Tuesday, 15 November 2022

मुख्यमंत्र्यांचे अभिवादन.

 आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन.

            मुंबई, दि. 15 : आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


            ‘भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा मंत्र दिला. त्यांच्या एकजूटीतून जुलमी ब्रिटिश राजवटीला हादरा दिला. आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांचे कार्य भावी पिढ्यांपर्यंत नेऊ या , असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


 

तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवरसंशोधन आणि सामाजिक कार्याची संधी

 राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवरसंशोधन आणि सामाजिक कार्याची संधी

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.

            मुंबई, दि. 14 : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सात लाख तरुणांना हवामान बदलाचे योद्धे म्हणून कार्य करण्याची संधी आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


            आज मुंबई विद्यापीठ येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिसेफ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अजित बाविस्कर,युनिसेफच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वजंय, प्र.कुलगुरू अजय भामरे, प्र.कुलसचिव शैलेंद्र देवळाणकर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री.पाटील म्हणाले की, हवामान बदलाचा धोका आणि भविष्यातील पाण्याची निर्माण होणारी टंचाई लक्षात घेऊन, शासनाने सन 2014-19 या कालावधीत जलयुक्त शिवार योजना राबवली. त्यामुळे पाण्याचा साठा वाढला आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली.


            नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी, बदलत्या हवामानाला प्रतिसाद देण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी तरुणांना एकत्र आणण्याचा निश्चय केला आहे. जलसंधारण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत महाराष्ट्रातील सात लाख तरुण 'पाणी आणि पर्यावरण आर्मी' म्हणून कार्य करतील आणि या विषयांवर संशोधन करतील. त्याचबरोबर या विषयांवर कार्य करणाऱ्या सामजिक संस्थांची मदत घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यत ही चळवळ पोहोचवण्यासाठी सहकार्य करतील, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


            उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी म्हणाले की, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. तरुणांमध्ये जलसंवर्धनाच्या सवयी रुजवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहोत आणि भविष्यातील बदलांना चालना देण्याबरोबरच राज्यातील जलसंवर्धनाचे कार्य अधिक वाढेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये तरुणांची नोंदणी, प्रशिक्षण आणि संस्था/समुदायातील जलसंधारणाबाबत निवडक विद्यापीठांच्या माध्यमातून कृती आराखडा याचा समावेश आहे. कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायर्मेंट अॅण्ड वॉटर इंडियाने २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय अहवालानुसार, हवामान धोक्याच्या पातळीवर असलेले महाराष्ट्र हे तिसरे राज्य आहे. युनिसेफच्या सहाय्याने पर्यावरण संवर्धनाला चालना देणे, हे या कराराचे उद्दिष्ट आहे.


            राजेश्वरी चंद्रशेखर म्हणाल्या की, आगामी काळामध्ये युनिसेफने हवामान बदलावर कृती आणि तरुणांचा सहभाग हा प्रमुख कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवला आहे. राज्यभरातील आणखी २४ लाख तरुणांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत तरुणांना तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने पाणी, पर्यावरण आणि शाश्वततेच्या मुद्द्यांवर सामूहिक कृती करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवून ते उद्याचे जबाबदार नागरिक व्हावे, असा मानस आहे.


            या प्रकल्पात एनएसएस युनिट, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील तरुणांचा सहभाग असेल. तसेच मुंबई, पुणे, पालघर, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, सातारा, बीड या शहरांमधून आणि जिल्ह्यांमधून हवामान बदलासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे.


            शहरी भागातील पाण्याच्या वाढत्या समस्या आणि प्रदूषण लक्षात घेता ६० टक्के शहरी तरुणांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग असेल. या सहकार्यामुळे तरुणांना जलसंधारणाच्या क्षेत्रात विविध व्यावसायिक संस्थांसोबत काम करण्यासाठी प्रशिक्षण, फील्डवर्क आणि प्रत्यक्ष तज्ज्ञांबरोबर काम करण्याचा अनुभव मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या सहभागासाठी फेलोशिप, प्रमाणपत्रे, महाविद्यालयातील ग्रेड, ग्रीन स्किलिंग, मार्गदर्शन आणि केस स्टडीज आदी गोष्टी देण्यात येणार आहेत.


            जलसंवर्धन कार्यक्रम प्रत्यक्षात राबवताना नियमित निरीक्षण नोंदणी आणि अहवाल बनवण्यासाठी 'वॉटर फूटप्रिंट ऍप्लिकेशन डॅशबोर्ड विकसित करण्यात येईल. त्यात स्वयंसेवकांची भरती / नोंदणी डेटाबेस, तरुणांची संख्या आणि लोकांपर्यंत पोहोचल्याच्या नोंदी, कृती अहवाल आणि बचत केलेल्या अंदाजे पाण्याचे मोजणी आदींची शास्त्रशुद्ध मांडली केली जाणार आहे.


00000

हुतुतू तर पहाशेअर करा


 शेअर करा

रम्य ते बालपण





 

बालदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री रमले मुलांमध्ये..

 बालदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री रमले मुलांमध्ये..

पांढऱ्या रंगाचेच कपडे का, दाढी का ठेवता.. ? मुलांचे कुतूहल अन् मुख्यमंत्र्यांची खुमासदार उत्तरे

            मुंबई, दि. 14 : परळच्या क्षा.म.स. संस्थेच्या डॉ. शिरोडकर शाळेमधील विद्यार्थ्यांना आज बालदिनाची अनोखी भेट मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत आले.. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या..त्यांच्या मनातल्या प्रश्नांना थेट उत्तरे देताना मी याठिकाणी मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमच्यातलाच एक होऊन शाळेच्या आठवणी जागवायला आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकंदरीतच सुमारे तासभर चाललेल्या या बालदिनाच्या अनोख्या सोहळ्यात मुख्यमंत्री मुलांसोबत रमले.. त्यांच्यासोबत सेल्फी घेताना तेही त्यांच्यातलेच एक होऊन गेले.


            पांढऱ्या रंगाचे कपडेच का घालतात, दाढी का ठेवतात, शिक्षकांचा मार खाल्ला होता का..मुलांनी विचारलेल्या या भन्नाट प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी खुमासदार उत्तरे दिली.


            परळच्या डॉ. बोर्जेस रस्त्यावरील डॉ. शिरोडकर विद्यालयाच्या सभागृहात केजी पासून ते माध्यमिक वर्गापर्यंतचे विद्यार्थी जमले होते. निमित्त होते बालदिनाचे. मुख्यमंत्री सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास शाळेत आले. चिमुकल्यांनी स्वत: तयार केलेल्या शुभेच्छापत्रे, गुलाबाच्या फुलांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.


            बालदिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, एक विद्यार्थी म्हणून मी आज इथे माझ्या शाळेतल्या आठवणी जागवायला आलो आहे. बालपण महत्वाच असून त्यातला निरागसपणा सर्वांनी जपावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मोठं झाल्यावर जबाबदाऱ्या येतात त्यामुळे लहानपण देगा देवा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. अभ्यास करताना दडपण घेऊ नका असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.


शिक्षकांचा मार खाल्ला का..?


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना मुलांनी बिनधास्तपणे मनातले प्रश्न विचारले त्यालाही त्यांनी तितक्याच मोकळेपणाने उत्तरे देखील दिली. एका विद्यार्थीने मुख्यमंत्र्यांना आई-बाबांचा, शिक्षकांच्या हातचा मार खाल्ला का असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री हसले आणि त्यांनी ठाण्यातील किसननगर मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक 23 मधील आठवणी सांगितल्या. रघुनाथ परब नावाचे शिक्षक कसे शिक्षा करायचे याचा अनुभव सांगतानाच लहानपणापासून दुसऱ्याला मदत करण्याची आवड होती. समाजकारणातून राजकारणात आल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.


लग्नासाठी काढली दाढी..


            तुम्ही दाढी का नाही करत असा प्रश्न विचारल्यावर माझे गुरू धर्मवीर आनंद दिघे दाढी ठेवायचे त्यामुळे मी देखील दाढी ठेवली. लग्नाच्या वेळेस दाढी काढल्याचे सांगतानाच दाढीची कमाल आणि किमया सगळ्यांना माहित असल्याचे मुख्यमंत्री मिष्कीलपणे म्हणाले.



 


पांढरा रंग आवडतो कारण...


            मला पांढरा रंग आवडतो कारण तो सगळ्या रंगात सामावून जातो असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले तर मराठी शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मातृभाषेत शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मुलांचा ओढा वाढला पाहिजे, स्पर्धात्मक जगात मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.


मैदानी खेळ खेळावेत


            मला फुटबॉल, क्रिकेट खेळायला, पाहायला आवडतात. मैदानी खेळ नेहमी खेळायचो. आता मोबाईलच्या जमान्यात देखील विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. विद्यार्थी भविष्य असून ते या देशाचे, राज्याचा पाया असल्याचे सांगत विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्याचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री आपल्यातलेच एक होऊन गप्पा मारताय हे पाहून चिमुकल्यांनी निरागसपणे त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली.


००००



 




 



 

उपर वाले


 

वसुलीचे तंत्र


 

Featured post

Lakshvedhi