Friday, 18 November 2022

जागतिक बालदिनानिमित्त २० व २१ नोव्हेंबरला ‘चला खेळू या’ उपक्रमाचे आयोजन.

 जागतिक बालदिनानिमित्त २० व २१ नोव्हेंबरला

‘चला खेळू या’ उपक्रमाचे आयोजन.

            मुंबई, दि. १८: राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, युनिसेफ आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला खेळूया’ उपक्रमाचे आयोजन २० व २१ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे.


             महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशिबेन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असून, यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटनही होणार आहे. या वर्षाची थीम ‘खेळण्याचा अधिकार’ ही असून प्रमुख पाहुणे असलेली भारतीय संघाची माजी बास्केटबॉल कर्णधार दिव्या सिंग मुलांबरोबर खेळामध्ये सहभागी होणार आहे. दोन दिवसीय या उत्सवात तीन हजारहून अधिक मुलांसाठी कार्यशाळा, खेळ, नृत्य, मल्लखांब, कथाकथन आणि जादूचे प्रयोग होणार आहेत.


            २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता फुटबॉल, टेनिस, क्रिकेट आणि अॅथलेटिक्स या स्पर्धांमध्ये ३०० मुले सहभागी होणार आहेत. इतर मुलांसाठी टाय आणि डाई, फिंगर पपेट मेकिंग, फेस मास्क मेकिंग, पॉटरी, पंच क्राफ्ट, टॅटू आर्ट, स्टोरीटेलिंग, हॅन्ड पेंटिंग आणि साहसी खेळ यांसारख्या विविध कार्यशाळांचा आनंद घेता येईल. मुले दिवसभर चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. तसेच बालहक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष स्टॉल लावण्यात येणार आहे.


             सोमवार, २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासह आणि एनएमआयएमएस मोंटाज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या संगीत बँडसह कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.


                'जागतिक बाल दिन' हा २० नोव्हेंबर १९८९ रोजी बालहक्कावरील ‘कन्व्हेन्शन ऑफ द चाइल्ड राइट्स’ (CRC) संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला. लिंग, वंश, धर्म, अपंगत्व, लैंगिकता किंवा इतर भेदभावांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंद मिळायला हवा यासाठी त्यांच्या अधिकारांचे संरक्षण केले जाते.


००००

नौवहन क्षेत्राने प्रगतीसोबत सागरी पर्यावरणाशी समतोल साधावा.

 नौवहन क्षेत्राने प्रगतीसोबत सागरी पर्यावरणाशी समतोल साधावा.

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. 18 : जागतिक व्यापार वाढत असताना नौवहन क्षेत्र प्रगती करीत आहे. ही प्रगती होत असताना सागरी पर्यावरणाचा समतोल साधणे आवश्यक आहे. या दृष्टीने सागरी क्षेत्राशी संबंधित सर्व घटक गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.


            राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 11 व्या आंतरराष्ट्रीय सागरी परिषद (इन्मार्को 2022) व प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई येथे नुकतेच संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या तीन दिवसांच्या परिषदेचे आयोजन भारतीय नौवहन महासंचालनालय व इन्स्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनीअर्स (इंडिया) या संस्थांनी केले आहे.  


            ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन ही जागतिक समस्या असून या उत्सर्जनाचे प्रमाण कालबद्ध पद्धतीने कमी व्हावे या दृष्टीने नौवहन क्षेत्राने विचारविनिमय सुरु केल्याबद्दल राज्यपालांनी नौवहन संचालनालय व इन्स्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनिअर्सचे अभिनंदन केले.


            नौवहन क्षेत्राच्या माध्यमातून होणारे ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन 40 टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून या दृष्टीने सर्व संबंधित क्षेत्रांमध्ये सहकार्य अपेक्षित आहे असे नौवहन महासंचालक अमिताभ कुमार यांनी सांगितले. यावेळी आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सागरी पर्यावरण विभागाचे संचालक आर्सेनिओ डॉमिन्गेझ यांचे बीजभाषण झाले.


            दर चार वर्षांनी होणाऱ्या या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला इन्स्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनिअर्स (इंडिया) मुंबई शाखेचे अध्यक्ष अरुण कुमार गुप्ता, इन्स्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनिअर्सचे अध्यक्ष विजेंद्र कुमार जैन, परिषदेचे अध्यक्ष राजीव नय्यर व निमंत्रक डेव्हिड बिरवाडकर प्रामुख्याने उपस्थित होते. 


            या त्रिदिवसीय परिषदेचा मुख्य विषय 'शाश्वत भविष्यासाठी हरित सागरी विश्व' हा असून नौवहन उद्योगाशी निगडित विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था व तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होत आहेत.

०००

Governor Koshyari inaugurates International

Maritime Conference INMARCO 2022.


      Mumbai 18 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the 11th edition of the 'DG Shipping INMARCO 2022' the International Maritime Conference and Exhibition in Mumbai on Thursday (17 Nov).


            The Conference titled 'Green Maritime Conclave' has been organised by the Director General of Shipping in association with the Mumbai Branch of the Institute of Marine Engineers (India).


            Chairman of Institute of Marine Engineers (India) Mumbai Branch Arun Kumar Gupta, Director General of Shipping Amitabh Kumar, President of Institute of Marine Engineers (India) Vijendra Kumar Jain, Director, Marine Environment Division of International maritime Organisation Arsenio Dominguez, Chairman of INMARCO 2022 Rajeev Nayyer and Convenor David Birwadkar were present on the occasion.


            Speaking on the occasion the Governor called for striking a balance between development and environment. He applauded the efforts of the Maritime Sector to reduce the Greenhouse Gas emissions through cooperation with all stakeholders.


0000





कोकणातील सर्व रेल्वेस्थानकांचा कायापालट करणार

 कोकणातील सर्व रेल्वेस्थानकांचा कायापालट करणार


- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हान

            मुंबई, दि. 18 :- रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या सर्व प्रमुख स्थानकांच्या सुशोभिकरणाची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिले.


            कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, नूतनीकरण, स्थानकांचे सुशोभिकरण आदी विविध विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. त्यावेळी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            तसेच कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करा. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी व कणकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलीस ठाणे उभारण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या. या निर्णयामुळे कोकणवासियांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून लवकरच कोकण रेल्वेची स्थानके व परिसराचा कायापालट होणार आहे. मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांचे उत्कृष्टरित्या सुशोभिकरण व अत्याधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे प्रवाशांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होतात. याच धर्तीवर कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांचे सुशोभिकरण व आधुनिकीकरण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या. तसेच, कोकण रेल्वे प्रशासनाने सुशोभिकरणासंदर्भात पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.


            मुंबई- कोकणातून दरदिवशी हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे ही सर्व रेल्वे स्थानके सुसज्ज करावीत. विनाविलंब येत्या सात दिवसांत याबाबत कार्यवाही सुरु करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.


            कोकण रेल्वे स्थानकांकडे जाणारे रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची तयारी असून या प्रमुख रस्त्यांच्या क्रॉकिटीकरणासाठी सुमारे १०० कोटी खर्च अपेक्षित आहे. कोकणवासी व मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे रस्ते तयार करण्याची पूर्ण तयारी असून यादृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे तत्परतेने ना हरकत प्रमाणपत्र आल्यावर रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात येईल, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.


            कोकण रेल्वे मार्गावर वारंवार अनेक अपघात होतात. तसेच, दरडी कोसळण्याच्या अनेक दुर्घटनाही होतात. त्यामुळे अशा आणीबाणीच्या परिस्थितीत अपघातग्रस्तांना तातडीने उपाययोजना व मदत करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी व कणकवली येथे दोन स्वतंत्र व सुसज्ज पोलीस ठाणे बनविण्यात यावीत, तसेच याच परिसरात आठ पोलीस चौक्या नव्याने तयार करण्याबाबात कोकण रेल्वे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने योग्य जागा उपलब्ध करुन द्याव्यात व त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी यावेळी उपस्थित कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.


            राजापूर रोड, सौंदळ, रत्नागिरी, भोके, आडवली, विलवडे, सावर्डा, चिपळूण, कामथे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड, आयनी, मडुरा, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, कणकवली, नांदगाव, खारेपाटण रोड, वैभववाडी रोड, आचिर्णे, सिंधुदूर्गनगरी या कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम लवकरात लवकर हाती घेण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या.


            त्याप्रमाणे रत्नागिरी - दादर पॅसेंजर गाडी दिवा जंक्शनच्या ऐवजी दादर रेल्वे स्थानकापर्यंत करण्याबाबत तसेच सावंतवाडी - तुतारी एक्सप्रेसला नांदगाव स्थानकावर थांबा देण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कोकण रेल्वेच्या अधिका-यांनी दिले. कोरोनाच्या काळात बंद पडलेली नांदगाव रेल्वे स्थानकावरील रो-रो सुविधा पुन्हा सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असेही कोकण रेल्वेच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.


            या बैठकीला कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता नागदत्त राव, वरिष्ठ अभियंता जे.एस.थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस.एन.राजभोज, एस.एन.गायकवाड, ए.ए.ओटवणेकर, ए.एम.रमेश, अजयकुमार सर्वगोड, अनामिका जाधव, मध्य रेल्वेचे डिसीपी मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगत, कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य विजय केनवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


*****


सुविधा सुधारणा

 नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करणार


            नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करण्यासाठी २५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            या विद्यापीठाच्या वारंगा येथील स्थायी कॅम्‍पसमधील शैक्षणिक संकुल मुलामुलींचे वसतिगृह ॲमेनिटी ब्लॉक व प्रशासकीय संकुल या इमारतींमध्ये हिटींग, व्हेटीलेशन व एअर कंडीशन यंत्रणा लावण्यात येणार आहेत.


-----०-----

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

पुणे येथे जेएसपीएम विद्यापीठ या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता


            पुणे येथे जेएसपीएम विद्यापीठ या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            हे विद्यापीठ २०२३-२४ पासून सुरु होईल. तसेच याबाबतीत विधिमंडळासमोर विधेयक सादर करण्यात येईल.


            हे प्रस्तावित विद्यापीठ हवेली तालुक्यातील वाघोली येथे असेल.


-----०-----


उच्च व तंत्र शिक्षण विभाग


कुलगुरु, प्र-कुलगुरु यांच्या निवड पद्धतीत सुधारणा.

            राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु, प्र-कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहीत केल्याप्रमाणे होणार आहे. यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            विद्यापीठ अनुदान आयोगाने कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या निवडीची पध्दत, अर्हता इत्यादीसंदर्भात १८ जुलै २०१८ च्या अधिसूचनेन्वये सुधारणा केलेल्या आहेत. या सुधारणा आणि त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम, 1989, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, अधिनियम, 

स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ

 स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ

आता मिळणार दरमहा २० हजार रुपये

            राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे.


            या निवृत्तीवेतनात वाढ करण्याची मागणी वारंवार होत होती. यासाठी वार्षिक अंदाजे ७४.७५ कोटी रुपये इतका अधिक खर्च येईल. या निवृत्तीवेतन वाढीचा राज्यातील ६२२९ स्वातंत्र्य सैनिकांना लाभ होईल.


            भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम अशा देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी दरमहा निवृत्तीवेतन देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने सन १९६५ पासून सुरु केली आहे. त्यानुसार २ ऑक्टोबर २०१४ पासून दरमहिन्याला १० हजार रुपये इतके निवृत्तिवेतन देण्यात येते.



मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर यावर्षी न बदलण्याचा निर्णय.

 मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर यावर्षी न बदलण्याचा निर्णय.

            कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ करिता न सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १५४(1ड) मध्ये सुधारणा करण्यात येईल.


            कोविडमुळे लागू केलेल्या टाळेबंदी तसेच प्रादुर्भावाच्या भीतीमुळे अनेक लहानमोठे उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, विकासाची कामे, कारखाने, बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे, दैनंदिन रोजगार बंद होता. यामुळे सर्वसाधारण अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे बहुतांशी मालमत्ताधारक, संस्था, लोकप्रतिनिधींकडून मालमत्ता कर माफ करणे किंवा सवलत देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे निवेदने दिली होती.


            यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने सदर भांडवली मूल्य सुधारित करण्यास 2022-23 करिता सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत दिल्याने महानगरपालिकेची अंदाजे 1116.90 कोटी रुपये इतकी महसूल हानी होणार आहे.


-----०-----

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी

 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी

25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत


            मुंबई, दि. १७ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करण्याची मुदत २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे. इच्छुकांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईचे संचालक डॉ. के.एस. जैन यांनी केले आहे.


            उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले अकॅडेमी, पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.


            अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबरपर्यंत आहे. प्रवेश परीक्षा ४ डिसेंबर २०२२ (ऑफलाईन पद्धतीने) घेण्यात येईल. परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ. जैन यांनी केले आहे.



Featured post

Lakshvedhi