Thursday, 10 November 2022

मुंबई शहर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

 मुंबई शहर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

- जिल्हाधिकारी राजीव निवतकर

१२ आणि १३ नोव्हेंबर रोजी दिव्यांग आणि महिलांसाठी विशेष मोहीम.

            मुंबई, दि. ९ : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार आज ९ नोव्हेंबर रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून येत्या १२ व १३ नोव्हेंबर रोजी दिव्यांग व महिलांसाठी विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.


            आज प्रसिद्ध झालेली मतदार यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकनार्थ उपलब्ध असेल. यासंदर्भात दावे व हरकती दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. तर दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्याण पांढरे उपस्थित होते. 


            मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेअंतर्गत दि.१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिव्यांग आणि महिलांसाठी तसेच दि.२६ व २७ नोव्हेंबर, २०२२ रोजी तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींची नाव नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार असून भटक्या व विमुक्त जमातींच्या नागरिकांकडे वय व रहिवासाचा पुरावा नसल्यास स्वयंघोषणा पत्र घेतले जाईल.


            जिल्ह्यातील पदनिर्देशित ठिकाणी सर्व मतदारांसाठी १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ तसेच ३ आणि ४ डिसेंबर २०२२ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नवीन मतदार नोंदणीअंतर्गत १ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यात येणार असून ज्या नागरिकांचे वय दि. १ एप्रिल, दि. १ जुलै तसेच दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी १८ वर्षे पूर्ण होणार आहे, त्यांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.


            नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना क्र. ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७, नाव दुरूस्तीसाठी नमुना क्र. ८, परदेशस्थ भारतीयांसाठी नमुना क्र. ६ अ तसेच आधार नोंदणीसाठी नमुना क्र. ६ ब चा उपयोग करता येईल. तर, ऑनलाईन नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


            या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी, यासाठी जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.


00000

राज्याचे फुटवेयर आणि लेदर धोरण महिनाभरात बनणार

 राज्याचे फुटवेयर आणि लेदर धोरण महिनाभरात बनणार

- उदय सामंत

उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणार.

            मुंबई, दि. 9 : राज्यात फुटवेअर आणि लेदर क्लस्टर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक वाहन व अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राज्यामध्ये मुबलक प्रमाणात संसाधने उपलब्ध असून फुटवेयर आणि लेदरसंदर्भात येत्या महिनाभरात धोरण निश्चित होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.


            उद्योग उभारण्याबाबत उद्योगमंत्री श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली.


            उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून ज्या क्षेत्रासाठी राज्याची धोरणे निश्चित नाहीत अशा क्षेत्रासाठी तत्काळ धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच काही उपलब्ध धोरणांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. फुटवेअर अँड लेदर उद्योगांसाठी येत्या ३० दिवसांमध्ये याबाबत धोरण निश्चित झाल्यानंतर ‘फुटवेयर आणि लेदर क्लस्टर’ उभारण्यात येणार असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले, विदर्भामध्ये स्टील उद्योगासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या उद्योगांसाठी आवश्यक असणारी संसाधने आपल्याकडे असल्यामुळे स्टील उद्योगासंदर्भात धोरण निश्चित करून लवकरच काही जिल्ह्यांमध्ये स्टील पार्क उभारण्यात येणार आहे.


            श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करीत असून अधिकाधिक उद्योग राज्यात यावेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी काही नवीन धोरणांची निर्मिती करून सध्या असलेल्या धोरणांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.


            पर्यावरणपूरक असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात राज्य शासनाची भूमिका उद्योजकांना पूर्णपणे सहकार्य करण्याची आहे. नियोजित 'इलेक्ट्रिक व्हेईकल पार्क' ला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. त्याचप्रमाणे अन्न प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत असून राज्य शासनाकडून योग्य ते प्रोत्साहन देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.


            यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपिन शर्मा, उद्योजक, सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


००००

फॅशन स्ट्रीट वरील नुकसानग्रस्त दुकानदारांना

 फॅशन स्ट्रीट वरील नुकसानग्रस्त दुकानदारांना

मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत

दीपक केसरकर

            मुंबईदि. 9- मुंबई शहरातील फॅशन स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपड्यांच्या बाजारातील 23 दुकानांना शनिवार दि. 5 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

            मंत्री श्री.केसरकर यांनी आज फॅशन स्ट्रीट येथे जाऊन नुकसानग्रस्त दुकानांची पाहणी केली. त्यानंतर दुकानदारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. श्री.केसरकर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यासंदर्भात आपण चर्चा केली असून ज्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्व दुकानांचे सविस्तर पंचनामे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री मदत निधी कक्षास पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर संबंधित दुकानदारांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.’’

            रस्त्यावर व्यवसाय करताना अशा घटनेमुळे नुकसानग्रस्तांचे जीवनमान उध्वस्त होत असते. हे विचारात घेऊन त्यांना पुन्हा व्यवसाय करता यावा यासाठी ही मदत दिली जात असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

00000

पायाभूत सुविधा पुरवितानाच कोळीवाड्यांचे सुशोभीकरण करावे.

 पायाभूत सुविधा पुरवितानाच कोळीवाड्यांचे सुशोभीकरण करावे.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबई सौंदर्यीकरणाचा आढावा.

            मुंबई, दि. 9 : मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच शहरातील कोळीवाडे पर्यटनदृष्ट्या आकर्षणाचे केंद्रबिंदू व्हावेत यासाठी त्यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात आणि त्यांचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


            मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई सौंदर्यीकरणाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, पर्यटनदृष्ट्या मुंबईचे महत्व वाढविण्यासाठी या महानगरीचा कायापालट होणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांचे, हेरिटेज इमारतींचे, वाहतुक बेटं, चौक यांचे सुशोभीकरण मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. त्याला गती द्यावी.


            मुंबईतील कोळीवाड्यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात तसेच त्यांचे सौंदर्यीकरण करून कोळीवाडे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू होतील यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होईल. तेथील संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची ओळखही देशविदेशातील पर्यटकांना होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


            मुंबईतील पोलिस वसाहती, शासकीय रुग्णालये, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना निधी देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मुंबईतील वॉर्डमधील चौक, रस्ते, पदपथ, रस्ते यांवर सुशोभीकरण करतानाच गेट वे ऑफ इंडिया, हॅंगीग गार्डन, शहीद भगतसिंह रोड, फोर्ट, रिगल सिनेमा सर्कल आदी ठिकाणी थ्री डी होर्डींग्ज, डीजीटल फलक लावण्याबाबत यावेळी चर्चा झाली.


००००



राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची लवकरच निर्मिती

 राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची लवकरच निर्मिती ;

मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.

            मुंबई, दि. 9 : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार बच्चू कडू, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.


            राज्यात सध्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारित दिव्यांग कल्याण आयुक्तालय कार्यरत असून त्यामाध्यमातून दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते, सध्या दिव्यांगांच्या कार्यक्रम खर्चासाठी ११३० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पित केली आहे. लवकरच राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार आहे. या प्रस्तावित विभागासाठी मनुष्यबळ, साधनसामुग्री आणि इतर बाबींचा सविस्तर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार


            गाव-खेड्यांमधील दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग भवन तथा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि स्थानिक आमदार निधी यांच्या अर्थसहाय्याने हे दिव्यांग भवन बांधण्यात येणार असून त्याचा सर्वंकष आराखडा तयार करुन तो मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीमध्ये होणार वाढ


            दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही कमी असून ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती इतकी करण्यात येईल, त्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करणार


            अकोला आणि ठाण्याच्या धर्तीवर घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांची माहिती संकलित होऊन त्यांना योजनांचा लाभ देणे सुलभ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र परिवहन विभागाने ग्राह्य धरावे


            एसटी बस आणि बेस्ट बसमधून प्रवास करीत असताना दिव्यांगांसाठी दिलेले वैश्विक ओळखपत्र ग्राह्य धरले जात नसल्याने दिव्यांगांना अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र एसटी आणि बेस्ट बसने ग्राह्य धरण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुतिया यांना दूरध्वनीवरुन दिले. परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करतांना दिव्यांगांसोबतच्या व्यक्तींना ५० टक्के सवलत देण्यात येते, त्या सवलतीची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


            खाजगी क्षेत्रांमध्ये दिव्यांगांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी नियुक्त समितीने दिव्यांगांयोग्य नोकऱ्यांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना देतानाच वसतीगृहात निवासाची सुविधा न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ग्रामीण भागात ज्या दिव्यांगांच्या घरी शौचालयाची सुविधा नसेल तिथे शौचालय बांधण्यासाठी ग्रामविकास विभागाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरी देण्याच्या प्रस्तावावर मुख्य सचिवांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


दिव्यांग बांधवांजवळ जाऊन मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद


            दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत आमदार बच्चू कडू यांच्याबरोबर राज्याच्या विविध भागातून दिव्यांग आलेले होते. या सर्वांच्या समस्या, मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः दिव्यांगांच्या व्हीलचेअरजवळ जाऊन त्यांच्याशी संवाद साधला, त्यांची निवेदने स्वीकारली आणि या निवेदनांवर संबंधित विभागांना तत्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

जिवन गाणे







 

श्रीगणपतीला तुळस न वाहण्याचे कारण.*

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

  *श्रीगणपतीला तुळस न वाहण्याचे कारण.*


*पौराणिक कारण.*


*एक अप्सरा अति सुंदर होती. तिला उत्तम पती हवा होता. त्यासाठी ती उपवास, जप, व्रते, तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला गणपती दिसला. तिला तो फार आवडला; म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यसाठी तिने हाका मारल्या, ”हे एकदंता, हे लंबोदरा, हे वक्रतुंडा !” ध्यानाचा भंग झाल्यामुळे गणपतीने डोळे उघडले. तेव्हा त्याला अप्सरा दिसली. तो तिला म्हणाला, ”हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस?” ती म्हणाली, ”मला तू फार आवडला आहेस. मी तुझ्याशी विवाह करणार.” गणपती म्हणाला, ”मी कधीच विवाह करून मोहपाशात अडकणार नाही.” त्यावर अप्सरा म्हणाली, ”तू विवाह करशीलच, असा मी तुला शाप देते.” गणपतीने तिला प्रतिशाप दिला, ”तू पृथ्वीवर वृक्ष होशील.” अप्सरेला पश्चाताप होऊन ती म्हणाली, ”मला क्षमा कर.” गणपती म्हणाला, ”माते, कृष्ण तुझ्याशी विवाह करील व तू सुखी होशील.” ती अप्सरा पुढे तुळस बनली. गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही; म्हणून गणपतीला तुळस वाहत नाहीत.*


*फक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थीलाच श्रीगणपतीला तुळस वाहतात.*

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

Featured post

Lakshvedhi