Thursday, 10 November 2022

चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातीलवनक्षेत्रात कृषी पंपांचे दिवसभराचे भारनियमन रद्द

 चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातीलवनक्षेत्रात कृषी पंपांचे दिवसभराचे भारनियमन रद्द


            मुंबई, दि. 10 : चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्‍यात येईल, अशी घोषणा राज्‍याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे, उपमुख्‍यमंत्र्यांनी यासंबंधी तात्काळ सकारात्‍मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले आहेत.


            या जिल्ह्यांमध्ये दुपारच्‍या वेळी कृषी पंपांसाठी वीज भारनियमन करण्‍यात येत असल्‍यामुळे रात्रीच्‍या वेळी शेतकरी संबंधित कामांसाठी शेतात जातात. अशा वेळी वन्‍यप्राण्‍यांच्‍या होणा-या हल्‍ल्‍यात शेतक-यांचे बळी जाण्‍याचा घटनांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


            याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित होणार असून या माध्‍यमातून चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्‍हयातील शेतकरी, शेतमजूर बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.


००००

मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास शैक्षणिक, उद्योग कर्ज योजनांसाठी केंद्राकडून निधी


मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास

शैक्षणिक, उद्योग कर्ज योजनांसाठी केंद्राकडून निधी

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन


            मुंबई, दि. 10 : मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज तर उद्योग- व्यवसायासाठी मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून कर्जस्वरुपात निधी उपलब्ध झाला असून, या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.


            अल्पसंख्याक विभागाच्या शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 नोव्हेंबर रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीदिनापासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार असून, या कार्यालयांचे पत्ते व संपर्क महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या योजनांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्याक अधिकार दिनी कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. महामंडळामार्फत अल्पसंख्याकासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.


कर्ज योजनांचे स्वरुप


            केंद्र शासनाकडून मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमधून विविध कर्ज योजना राबविण्यात येणार असून, राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ, नवी दिल्ली यांनी या योजनांची दोन गटात विभागणी केली आहे.


शैक्षणिक कर्ज योजना


            शैक्षणिक कर्ज योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या गटात देशांतर्गत शिक्षणासाठी २० लाख रुपये तर विदेशातील शिक्षणासाठी ३० लाख रुपयांची कर्ज मर्यादा निश्चित केली आहे. पहिल्या गटात शहरी भागासाठी १.२० लाख तर, ग्रामीण भागासाठी ९८ हजार आणि दुसऱ्या गटात ८ लाख रुपयांची उत्पन्नमर्यादा आहे.


मुदत कर्ज योजना


            मुदत कर्ज योजनेसाठी पहिल्या गटात २० लाख तर, दुसऱ्या गटात ३० लाख रुपयांची कर्जमर्यादा असून उत्पन्नाची मर्यादा शैक्षणिक कर्ज योजनेप्रमाणेच निश्चित केली आहे.


सूक्ष्म पतपुरवठा योजना


            सूक्ष्म पतपुरवठा योजनेत पहिल्या गटात प्रत्येक सदस्य एक लाख रुपयांप्रमाणे २० सदस्यांच्या एका गटास २० लाखांपर्यंत तर दुसऱ्या गटात प्रत्येक सदस्य दीड लाखाप्रमाणे २० सभासदांना ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा आहे. या योजनेची उत्पन्न मर्यादादेखील शैक्षणिक आणि मुदत कर्ज योजनेसारखीच राहील.


००००

ग्रेट सल्यूट्स

 


'पालकमंत्री आपल्या भेटीला

 भांडूप पश्चिम येथे तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर ठेवून आरोग्य सुविधा द्या

- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

                     

            मुंबई, दि. १० भांडूप पश्चिम येथे तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर ठेवून तत्काळ नागरिकांना आरोग्य सुविधा मुंबई महापालिकेने द्याव्यात, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  दिले.

          भांडूप पश्चिम येथील के.ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार रमेश कोरगावकर तसेच सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले, भांडूप पश्चिम येथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून या परिसरातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून येथील नागरिकांना दिलासा मिळेल. ड्रीम्स सोसायटी येथे रेल्वे ट्रॅकच्या आवाजाची तीव्रता कमी होण्यासाठी मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी  तातडीने कार्यवाही करावी. मार्शल एस.आर.ए.सहकारी गृहनिर्माण संस्था प्रकल्पामध्ये २००० पूर्वीच्या खोट्या पावत्यांबाबत चौकशी करून ६० दिवसाच्या आत अहवाल सादर करावा. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शासनाच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे तत्काळ हटविण्याची कार्यवाही करावी, बेकायदेशीर पार्कींग, अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी. काही संस्था देशाविरोधी कारवाई करत असल्याच्या तक्रारी पाहता पोलीस प्रशासनाने याची चौकशी करून तातडीने याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.लोढा यांनी बैठकीत दिले.

       नागरिकांनी  विविध २२५ विषयांसंदर्भात आपले तक्रार अर्ज सादर केले.  यामधील  ८० अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर उपस्थित राहून प्रत्यक्ष समस्या मांडल्या. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. लोढा यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

        'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in  या संकेतस्थळावर तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात तक्रारीसाठी portal.mcgm.gov.in या लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.

0000

संध्या गरवारे/विसंअ/10.11.22


ग्रंथप्रेमींसाठी 16 नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’

 ग्रंथप्रेमींसाठी 16 नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’

          मुंबई, दि. 10 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ येत्या 16 व 17 नोव्हेंबर रोजी दादर (पू) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर ग्रंथ विक्री केंद्रास भेट देण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीने केले आहे.


             ”मुंबई शहर ग्रंथोत्सव 2022”चा कार्यक्रम मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, तिसरा मजला, शारदा मंगल कार्यालय, 172, नायगाव, दादर (पू) येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन, विक्री, ग्रंथदिंडी, परिसंवाद, व्याख्यान, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, लेखक, साहित्यिकांच्या ग्रंथसंपदासाठी ग्रंथ विक्री केंद्र उभारले जाणार आहेत.


            वाचनप्रेमींसाठी ही ग्रंथसंपदा वाचन व खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय मुद्रणालयाची विविध प्रकाशनं, राज्य मराठी विकास संस्था, दर्शनिका विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, साहित्य अकादमी, राष्ट्रीय पुस्तक न्यास इ. शासकीय संस्थांच्या विक्री केंद्रांचाही या ग्रंथोत्सवात समावेश असणार आहे.


कार्यक्रमांची रुपरेषा :


        बुधवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता शालेय विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर (पू) येथून निघणार असून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, गोविंदजी केणी रोड ते महात्मा फुले रोड तद्नंतर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय रोड मार्गे कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचणार आहे. दुपारी 2 ते 3.30 वाजेपर्यंत ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके जन्म शताब्दी वर्षानिमित्त कवी, साहित्यिक प्रवीण दवणे यांचे ‘कवितेतल्या शांताबाई’ या विषयावर व्याख्यान तर दुपारी 4 ते 5.30 वाजेपर्यंत सह्याद्री वाहिनीच्या वृत्त निवेदिका दीपाली केळकर यांच्या मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे आणि समृद्धी दाखवणारा “शब्दांच्या गावा जावे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


        गुरूवार दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मराठीतील दुर्मीळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे सचिव डॅा. दिलीप बलसेकर यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 वाजता भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 75 विद्यार्थ्यांना ग्रंथांचे वितरण माजी राज्यसभा सदस्य डॅा. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते होईल. सकाळी 11.30 ते 1 वाजेपर्यंत ‘वाचन संस्कृती - काल, आज आणि उद्या’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभागप्रमुख डॅा. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान आणि त्यानंतर दुपारच्या सत्रात ‘ग्रंथोत्सव का व कशासाठी’ याविषयावर परिसंवाद होणार असून यात ठाणे आणि मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, संजय बनसोडे, बांद्राच्या चेतना व्यवस्थापन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॅा. सिद्धी जगदाळे व माहिम सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यवाह सुषमा जोशी सहभागी होणार आहेत.


            ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात ग्रंथालयातील बालसभासद, सर्वसाधारण व ज्येष्ठ नागरिक सभासद, वाचक, पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेत मुंबई केंद्रातील गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचा प्रातिनिधिक सत्कार केला जाणार आहे. त्यांनतर ग्रंथोत्सव कार्यक्रमाचा समारोप होईल.


            या ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेखक अच्युत गोडबोले असून खासदार राहुल शेवाळे, आमदार कालीदास कोळंबकर, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील, सहायक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती आयोजक जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड यांनी दिली आहे.


००००

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी

 पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी १६१ गावांच्या

क्लस्टर एसटीपी प्रकल्पाबाबत समन्वयाने नियोजन करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण, नागरी प्रश्नांचा बैठकीत आढावा

            मुंबई, दि. 9 :- नवनिर्मित इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांना विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपालिकांमधील बाजारपेठेतील महत्वाच्या रस्त्यांचा विकास, पाणी पुरवठा तसेच या परिसरातील वस्त्रोद्योगासह, पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            ऐतिहासिक माणगांव परिषदेच्या शताब्दी महोत्सवासाठी आणि वाटेगाव (ता. शिराळा) येथील अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी उत्कृष्ट नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पंचगंगा नदीकाठच्या १६१ गावांच्या सांडपाणी प्रक्रियेसाठी क्लस्टर एसटीपी पद्धतीने आराखडे तयार करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

            हातकणंगले मतदारसंघातील ग्रामीण आणि नागरी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मंत्रालयात झालेल्या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते. तसेच सांगली अन्य नगरपालिकांचे मुख्याधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, इचलकरंजी ही नवनिर्मित महानगरपालिका आहे. या महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसह या परिसरातील विविध नगरपालिकांमधील विकासकामांना विविध योजनांमधून निधी देताना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या विविध कामांसाठी, प्रकल्प आणि योजनांसाठी प्रस्ताव वेळेत सादर केले जावेत. प्रत्यक्ष कामांमध्येही दर्जावर लक्ष दिले जावे. या परिसरातील पर्यटन संधीविषयी आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागाने तज्ज्ञांची मदत घ्यावी. शिवराज्य भवन या योजनेतील कामांसाठी बांधकाम विभागाच्या सहभागातून एक टाईप प्लॅन तयार करून घ्यावा. जेणेकरून सर्वत्र एकाच प्रकारच्या इमारती व सुविधा निर्माण करता येतील. नगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठांधील मुख्य बाजारपेठांच्या रस्त्यांचा मॉडेल पद्धतीने विकास करता येईल. त्यासाठी सुशोभिकरणासह उत्कृष्ट नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


            पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. विशेषतः गडकोट-किल्ल्यांच्या अनुषंगाने एक आराखडा तयार करता येईल. सातारा आणि कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा मोठा आहे. अन्य राज्यांमध्ये अशा पद्धतीने पर्यटन प्रकल्प राबविले जातात. त्याच धर्तीवर या दोन्ही जिल्ह्यांच्या समावेशासह प्रकल्प राबविल्यास मोठ्या पर्यटन क्षेत्राचा विकास होईल. त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील.


            खासदार श्री. माने यांनी हातकणंले लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील विविध नगरपालिका तसेच क्षेत्रातील मुद्द्यांची मांडणी केली. त्यांनी रोजगार हमी योजना तसेच रस्त्यांसह पायाभूत विकासाबाबतची मांडणी केली.


            यावेळी हातकणंगले नगरपंचायतीसह, हुपरी, शिरोळ या नगरपालिकांना प्रशासकीय इमारतींसाठी निधीची उपलब्धता, इचलकरंजी महानगरपालिकेचा आकृतीबंध, शहरातील संभाजी महाराज पुतळा उभारण्याचा प्रकल्प, सेफ सिटी प्रकल्पातील कॅमेरे बसविण्याचा पुढचा टप्पा, खिद्रापूर मंदिराच्या समावेशासह पर्यटन आराखडा तयार करणे, पन्हाळा-शाहूवाडी-आंबा टूरिस्ट सर्कीट, जयसिंगपूरसह विविध नगरपालिकांसाठी मंजूर रस्ते, सांडपाणी निचरा प्रकल्पांसाठीचा निधी आणि आराखडे, नगरपालिकामध्ये बाजारपेठांतील रस्त्यांचा विकास, इस्लामपूर, आष्टा येथील भूयारी गटारे, समाजकल्याण विभागाचे संविधान भवन, तसेच शिवराज्य भवन, शिराळा येथील संभाजी महाराजांचा भुईकोट किल्ल्याचा विकास याबाबतची चर्चा झाली.


            वस्त्रोद्योग उद्योजकांच्या अडचणी तसेच वीज बिल आणि छोट्या यंत्रमागधारकांच्या प्रश्नावर वस्त्रोद्योग, ऊर्जा विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.


००००



जिवन गाणे

 




Featured post

Lakshvedhi