सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 9 November 2022
हनुमानाचाप्रसाद
#हनुमानाचाप्रसाद 🚩🚩
एक तरुण नगरसेवक.. त्याकाळात साधारणत: ९० च्या त्या दशकात अगदी कमी वयात नगरसेवक होण्याचा मान मिळविणारा तो तरुण..
आपल्या पहिल्याच टर्म मध्ये मिळालेल्या त्या संधीच सोन करत या तरुणाने अतिशय दिमाखदार अशी कामगिरी करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आपलं नेतृत्व अधोरेखित केलेलं होत..
त्या तरुणाची पहिली टर्म संपली आणि मनपाच्या पुढील पंचवार्षिक निवडणुका लागल्या..
त्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर झाली आणि त्या तरुणाच्या प्रभागातील ४ पैकी ३ जागा या महिलांसाठी तर राहिलेली १ जागा एका प्रवर्गासाठी राखीव झाली..
या नवीन प्रभाग रचनेमुळे या तरुणाला आपला हक्काचा प्रभाग गमवावा लागला..
नवीन प्रभाग रचनेमुळे आत्ता जरी आपल्याला संधी नाही मिळाली तरी हरकत नाही कारण आपलं वय आत्ता फक्त २६ आहे आणि आपल्याला पुढे अजुन बरीच वर्षे आहेत त्यामुळे आत्ता आपण थांबूया आणि पुढच्या वेळी संधी मिळाल्यास निवडणूक लढवूया हा निर्णय आपल्या मनात त्या तरुणाने पक्का केला होता..
त्याकाळात 'प्रकाशजी' नावाचे एक सदगृहस्थ त्या शहरात एक ज्येष्ठ नगरसेवक म्हणून कार्यरत होते..
प्रकाशजी आपल्या प्रभागात कधी रात्री हातात काठी घेऊन शिट्टी वाजवत पेट्रोलिंग करायचे तर दररोज न चुकता सकाळी पहाटे पाच वाजता शिट्टी वाजवत फिरायचे..
प्रकाशजी म्हणजे जनतेच्या मनात घर केलेलीच व्यक्ती..
आपल्या कामामुळे सामान्य जनतेला प्रकाशजी म्हणजे आपल्याच घरातील व्यक्ती वाटतं असत..
एक दिवस प्रकाशजींनी या तरुण नगरसेवकाला सहजच विचारले की, "काय रे तुझ्याकडे स्कुटर आहे का?"
त्यावर त्या तरुणाने "हो आहे की.." असं उत्तर देताच प्रकाशजी लगेच म्हणाले "ठीक आहे.. मग संध्याकाळी तुझ्या स्कुटर वरून आपण दोघे मंदीरात जाऊया.."
ठरल्याप्रमाणे प्रकाशजी आणि तो तरुण संध्याकाळी त्याकाळी शहराच्या बाहेर असणाऱ्या एका टेकडीसारख्या भागावरील हनुमान मंदीरात गेले..
तिथे जाताना त्यांनी हार, फुले आणि नारळ घेतला..
मंदीरात जाताच प्रकाशजींनी तो घेतलेला नारळ त्या तरुणाच्या हातात दिला आणि तो त्या तरुणाच्या हातानेच फोडायचा आग्रह केला..
पण हे करत असतानाच प्रकाशजी अगदी अनपेक्षितपणे त्या तरुणाला म्हणाले, "तू नारळ फोडतोयस खरा पण या हनुमाना समोर मला वचन दे की, तू नारळ फोडल्यावर मी तुला जे काही सांगेन ते तुला ऐकावंच लागेल.."
यावर त्या तरुणाच्या चेहऱ्यावर थोडे आश्चर्यकारक भाव उमटले आणि एका क्षणात मनात विचार आला की, वयाच्या मानाने आपली तब्ब्येत जरा जास्त आहे त्यामुळे कदाचित प्रकाशजी आपल्याला म्हणतील की, उद्यापासून तू स्कुटर अजिबात वापरायची नाही त्याऐवजी सायकल वरूनच फिरायचं..
आता उद्यापासून आपली स्कुटर बंद आणि सायकल सुरु अशी क्षणार्धात आपल्या मनाची तयारी करून त्या तरुणाने प्रकाशजी जे काही सांगतील ते ऐकायची मानसिकता करुनच प्रकाशजींना वचन स्वीकार केल्याचा होकार दिला..
त्या तरुणाने नारळ फोडला आणि हातात प्रसाद घेऊन ते दोघे मंदिराच्या आवारात फिरत फिरत गप्पा मारत बसले..
गप्पा ऐन रंगात आल्या आणि अखेर प्रकाशजींनी मुख्य विषयाला हात घातला..
प्रकाशजी म्हणाले, "मी अनेक वर्षे सक्रिय राजकारणात आहे.. या काळात मी अनेक प्रकारची लोक बघितली.. त्यात तुझी गेल्या ५ वर्षांतील आपल्या पहिल्याच नगरसेवक पदाच्या टर्म मध्ये केलेलं काम पण अतिशय जवळून पाहिलयं..
माझा निर्णय झालाय.. माझं आता वय झालंयं.. त्यामुळे मी आता सक्रीय राजकारणातुन निवृत्ती घेत आहे.. तुझ्या सारखं व्हिजन असणारे तरुण राजकारणात यायला पाहिजेत आणि टीकायला पाहिजेत.. मला माहिती आहे तुझा प्रभाग आरक्षित झाल्याने तुला यावेळी निवडणूक लढवायला थोडीशी अडचण नक्की आहे आणि म्हणूनच तू आता माझ्या जागी येत्या मनपा निवडणुकीला उभं रहावं.."
यावर त्या तरुणाने प्रकाशजींना अतिशय नम्रतापूर्वक आपण अजुन उमदे असल्याने पुढे आपल्याला अजुन बरीच वर्षे मिळणार आहेत आणि त्यामुळे यावेळी आपण स्वतःच निवडणूक न लढविता थांबण्याची इच्छा अगदी स्पष्टपणे सांगितली..
तो तरुण हे सांगत असतानाच त्याला मध्येच थांबवत प्रकाशजी म्हणाले, "हे बघ, नारळ फोडताना मी जे काही सांगेन ते तू ऐकणार आहेस हे वचन तू मला दिले आहेस...."
हे सांगत असतानाच प्रकाशजींनी फोडलेल्या नारळाच्या खोबऱ्याचा एक तुकडा प्रसाद म्हणून त्या तरुणाच्या हातावर ठेवला आणि ते म्हणाले, "बेटा, ज्या प्रमाणे हा खोबऱ्याचा प्रसाद आहे अगदी त्याच प्रमाणे मी मनपा निवडणुकीसाठी माझी जागा ही तुझ्यासाठी सोडली आहे हा सुद्धा या हनुमानानेच तुला दिलेला प्रसाद आहे असं समज.."
अखेर दिलेल्या वचनाप्रमाणे त्या तरुणाला प्रकाशजींचे हे म्हणणे ऐकावेच लागले आणि त्याप्रमाणे त्या तरुणाने ती मनपा निवडणूक लढवली..
आणि तो तरुण ती निवडणूक लढवून सलग दुसऱ्यांदा नगरसेवक झाला.. नुसता नगरसेवकच न्हवे तर तो तरुण त्यावेळी "महापौर" झाला..
आपल्या शहराचा सर्वाधिक तरुण महापौर तसेच देशाच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक तरुण महापौर होण्याचा बहुमान त्या तरुणाने त्यावेळी मिळविला..
आपल्या वैयक्तिक निर्णयानुसार तो तरुण त्याचवेळी आपली पहिली टर्म झाल्यावर निवडणूक लढविण्यापासून थांबला असता तर कदाचित पुढे जाऊन त्या तरुणाच्या राजकीय कारकिर्दीला तिथेच ब्रेक सुद्धा लागू शकला असता..
पण प्रकाशजी आणि टेकडीवरच्या हनुमानाचा तो प्रसाद यामुळेच त्या तरुणाची राजकीय कारकीर्द ब्रेक न लागता पुढे अखंड सुरु राहिली..
सलग दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्यावर त्या तरुणाला 'महापौर' पद तर मिळालेच पण अवघ्या दोन अडीच वर्षांतच पक्षातर्फे विधानसभेची उमेदवारी सुद्धा मिळाली..
त्या तरुणाने त्यावेळी विधानसभेच्या आपल्या त्या पहिल्याच प्रयत्नात विधानसभा निवडणूक जिंकून सुरु केलेली आपली 'आमदार' पदाची घोडदौड मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशी विविध पदे भुषवित आज सलग पाचव्यांदा अगदी सुसाट सुरु आहे..
तो तरुण म्हणजे आपले "देवेंद्रजी फडणवीस....!!"
आणि टेकडीवरच्या हनुमानाने प्रसाद दिलेलं मंदीर म्हणजे नागपुरात सिव्हिल लाईन रोडने गेल्यावर पुढे येणारे "तेलंखेडी हनुमान मंदीर.."
देवेंद्रजींनी ही घटना स्वतःच एकदा बोलताना सांगितलेली.. तेंव्हापासून ही घटना लिहिण्याची आणि एकदा त्या मंदीरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेण्याची मनोमन इच्छा होती..
काही कामानिमित्त नागपूरला जाण्याचा योग आला आणि तिथे गेल्यावर हनुमानाचे दर्शन घेऊनच ही पोस्ट लिहित आहे..
- मयूर कुपाडे
#mayurkupade
#जयश्रीराम
Devendra Fadnavis जी 🚩🚩
लंपी चर्मरोगामुळे मृत्युमुखी
लंपी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या 3973 पशूंच्या नुकसान भरपाईचीरक्कम त्यांच्या पालकांच्या खात्यांवर जमा.
मुंबई, दि.8: राज्यात आजपर्यंत लंपी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3973 पशूंच्या नुकसान भरपाईची रु. 10.23 कोटी इतकी रक्कम त्यांच्या पालकांच्या खात्यांवर जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
श्री सिंह म्हणाले, "राज्यामध्ये दि. 8 नोव्हेंबर 2022 अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3428 संसर्ग केंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 216642 बाधित पशुधनापैकी एकूण 148262 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 14259 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण 136.96 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 97.88 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.
श्री.सिंह यांनी आवाहन केले आहे की, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने दि. 7 ऑक्टोबर, 2022 रोजी कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि.17.10.2022 रोजी दिलेल्या सुधारित उपचार प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.
दि.28.10.2022 रोजीच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृतीदलासमवेत दूरदृष्यप्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लंपी चर्मरोगाने बाधित नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पूर्वनिर्धारित केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही श्री.सिंह यांनी केले आहे.
- - - 000 - - -
राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे
राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटवावित
- मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खता
मुंबई दि.8, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी दिनांक 12 नोव्हेंबर, 2022 रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खता यांनी केले. मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर व जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एस्.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, चर्चगेट येथे आयोजित मेगा लिगल सर्विस कॅम्प या महाशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या महाशिबीरात राष्ट्रीय राज्य विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व शासनाच्या विविध विभागतील योजनांचा प्रसार व प्रचार होण्याच्या दृष्टीने स्टॉल्स मांडण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष एस. व्ही. गंगापूरवाला ,नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम्, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव दिनेश सुराणा, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उप-सचिव मिलिंद तोडकर, कौटुंबिक न्यायालय अध्यक्ष, मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रमुख न्यायाधीश स्वाती चौहान, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपस्थित होते.
जनतेसाठीच्या विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी नवीन अॅप लवकरच सुरु करणार असल्याचे मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी यावेळी सांगितले.
मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या स्वाती चौहान यांनी मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल सुब्रमण्यम् म्हणाले की,प्रत्येक नागरिकाला विधी सहाय व सेवा मिळण्याकरिता जास्तीत जास्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करुन तळागाळातील जनतेपर्यंत या योजनेचा लाभ पोहचावा.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या MARCH FOR ACCESS TO JUSTICE रॅलीमध्ये विधी महाविद्यालयातील विदयार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
- - - 000 - - -
Tuesday, 8 November 2022
महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा जुरी पुरस्कार प्रदान
महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा जुरी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 8 : महाराष्ट्राला ‘टॅक्स इंडिया ऑनलाईन (टीआयओएल)’चा जुरी (निवड समिती) पुरस्कार तामिळनाडू राज्याचे वित्तमंत्री पलानीवेल त्यागराजन यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला.
जीएसटीचे विशेष आयुक्त अनिल भंडारी, संयुक्त आयुक्त जी. श्रीकांत, स्वाती काळे, संजय निकम, श्री. पोपळघाट यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. मुंबई आणि पुणे झोनला यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यसभा सदस्य सुशील मोदी, पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्सच्या माजी अध्यक्ष प्रवीण महाजन, तसेच देशभरातील विविध नामवंत संस्थांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र कर संकलनाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवरील राज्य राहिलेले आहे. मागील वित्तीय वर्षात दोन लाख 18 हजार कर संकलन करून महाराष्ट्राने देशाच्या कर संकलनात जवळपास पंधरा टक्के योगदान दिले आहे. तसेच वर्ष 2022-23 मध्ये आत्तापर्यंत एक लाख 55 हजार विक्रमी कर संकलन केले आहे.
इज ऑफ डूइंग बिजनेस ( Ease of doing business ) मध्ये महाराष्ट्राचा जीएसटी विभाग नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्रात रिफंड प्रक्रिया नेहमी वेळेवर आणि जलद गतीने होते. व्यापाऱ्यांची नोंदणीही सुलभ आणि वेळच्या वेळी होत असल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळतो. प्रामाणिक व्यापाऱ्याला महाराष्ट्र जीएसटी विभागातर्फे नेहमीच मदत केली जात असून योग्य सेवा जलद गतीने पुरविल्या जातात. बहुतांशी सर्व सेवा सुविधा जसे नोंदणी, दुरुस्त्या, परतावा (रिफंड) आता ऑनलाईन झालेले आहे.
महाराष्ट्र जीएसटी विभागात व्यापाऱ्याच्या तक्रारीची ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली व वास्तविक वेळेच्या आधारावर (Grievance redresses online and on real time basis) ताबडतोब दखल घेतली जाते. महाराष्ट्र शासनाने अमलात आणलेली अभय योजना एक यशस्वी योजना म्हणून ओळखली जात असून प्राप्त झालेले एकूण दोन लाख अठरा हजार चारशे सहा अर्ज निकाली काढण्यात आले.
उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आयुक्त वस्तू व सेवा कर, राजीव मितल यांच्या नेतृत्वात कर संकलनामधे सर्वात जास्त वाढ असलेले राज्य [highest growth in tax collection] म्हणून महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे.
- - - 000 - - -
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...






