागिरी) या मंडळाला प्रथम पारितोषिक, शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ (नाशिक) या मंडळाला द्वितीय पारितोषिक, तर श्री आवडता गणेश मंडळ (नांदेड) या मंडळाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 


तसेच, घरगुती गणेशोत्सव सजावट आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या दोन्ही स्पर्धांना मिळून एकूण वीस उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :


१. घरगुती गणेशोत्सव सजावट गट: १. प्रिती पवार (नाशिक), २. प्राची पाटील (कोल्हापूर), ३. अदिरा इंगळे (पुणे), ४. नितीन पाटील (नाशिक), ५. ललिता कोठावदे (नाशिक), ६. स्वप्निल मुळे (पुणे),७. पराग अत्तरदे (जळगाव), ८. रमेश सूर्यवंशी (लातूर), ९. सुनिल करंबेळे (रत्नागिरी) आणि १०. स्नेहल खराळकर (पुणे).


२. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गट : १. प. पू गगनगिरी महाविद्यालय सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ (अहमदनगर), २. हाय कमांडो फ्रेंड्स सर्कल मंडळ (कोल्हापूर) ३. राजे शिवाजी विद्यालय गणेश मंडळ (नंदुरबार), ४. गणराज तरुण मंडळ (अहमदनगर) ५. विजय बाल उत्सव गणेश मंडळ (नागपूर), ६. श्री अष्टविनायक मित्र मंडळ (पुणे), ७. भारत क्रिडा मंडळ (नागपूर), ८. शंकरपुरा पेठ सांस्कृतिक विकास मंडळ (पुणे) ९. सुवर्णयुग तरुण मंडळ (अहमदनगर) आणि १०. श्री.कृष्ण गणेश मित्र मंडळ (अहमदनगर)


घरगुती गणेशोत्सव सजावट गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार रुपये, ७ हजार रुपये आणि ५ हजार रुपये ; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.


सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजार रुपये, २१ हजार रुपये आणि ११ हजार रुपये; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.


या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम चित्रपट अभ्यासक संतोष पाठारे आणि कलावंत विकी शिंदे यांनी पाहिले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी दिली.


0000

कर्मसु कौशल्ययोगःम्.....*

 *अलौकिक.....*


*तिर्थयात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन ट्रेन निघाली होती.काही अंतर कापल्यावर यात्रेकरू सैलावले.गप्पा सुरु झाल्या.बहुतेकांनी साठी ओलांडली होती.विषय पुण्यसंचयाचा निघाला.*


अत्यन्त उंची कपडे घातलेला गृहस्थ खिडकीजवळ बसला होता.बाहेर दिसणाऱ्या समुद्राकडे बोट दाखवून तो म्हणाला,

*"तो समुद्र पाहिलात ? माझे पुण्य त्याच्याएव्हढे आहे. आम्ही जमीनदार! आमच्या वाड्यावरून कोणीच रिकाम्या हाताने परत गेला नाही.सगळा गाव आम्हाला दानवीर म्हणून ओळखतो.दान हीच आमच्या घराण्याची ओळख आहे."*


त्याच्या समोर साध्या कपड्यातील दुसरा गृहस्थ बसला होता. जमीनदाराने त्याला विचारले.... *"तुम्ही काय करता ?"*


*"मी शिक्षक होतो. निवृत्त झालो..."*


*"शिक्षक ...जमीनदाराच्या शब्दात उपहास होता.म्हणजे सहा तास काम करायचे आणि महिन्याला पगार मोजून घ्यायचा.तुम्हाला कुठे दानधर्म करायला जमणार ? हो ना !"*


शिक्षक हसला,म्हणाला...

*"हो, खरं आहे.."*


गप्पा ऐन भरात होत्या.बरेच अंतर पार झाले होते.तेवढ्यात ट्रेन अचानक थांबली. २० किलोमीटर पुढे असलेल्या गावात तुफान दंगल सुरू होती. रेल्वेचे रूळ उखडण्याचा प्रयत्न झाला. त्यादिवशी तरी ट्रेन पुढे सरकणार नाही अशी माहिती गार्डने दिली.


त्या कमालीच्या छोट्या गावात राहायचे कुठे... ना लॉज ना धर्मशाळा.जमीनदार साहेब त्रागा करू लागले.स्टेशनमास्तर मात्र भला माणूस होता.त्याने वेटिंग रूम,ओळखीची घरे अशा जागी यात्रेकरूची सोय करून दिली.


*शिक्षकाचा चेहरा पाहून तो त्यांच्या पायावर कोसळलाच..*


*"सर,ओळखलं मला ? मी मुकुंद देशमुख.वडील वारल्यानंतर शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. तुम्ही दहावीची परीक्षा फी भरली म्हणून पुढे शिकलो. स्टेशनमास्तर झालो."* 


शिक्षकाचे डोळे भरून आले. त्यांची बॅग हातात घेऊन मुकुंद घरी घेऊन जात होता.त्यांनी मुकुंदला थांबवले... *"एका मिनिटात आलोच !"*


*अस्वस्थपणे उभ्या असलेल्या जमीनदाराला ते म्हणाले,*


*"साहेब,माझे पुण्य समुद्रएव्हढे निश्चितच नाही.मी दानधर्मही केला नाही.मी जे केले त्याला कर्तव्य म्हणतात.ज्या कामासाठी पगार घेतला,ते काम पूर्ण निष्ठेने केले.या मुकुंदासारखे शिष्य त्या कर्तव्यनिष्ठेची फळे आहेत.हे विद्यार्थी असे पायावर वाकले ना,की मग तिर्थयात्रेचे पुण्य आमच्या खात्यावर जमा होत असते."*


*"आता माझ्यासोबत येता की थांबताय ?"*


*जमीनदार खालमानेने त्यांच्यामागून निघाला..*


* कर्मसु कौशल्ययोगःम्.....*


*लेखक: अज्ञात...*

🙏🙏🙏🙏🙏

अंधेरी येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन.

 अंधेरी येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन


          मुंबई, दि. 20 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांचे विद्यमाने दिनांक २४ डिसेंबर, २०२२ रोजी नित्यानंद शाळा, गरवारे कंपनीसमोर, सहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००६९ येथे सकाळी १०.०० ते संध्या. ४.०० या वेळेत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

          मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय/पदवीधर उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी वरील नमुद पत्यावर उपस्थित रहावे. असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांचे वतीने करण्यात येत आहे.

कोकण विभागातील जिल्ह्यात जैवविविधता प्रकल्पांचे नियोजन करावे..

 कोकण विभागातील जिल्ह्यात जैवविविधता प्रकल्पांचे नियोजन करावे.

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या सूचना.

          मुंबई, दि, 20 : कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील जैवविविधता वाढीस लागण्यासाठी प्रकल्प हाती घ्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त कोकण महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या


          मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोकण विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्या बैठकीत श्री.कल्याणकर यांनी सूचना दिल्या. या बैठकीस उपआयुक्त (नियोजन) संजय पाटील, उपआयुक्त (महसूल) मकरंद देशमुख, निवासी उप जिल्हाधिकारी मुंबई उपनगर विकास गजरे, विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांचे जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.


          श्री. कल्याणकर म्हणाले, विविध योजनांखाली प्राप्त तरतुदींचे सुयोग्य विनियोग होण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व अधिक सोयीसुविधा पुरविण्याबाबत काम करावे. सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विकास क्षेत्र निहाय सुक्षम नियोजन करावे. शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी स्वतंत्र चिन्हांकित निधीचा कल्पकतेने वापर करावा. यामध्ये जिल्ह्यातील जैवविविधता वाढीस लागण्यासाठी प्रकल्प हाती घ्यावे. कोकण विभागातील महसूल यंत्रणा बळकट करण्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा तसेच क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यकतेप्रमाणे वाहने पुरविण्यासाठी कार्यवाही करावी.


000


     

सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो.

 सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो

हे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे प्रतीक

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत विधानभवन येथे ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गाचा प्रारंभ


            नागपूर, दि. २० : विधिमंडळात विविध संसदीय आयुधांचा वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जातात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला समर्पक राज्यघटना दिली आहे. या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार चालतो. आपली लोकशाही जगात आदर्शवत मानली जाते. देशातील अगदी सर्वसामान्य माणूससुद्धा सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, हे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे प्रतीक आहे, तसेच आपल्या लोकशाहीचे हे खूप सुंदर रुप आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            राज्यातील विविध विद्यापीठांच्या राज्यशास्र व लोकप्रशासन विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेमार्फत ‘संसदीय कार्यप्रणाली व प्रथा’ या विषयावर आयोजित ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे आज विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे खजिनदार ॲड. आशिष शेलार, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत व इतर मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राष्ट्रकुल संसदीय मंडळाची परंपरा आणि त्यांचा इतिहास मोठा आहे. या मंडळामार्फत राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अभ्यासवर्गाचा उपक्रम चांगला आहे. या अभ्यासक्रमात सहभागी झालेले अनेक विद्यार्थी पुढे विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदावर विराजमान झाले. या अभ्यासवर्गाचे विद्यार्थी राहिलेले विधीमंडळ सदस्य दिलीप वळसे- पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळविले. आता या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करुन भविष्यात विविध क्षेत्रात यश मिळवावे, यासाठी हा अभ्यासवर्ग निश्चितच उपयोगी ठरेल. संसदीय लोकशाही अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने असे अभ्यासवर्ग निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.


            मुख्यमंत्री म्हणाले की, विधिमंडळ हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. विधिमंडळात विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडली जाते. विधीमंडळातील कायदे हे सर्वसामान्यांच्या हिताचे असतात. आपल्या लोकशाहीने सर्वसामान्यांचे हीत समोर ठेवून केलेली संसदीय रचना ही जगात आदर्शवत आहे.


मेस्सीसारखे खेळाडू एका दिवसात घडत नाहीत


            नुकत्याच झालेल्या फुटबॉल विश्वचषक सामन्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अर्जेंटिना देश फुटबॉल विश्वचषकामध्ये जगज्जेता ठरला. या संघाच्या लियोनेल मेस्सीने खूप कमालीची कामगिरी केली. मेस्सी आता तरुणाईचा आदर्श झाला आहे. पण मेस्सीसारखे खेळाडू एका दिवसात तयार होत नाहीत. खूप जिद्द आणि चिकाटीने ते मेहनत करतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेणेही महत्वाचे ठरते. आजच्या तरुणांनीही अशाच पद्धतीने आदर्श ठेवून विविध क्षेत्रात आपले योगदान द्यावे, यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.      


संवाद, चर्चा, वादविवाद हे लोकशाहीचे वैशिष्ट्य – अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर


            विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, संवाद, चर्चा, वादविवाद हे आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य असले तरी सर्वांच्या एकत्रित सहभागातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय विधिमंडळात होतात. भूमिकेवर ठाम राहून सर्व पक्षाचे सदस्य विधिमंडळात जनहितासाठी काम करीत असतात. आपल्या संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्ष जितका महत्वाचा तितकाच विरोधी पक्षही महत्वाचा आहे. महाराष्ट्राचे विधिमंडळ हे देशातील प्रमुख कायदेमंडळ म्हणून नावाजले जाते. आपल्या विधिमंडळाला मोठा इतिहास असून आपली संसदीय लोकशाही आदर्शवत आहे, असे ते म्हणाले.


            श्री. नार्वेकर म्हणाले की, संसदीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत राबविण्यात येत असलेला अभ्यासवर्गाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ज्याप्रमाणे शास्त्र शाखेचे विद्यार्थी प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक करतात तशाच प्रकारे राज्यशास्त्र आणि लोकप्रशासनच्या विद्यार्थ्यांना विधिमंडळ कामकाजाचे प्रात्यक्षिक करण्याची संधी या अभ्यासवर्गातून मिळते. हा अभ्यासवर्ग म्हणजे एक प्रकारे संसदीय लोकशाही प्रणालीची प्रयोगशाळाच आहे. सक्षम आणि ध्येयवादी नागरिक घडविण्यासाठी याचा उपयोग होईल. या अभ्यासवर्गाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.       


विधिमंडळ, संसद ही सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षांची प्रतिबिंबे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकशाहीची रचना फार सुंदर केली आहे. विधिमंडळे किंवा संसद सभागृहे ही सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षांची प्रतिबिंबे आहेत. लोकशाहीतील सर्व संस्थांचा एकमेकांवर अंकुश आहे. चेक अँड बॅलन्स पद्धती असलेली आपली लोकशाही जगातील आदर्श लोकशाही आहे. कार्यकारी मंडळावर विधिमंडळाचा अंकुश असतो. विधिमंडळ कामकाजात सरकारला विरोधी पक्षासह सत्तारूढ पक्षातील सदस्यही प्रश्न विचारतात. एक प्रकारे आपल्या संविधानाने सरकारला विधिमंडळासाठी उत्तरदायी ठरविले आहे, असे ते म्हणाले.


            विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय सरकारला एक पैसाही खर्च करता येत नाही. लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न अशा विविध संसदीय आयुधांचा वापर करून विधिमंडळाचे सदस्य सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतात. लोकशाहीच्या आणि विधिमंडळाच्या अशा रचनेमुळे शेवटच्या माणसाचे प्रश्नही या सभागृहापर्यंत पोहोचतात. कामकाज करताना सभागृहात अनेक वेळा गोंधळ होत असला तरी नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ कामकाज केले जाते. कधी कधी रात्री बारा वाजेपर्यंत कामकाज करून दुसऱ्या दिवशी परत सकाळी नऊ वाजता कामकाजाला सुरुवात केली जाते, असेही त्यांनी सांगितले.


            आपल्या लोकशाहीशी विद्यार्थ्यांचा निकटचा परिचय व्हावा, लोकशाही मूल्यांचा अभ्यास व्हावा यासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या अभ्यासवर्गाची खूप चांगली परंपरा आहे. या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती होईल. आपली लोकशाही समजून घेता येईल व त्यांच्या माध्यमातून आपल्या लोकशाहीचे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचेल. सर्वसामान्यांचा लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.


            आमदार ॲड. आशिष शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन विधिमंडळाचे अवर सचिव सुनिल झोरे यांनी केले.


००००




 


वृत्त क्र. २१


विधानसभा प्रश्नोत्तरे :

Featured post

Lakshvedhi