*अलौकिक.....*
*तिर्थयात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन ट्रेन निघाली होती.काही अंतर कापल्यावर यात्रेकरू सैलावले.गप्पा सुरु झाल्या.बहुतेकांनी साठी ओलांडली होती.विषय पुण्यसंचयाचा निघाला.*
अत्यन्त उंची कपडे घातलेला गृहस्थ खिडकीजवळ बसला होता.बाहेर दिसणाऱ्या समुद्राकडे बोट दाखवून तो म्हणाला,
*"तो समुद्र पाहिलात ? माझे पुण्य त्याच्याएव्हढे आहे. आम्ही जमीनदार! आमच्या वाड्यावरून कोणीच रिकाम्या हाताने परत गेला नाही.सगळा गाव आम्हाला दानवीर म्हणून ओळखतो.दान हीच आमच्या घराण्याची ओळख आहे."*
त्याच्या समोर साध्या कपड्यातील दुसरा गृहस्थ बसला होता. जमीनदाराने त्याला विचारले.... *"तुम्ही काय करता ?"*
*"मी शिक्षक होतो. निवृत्त झालो..."*
*"शिक्षक ...जमीनदाराच्या शब्दात उपहास होता.म्हणजे सहा तास काम करायचे आणि महिन्याला पगार मोजून घ्यायचा.तुम्हाला कुठे दानधर्म करायला जमणार ? हो ना !"*
शिक्षक हसला,म्हणाला...
*"हो, खरं आहे.."*
गप्पा ऐन भरात होत्या.बरेच अंतर पार झाले होते.तेवढ्यात ट्रेन अचानक थांबली. २० किलोमीटर पुढे असलेल्या गावात तुफान दंगल सुरू होती. रेल्वेचे रूळ उखडण्याचा प्रयत्न झाला. त्यादिवशी तरी ट्रेन पुढे सरकणार नाही अशी माहिती गार्डने दिली.
त्या कमालीच्या छोट्या गावात राहायचे कुठे... ना लॉज ना धर्मशाळा.जमीनदार साहेब त्रागा करू लागले.स्टेशनमास्तर मात्र भला माणूस होता.त्याने वेटिंग रूम,ओळखीची घरे अशा जागी यात्रेकरूची सोय करून दिली.
*शिक्षकाचा चेहरा पाहून तो त्यांच्या पायावर कोसळलाच..*
*"सर,ओळखलं मला ? मी मुकुंद देशमुख.वडील वारल्यानंतर शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. तुम्ही दहावीची परीक्षा फी भरली म्हणून पुढे शिकलो. स्टेशनमास्तर झालो."*
शिक्षकाचे डोळे भरून आले. त्यांची बॅग हातात घेऊन मुकुंद घरी घेऊन जात होता.त्यांनी मुकुंदला थांबवले... *"एका मिनिटात आलोच !"*
*अस्वस्थपणे उभ्या असलेल्या जमीनदाराला ते म्हणाले,*
*"साहेब,माझे पुण्य समुद्रएव्हढे निश्चितच नाही.मी दानधर्मही केला नाही.मी जे केले त्याला कर्तव्य म्हणतात.ज्या कामासाठी पगार घेतला,ते काम पूर्ण निष्ठेने केले.या मुकुंदासारखे शिष्य त्या कर्तव्यनिष्ठेची फळे आहेत.हे विद्यार्थी असे पायावर वाकले ना,की मग तिर्थयात्रेचे पुण्य आमच्या खात्यावर जमा होत असते."*
*"आता माझ्यासोबत येता की थांबताय ?"*
*जमीनदार खालमानेने त्यांच्यामागून निघाला..*
* कर्मसु कौशल्ययोगःम्.....*
*लेखक: अज्ञात...*
🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment