Wednesday, 30 November 2022

अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार

 अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार

अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ भरणार

            अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्याचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टीकोनातून तांत्रिक खंड देऊन पुन्हा ११ महिन्यांच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तत्काळ सुरू करण्यात यावी असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.


            अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ३ हजार ८९८ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे.


            आज घेण्यात आलेल्या निर्णयामुळे अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शासनाच्या प्रचलित धोरण व नियमानुसार लाभ मिळतील. या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, वेतनवाढ मिळणार नाही तसेच अनुकंपा धोरण लागू राहणार नाही.

स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

 स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

            दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा विभाग ३ डिसेंबरपासून कार्या‍न्वित होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निर्देश दिले होते.


            सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांग कल्याणाची दोन कार्यासने वेगळी करुन हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंड‍ळ व त्यांची कार्यालयं यांचा देखील समावेश असेल. या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी-कर्मचारी मिळून २०६३ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील. यामध्ये सचिवस्तरापासून ते शिपायांपर्यंतच्या पदांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ११८ कोटी खर्चासही मंजूरी देण्यात आली.


            सध्या महाराष्ट्रात ३० लाखांपेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवतात. जिल्हास्तरावर देखील जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे काम पाहतात. या स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येणारे अधिनियम आणि योजना राबवण्यात येतील. यामध्ये विशेषत: दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल, विविध पारितोषिके, क्रीडा स्पर्धा, व्यवसायासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग दिन साजरा करणे, मतिमंदाकरीताची बालगृहे, दिव्यांग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन यासारखे बाबींचा समावेश आहे.


--00--

शासन कलावंतांच्या पाठीशी

 शासन कलावंतांच्या पाठीशी

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. 30 : “राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी ही देशातील एक प्रतिष्ठित संस्था आहे. संगीत तसेच नाटक क्षेत्रासाठी अकादमीकडून देण्यात येणाऱ्या गेल्या तीन वर्षांतील पुरस्कारांची अलीकडेच घोषणा झाली असून महाराष्ट्रातील तब्बल 17 कलावंतांना हे मानाचे पुरस्कार घोषित झाले आहेत, ही अतिशय गौरवास्पद बाब असल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.


          राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बांबू निर्मित तिरंगा भेट देऊन डॉ. संध्या पुरेचा यांचा सांस्कृतिक मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सत्कार केला.


          “महाराष्ट्राला संगीत नाटकांची समृद्ध परंपरा लाभलेली असून, भविष्यातही संगीत नाटकांच्या वाटचालीसाठी शासन संगीत नाटक कलावंतांच्या पाठीशी राहील”, असा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.


          यावेळी अकादमीचे कार्यकारी सदस्य डॉ. विद्याधर व्यास, डॉ. उमा डोगरा, डॉ. प्रकाश खांडगे उपस्थित होते.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना

 राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना.

            मुंबई, दि. 30 : सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतांना ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. या सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री हे अध्यक्ष, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील.


            तसेच नाटक या कलाक्षेत्रासाठी सतिश पुळेकर, कंठसंगीतासाठी मृदला दाढे- जोशी, उपनशास्त्रीय संगीतासाठी मंजूषा पाटील, चित्रपटासाठी सुमित राघवन, कीर्तनासाठी विजय बोधनकर, शाहिरीसाठी शाहीर नंदेश उमप, नृत्यासाठी राजश्री शिर्के, कलादानासाठी जयराज साळगांवकर, वाद्यसंगीतासाठी तौफिक कुरेशी, लोककलासाठी सत्यपाल महाराज चिंचोलकर आणि आदिवासी गिरीजनसाठी डॉ. बाळु धुटे हे नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये अशासकीय सदस्य असतील. सदर समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत राहील.

महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची

 महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

            मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपाध्यक्ष असतील. या समितीत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार सदस्य असतील.


            याशिवाय या समितीमध्ये विभागाचे सचिव हे सदस्य आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील. याशिवाय डॉ. अनिल काकोडकर, डॉ. शशिकला वंजारी, वासुदेव कामत, ॲड. उज्वल निकम आणि डॉ. जयंत नारळीकर हे या समितीमध्ये अशासकीय सदस्य असतील. सदर समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत राहील.


००००

थेट कर्ज योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन अनुसूचित जाती

 थेट कर्ज योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. ३० : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मुंबई उपनगरमधील अनुसूचित जातीतील व्यक्तींना उद्योग तसेच व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपये इतके थेट कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाने केले आहे.


            अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनी मादींग, दानखनी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी, मादगी या १२ पोट जातींतील थेट कर्ज योजनेतंर्गत लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या अर्जदारांनी अटी, शर्ती निकषांची पूर्तता करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय मुंबई उपनगर शहर, जिल्हा कार्यालय मुंबई उपनगर शहर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. 33, बांद्रा (पू), मुंबई- 4000 051 या पत्त्यावर अर्ज पाठवावेत असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ तर्फे करण्यात आले आहे.


००००

जिंदगी







 

Featured post

Lakshvedhi