Friday, 18 November 2022

परतफेड

 🌹 *ॐसाईनाथाय नम:*🌹

      ♦️ *विचारपुष्प*♦️

       *🌹"परतफेड"🌹*


*कसे आहात..??"*

*एवढा एकच प्रश्न तिने विचारला.., आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या बाईसमोर मी मनसोक्त रडलो...*


*ती म्हणाली.. "भरपूर रडून घ्या.. मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधीही डोळ्यांतून पाणी काढायचं नाही.."*


*त्या नंतर तिने जे काही सांगितलं.. त्यामुळे माझं अंतरबाह्य परिवर्तन झालं..!*


*तिनं काय सांगितलं..??*


*ती शांतपणे म्हणाली की.. "आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय, तो आपल्या अपेक्षांपूर्तींकरिता नाही किंवा नसावा.. कारण आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत... आणि त्यामुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!"*


*"माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तींकरिता नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहुन गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी..."*


*"जसं तुमच्या सौभाग्यवती गेल्या, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात. तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्याकडुन झाली.. तो अकाउंट तुमचा संपला..! आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा..."*


*"मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत.. ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात.. परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हांला मरण नाही... तेंव्हा मनातल्या मनातसुद्धा परमेश्वराला उद्देशून "तु मला का जगवलंस..?" हा प्रश्न विचारू नका.."*


*"कुठलीही व्यक्ती असो, ती तुमच्याशी विचित्र वागली.. तुमचा अपमान केला.. तुमच्याकडे दुर्लक्ष केलं.. तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं.., तेव्हा एकेक अकाउंट पूर्ण झाला असे समजा आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा..."*


*"बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर, 'Account Closed...' असा शिक्का मारतात ना.., त्याप्रमाणे जेंव्हा एकांत मिळेल तेंव्हा आपले किती Account Closed झाले, ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका.. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका..."*


*"कदाचित सुरुवातीला तुम्हांला जड जाईल.. पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं..."*


*तेंव्हा मनाला सांगा.. "बाबा रे.. आयुष्यभर तुझं ऐकलं.. तुझ्या हुकमात राहिलो.. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे.. आजपासून मी तुझ्यापासून स्वतःला मुक्त करत आहे..!"*


*"हा प्रयोग करा... आणि किती खाती पटापट बंद होतायेत ह्याची प्रचिती घ्या.. मी सुद्धा उद्या तुम्हांला ओळख दाखवली नाही.. तर तुमच्या पासबुकात माझी एकच entry होती असं समजा."*


*परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त... "परतफेड आणि परतफेड" हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल, तुमच्या आयुष्यातुन निगेटीव्हीटी कायमची निघुन जाईल....*


*आणि "मी येते..." असं म्हणत ती निघून गेली..*


*इतकं सगळं बोलून गजा उठला आणि म्हणाला.., "आज ही मुक्ती मिळून पाच वर्षं झाली.. मी आयुष्य खुपच मस्त जगत आहे.. तृप्त आहे..* 

*तुम्ही 'सहन करतो, सहन करतो..' हे इतक्या वेळा सांगितलंत, ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाही.. तुम्ही फक्त दुःख वाटत असता.."*

*"जो सहन करतो ना.. तो कधी बोलत नाही..!"*

*चला तर मित्रांनो, आजपासुन आपणसुध्दा आपल्या आयुष्यात कोणाकडुन अपेक्षाभंग करुन घेण्याऐवजी फक्त "परतफेडीचं" आयुष्य जगायला सुरुवात करुन आयुष्य मजेत घालवुया..*


 *एक छोटासा प्रयत्न...* 

*वाचण्यात आलेला सुंदर लेख

दिलखुलास’

 दिलखुलास’ कार्यक्रमात 'महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांची मुलाखत

            मुंबई, दि.18: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात 'महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा' चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर सोमवार दि. 21, मंगळवार दि. 22 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.


            महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक मंडळाचा गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग, महामंडळाची एकूण वाटचाल, महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश, एक खिडकी योजना, गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि पर्यटन अशा विविध विषयांवर व्यवस्थापकीय संचालक डॉ. ढाकणे यांनी विस्तृत माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

चित्रनगरीत चित्रीकरण करणाऱ्या मराठी निर्मिती संस्थांना दुसऱ्या वर्षी भाड्यामध्ये २५ टक्के सवलत.

 चित्रनगरीत चित्रीकरण करणाऱ्या मराठी निर्मिती संस्थांना

दुसऱ्या वर्षी भाड्यामध्ये २५ टक्के सवलत.

            मुंबई दि.18 : दादासाहेब फाळके चित्रनगरीत चित्रीकरण करणाऱ्या मराठी निर्मिती संस्थांना पहिल्या वर्षी जागेच्या भाड्यामध्ये 50 टक्के सवलत मिळते. तर, दुसऱ्या वर्षापासून नियमानुसार पूर्ण भाडे आकारले जाते. मात्र, आता दुसऱ्या वर्षी देखील 25 टक्के भाड्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


            सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 160 वी बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चित्रपट अनुदान प्रक्रिया सुधारून ती कालबद्ध करावी. तसेच महामंडळ आणि चित्रनगरीच्या विविध सेवा या ‘एक खिडकी’ योजनेंतर्गत गतिमान करण्यात येईल. चित्रनगरीची सुरक्षा व्यवस्था काटेकोर करण्यासाठी विविध पर्यायांसह डिजीटल करण्याच्या प्रस्तावास त्यांनी संमती दिली.


            या महत्वाच्या निर्णयामुळे निर्मिती संस्थांना आर्थिक दिलासा मिळणार असून अधिक सुरक्षित वातावरणात चित्रिकरण करता येणार आहे. चित्रनगरीचा कायापालट करण्यावर भर देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात चित्रनगरी लवकरच मोठी झेप घेईल असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.


            यावेळी महामंडळाच्या संबंधी विविध ठरावांवर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळात चित्रनगरीच्या परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न आदी विषयांचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले.


            बैठकीला सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ.सौरभ विजय, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, उप सचिव विद्या वाघमारे, उप सचिव बाळासाहेब सावंत, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्त अधिकारी सई दळवी, मुख्य प्रशासकीय अधिकारी विजय भालेराव, उप अभियंता (सिव्हिल) संतोष कुमार मुरुडकर, सहायक प्रशासन अधिकारी तुकाराम खोत, मुख्य सुरक्षा अधिकारी श्री.घोसाळकर आदी महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

आशियाई चित्रपट महोत्सवासाठी शासनाकडून 10 लाखांचे अर्थसहाय्य.

 आशियाई चित्रपट महोत्सवासाठी शासनाकडून

10 लाखांचे अर्थसहाय्य.

            मुंबई, दि. 18: यंदा होणारा 19 वा आशियाई चित्रपट महोत्सव 12 ते 18 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवासाठी राज्य शासनाकडून 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. मुंबईच्या ‘दि एशियन फिल्म फाऊंडेशन’ संस्थेमार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.


            सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसहाय्य करण्याबाबत सूचना केली होती. याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे.


            19 व्या आशियाई चित्रपट महोत्सवात राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध उपक्रमांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार असून याशिवाय या महोत्सवाच्या परीक्षक मंडळात राज्य शासनाचा प्रतिनिधी असणार आहे.

My बाप

 


राज्यात ऑक्टोबरमध्ये २१ हजार उमेदवारांना रोजगार

 राज्यात ऑक्टोबरमध्ये २१ हजार उमेदवारांना रोजगार

- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा.

            मुंबई, दि. १८ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये २१ हजार ५२५ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


            महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.


नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी


            विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९९ हजार १५१ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरी इच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये विभागाकडे ४५ हजार ६०६ इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुर्ननोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ७ हजार ४९५, नाशिक विभागात ४ हजार १७५, पुणे विभागात २३ हजार ९२६, औरंगाबाद विभागात ५ हजार ८७८, अमरावती विभागात १ हजार ७२२ तर नागपूर विभागात २ हजार ४१० बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.


            माहे ऑक्टोबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे २१ हजार ५२५ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ४ हजार ४५५, नाशिक विभागात १ हजार ३६२, पुणे विभागात १२ हजार ६२२, औरंगाबाद विभागात २ हजार ७३९, अमरावती विभागात ३१६ तर नागपूर विभागात ३१ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.


            नोकरी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

तक्रार बँकेची

 तुमची बँक/एनबीएफसी/ई-वॉलेट द्वारे 30 दिवसांच्या आत तक्रारीचे समाधान केले गेले नाही/ मिळालेल्या उत्तराशी संतुष्ट नाही? तर https://cms.rbi.org.in वर आरबीआय लोकपालला संपर्क करा -RBI

Featured post

Lakshvedhi