Saturday, 26 November 2022

देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करु

 देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करु

 - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई दि 25:- देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला 26/11 चा हल्ला हा कधीही भरून न येणारा घाव आहे. या कटू आठवणी न मिटणाऱ्या आहेत. मात्र असे दुःसाहसकरणा-यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत केले जाईल हे देशाने कृतीतून दाखवून दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            हॉटेल ताजमहल पॅलेस येथे आयोजित '26/11 मुंबई संकल्प' या कार्यक्रमात श्री.फडणवीस बोलत होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईवर झालेला 26/11चा हल्ला अतिशय सुनियोजित होता. पर्यटक, राजदूत अशा काही घटकांना विशेष करून लक्ष्य करण्यात आले. पण या हल्ल्यानंतर मुंबईकरांच्या अभूतपूर्व एकजुटीचे पुन्हा एकदा दर्शन घडले. मुंबई पुन्हा एकदा नव्या दमाने लगेच उभी राहिली. मुंबईला नमविण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे मुंबईकरांनी उधळून लावले. 26/11 च्या हल्ल्यानंतर सर्वशक्तीनिशी लढा देत आपण देशाच्या शत्रूंचे पितळ उघडे पाडण्यात यशस्वी झालो हे नक्की, आणि आता जर आपल्यावर कोणी हल्ला करेल तर त्याला सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करण्यात येईल हा इशारा आपण कृतीतून देऊन आक्रमक दृष्टिकोन घडवला आहे असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

            श्री फडणवीस म्हणाले, 26/11 च्या हल्ल्यानंतर एक अहवाल सादर करण्यात आला होता. त्यातील शिफारशींनुसार मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम आमच्या शासनाच्या कालावधीत वेगाने पूर्ण करण्यात आले. याचाच दुसरा टप्पा देखील सुरू करण्यात येत आहे. हा टप्पा अधिक प्रगत आणि प्रभावशाली असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सागरी सुरक्षेतील अडथळे, त्रुटी दूर करण्यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले.

            श्री फडणवीस म्हणाले,आजची मुंबई भयमुक्त आहे. महिलांसाठीही मुंबई हे देशातील अन्य कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक सुरक्षित शहर आहे. अर्थातच याचे श्रेय शासनाबरोबरच मुंबईकरांनाही नक्कीच आहे, कारण मुंबईकर शिस्तीला खूप महत्त्व देतात.

            देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. देशाची अर्थव्यवस्था आज झपाट्याने प्रगती करत आहे. राज्याला ट्रिलियन डॉलरची इकॉनाॅमी करत असताना याला गती देण्याचे महत्त्वाचे काम 'एमएमआर' क्षेत्र विशेषत्वाने करत आहे. आता तिसरी मुंबई आकाराला येत आहे. 'जेएनपीटी' बंदर कंटेनर ट्रॅफिकचा मोठा भार उचलते. पण आता आपण वाढवण बंदराच्या उभारणीद्वारे निर्यात क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकणार आहोत. या बंदराची क्षमता सर्वार्थाने मोठी असणार आहे‌. समृद्धी महामार्गाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रच आता 'पोर्ट कनेक्टेड' झाला आहे. हा महामार्ग 'फायनान्शियल एक्सप्रेस वे' ठरणार आहे. देशाच्या हृदयस्थानी असलेले नागपूर शहर देखील लॉजिस्टिकच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. गतिशक्ती योजनेच्या माध्यमातून लॉजिस्टिकची मोठी साखळीच आता देशभरात निर्माण होत आहे. आणि यामध्ये नागपूरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पायाभूत क्षेत्रासह अनेक महत्त्वाकांक्षी मोठे प्रकल्प साकार झाले आणि होत आहेत, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

- - - 000- - -

भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन.

 भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन.

            मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव जयश्री भोज यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उद्देशिकेचे वाचन केले.

            यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, किरण देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांचासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे तसेच पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरणार

 वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरणार

पदे भरण्याची प्रक्रिया टी.सी.एस.आयओएन या कंपनीमार्फत करण्यात येणार

- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन.

            मुंबई, दि. 26 : वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरण्यात येणार आहे. सदर पदभरती प्रक्रिया टी..सी. एस. आयओएन या कंपनीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

            वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील पदे १०० टक्के प्रमाणात भरण्यास ५ मे २०२१ रोजी मान्यता देण्यात आली आहे. यानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या गट-ब(अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या १०० टक्के मर्यादित पदे शासनाच्या विहीत धोरणाचा अवलंब करुन भरण्यास शासनाच्या १७ मे २०२१ रोजीच्या पत्रान्वये मान्यता प्रदान करण्यात आली होती.यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाच्या २२ एप्रिल २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये सरळसेवेची पदे भरण्याकरीता ५ कंपन्या निर्धारीत करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या गट-ब (अतांत्रिक) व गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या पदांची परीक्षा न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड राज्यस्तरीय निवड समितीने केली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्थ असलेल्या गट-क संवर्गाच्या पदांची परीक्षेमध्ये न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लि. या कंपनीने केलेल्या गैरवापर विचारात घेऊन सदर कंपनीमार्फत पदभरती करण्यात आली नाही.

            सामान्य प्रशासन विभागाच्या २१ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय, अन्न व औषध प्रशासन व मानसिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेली गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे भरण्याची प्रक्रिया टी.सी. एस. आयओएन या कंपनीमार्फत करण्यास २४ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता प्रदान करण्यात आली असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील ७५ हजार रिक्त पदे भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरू झालेली आहे अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त निमित्ताने वरील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येणार आहेत. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ सरळसेवेची गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील साधारणतः ४ हजार ५०० पदे भरण्यात येणार आहे.या पदांमध्ये मुख्यत्वे तांत्रिक उदा.तंत्रज्ञ, औषध निर्माता, प्रयोगशाळा सहाय्यक इ. व अतांत्रिक उदा.उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक इ. ही पदे भरण्यात येणार आहेत. सदर पदभरती बाबतची जाहिरात दोन महिन्यात प्रसिद्ध करण्यात येणार असून सदर पदभरती प्रक्रिया 6 महिन्यात पूर्ण करण्याचे विभागाने नियोजन केलेले आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

गुड समेरिटन पुरस्कार योजनेच्या आढाव्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती.

 गुड समेरिटन पुरस्कार योजनेच्या आढाव्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती.

            मुंबई दि. २५ : केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शनास अनुसरून मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तत्काळ मदत करणाऱ्या आणि अपघाताच्या सुरुवातीच्या काही तासात अपघातग्रस्तांना हॉस्पिटल्स / ट्रॉमा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या गुड समेरिटनला अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल पुरस्कार देण्याच्या योजनेच्या योग्य अंमलबजावणीबाबत त्रैमासिक आढावा घेण्याकरिता राज्यस्तरीय देखरेख समितीची स्थापना गृह विभागाने शासन निर्णयाद्वारे केली आहे.

            या राज्यस्तरीय देखरेख समितीचे अध्यक्ष अपर मुख्य सचिव (गृह) असून या समितीमध्ये आयुक्त (आरोग्य सेवा ), प्रधान सचिव (विशेष/गृह), अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) हे सदस्य आहेत. या समितीचे सदस्य सचिव परिवहन आयुक्त हे काम पाहतील.

            ही समिती या योजनेच्या प्रभावी व कार्यक्षम अंमलबजावणीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेईल. तसेच राज्यातील तीन सर्वात योग्य नामांकन प्रस्ताव राष्ट्रीय पुरस्कारासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयास सादर करेल. केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वातील तरतुदीनुसार समितीचे कामकाज चालेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

दिलखुलास’

 दिलखुलास’ कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर सोमवार दि. 28 आणि मंगळवार दि. 29 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            राज्यात गोवर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने तातडीच्या उपाय योजना सुरू केल्या आहेत. या आजाराचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेमार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून कशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे, शासनस्तरावर कोणती खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच लहान मुले व पालकांनी घ्यावयाची काळजी आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. गोमारे यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.

00000

राज्यात उद्यापासून ६ डिसेंबरपर्यंत समता पर्वाचे आयोजन

 राज्यात उद्यापासून ६ डिसेंबरपर्यंत समता पर्वाचे आयोजन

            मुंबई, दि.२५ : राज्यात २६ नोव्हेंबर संविधान दिनापासून ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनापर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 'समता पर्व' चे आयोजन केले जाणार आहे. या कालावधीत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

            दि. २५ नोव्हेंबर रोजी समता पर्वाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन, दि.२६ नोव्हेंबर रोजी प्रभात फेरी, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन, जिल्हास्तरावर पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन, दि. २७ नोव्हेंबर रोजी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, लेखी परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रमाचे आयोजन, २८ नोव्हेंबर संविधान विषयक व्याख्याने, २९ नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय भवनात विभागाची ‘नवी दिशा’ या विषयावर पत्रकारांची कार्यशाळा, ३० नोव्हेंबर रोजी संविधान या विषयावर पत्रक, पोस्टर्स, बॅनर इत्यादीबाबत जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन, अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग यांची 'अनुसूचित जाती उत्थान: दशा आणि दिशा' या विषयावर कार्यशाळा आयोजित करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहे.

            दि. १ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर युवा गटांची कार्यशाळा, दि. २ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींना भेटी, ३ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी व वृद्ध यांच्यासाठी माहितीची कार्यशाळा, सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थींना विविध लाभांचे वाटप व बक्षीस वितरण, ४ डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिराचे आयोजन, राज्यातील सर्व तालुकास्तरावर योजनांच्या माहितीची कार्यशाळा, ५ डिसेंबर रोजी संविधान जागर व ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासंदर्भात अभिवादनात्मक कार्यक्रमाचे आयोजन व समतापर्वाचा समारोप करण्यात येणार आहे.

            अभिवादन रॅली व इतर राज्यस्तरीय कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व प्रादेशिक उपायुक्त, सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, राज्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी यांना समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समता पर्व आयोजित करताना ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, त्या ठिकाणी आदर्श आचारसंहितेचे पालन करून कार्यक्रम करावा, अशा सूचना शासनाकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करु.

 देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करु.

 - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई दि 25:- देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला 26/11 चा हल्ला हा कधीही भरून न येणारा घाव आहे. या कटू आठवणी न मिटणाऱ्या आहेत. मात्र असे दुःसाहस

करणा-यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत केले जाईल हे देशाने कृतीतून दाखवून दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            हॉटेल ताजमहल पॅलेस येथे आयोजित '26/11 मुंबई संकल्प' या कार्यक्रमात श्री.फडणवीस बोलत होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईवर झालेला 26/11चा हल्ला अतिशय सुनियोजित होता. पर्यटक, राजदूत अशा काही घटकांना विशेष करून लक्ष्य करण्यात आले. पण या हल्ल्यानंतर मुंबईकरांच्या अभूतपूर्व एकजुटीचे पुन्हा एकदा दर्शन घडले. मुंबई पुन्हा एकदा नव्या दमाने लगेच उभी राहिली. मुंबईला नमविण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे मुंबईकरांनी उधळून लावले. 26/11 च्या हल्ल्यानंतर सर्वशक्तीनिशी लढा देत आपण देशाच्या शत्रूंचे पितळ उघडे पाडण्यात यशस्वी झालो हे नक्की, आणि आता जर आपल्यावर कोणी हल्ला करेल तर त्याला सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करण्यात येईल हा इशारा आपण कृतीतून देऊन आक्रमक दृष्टिकोन घडवला आहे असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

            श्री फडणवीस म्हणाले, 26/11 च्या हल्ल्यानंतर एक अहवाल सादर करण्यात आला होता. त्यातील शिफारशींनुसार मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम आमच्या शासनाच्या कालावधीत वेगाने पूर्ण करण्यात आले. याचाच दुसरा टप्पा देखील सुरू करण्यात येत आहे. हा टप्पा अधिक प्रगत आणि प्रभावशाली असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सागरी सुरक्षेतील अडथळे, त्रुटी दूर करण्यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले.

            श्री फडणवीस म्हणाले,आजची मुंबई भयमुक्त आहे. महिलांसाठीही मुंबई हे देशातील अन्य कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक सुरक्षित शहर आहे. अर्थातच याचे श्रेय शासनाबरोबरच मुंबईकरांनाही नक्कीच आहे, कारण मुंबईकर शिस्तीला खूप महत्त्व देतात.

            देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. देशाची अर्थव्यवस्था आज झपाट्याने प्रगती करत आहे. राज्याला ट्रिलियन डॉलरची इकॉनाॅमी करत असताना याला गती देण्याचे महत्त्वाचे काम 'एमएमआर' क्षेत्र विशेषत्वाने करत आहे. आता तिसरी मुंबई आकाराला येत आहे. 'जेएनपीटी' बंदर कंटेनर ट्रॅफिकचा मोठा भार उचलते. पण आता आपण वाढवण बंदराच्या उभारणीद्वारे निर्यात क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकणार आहोत. या बंदराची क्षमता सर्वार्थाने मोठी असणार आहे‌. समृद्धी महामार्गाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रच आता 'पोर्ट कनेक्टेड' झाला आहे. हा महामार्ग 'फायनान्शियल एक्सप्रेस वे' ठरणार आहे. देशाच्या हृदयस्थानी असलेले नागपूर शहर देखील लॉजिस्टिकच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. गतिशक्ती योजनेच्या माध्यमातून लॉजिस्टिकची मोठी साखळीच आता देशभरात निर्माण होत आहे. आणि यामध्ये नागपूरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पायाभूत क्षेत्रासह अनेक महत्त्वाकांक्षी मोठे प्रकल्प साकार झाले आणि होत आहेत, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

- - - 000- - -

Featured post

Lakshvedhi