सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 21 September 2022
नोडल अधिकारी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 20 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा विभागाच्या संदर्भात सुरु असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली आहे. मंत्री श्री. पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत तातडीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे निर्देश दिले.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेतच विद्यापीठ प्रशासनाने सोडवल्या पाहिजे. यासाठी तातडीने नोडल अधिकारी नियुक्त करावा. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेत सुटतील.
लम्पी नियंत्रणासाठी
लम्पी नियंत्रणासाठी जनावरांच्यासरसकट लसीकरणास शासनाची मान्यता
मुंबई, दि. 20 : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लम्पी प्रतिबंधासाठी एकूण ४९.८३ लाख लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ कि.मी. परिघातील १२२९ गावातील १९.५५ लाख जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले असून गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने जनावरे असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. शासनाने राज्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात सरसकट लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
श्री सिंह म्हणाले, लम्पी आजार केवळ जनावरांमध्ये आढळून येतो. देशातील आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे पशुपालकांनी अनावश्यक भीती न बाळगता आवश्यक खबरदारी घ्यावी.
लम्पीबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ वर तत्काळ संपर्क साधावा, असे श्री. सिंह यांनी सांगितले.
प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम ४(१) नुसार जनावरात या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संबंधित माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. गावस्तरावरून अशी माहिती संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचांनी न चुकता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयास कळवावी. लम्पी चर्म रोगाची लक्षणे दिसल्यास, जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने / पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन मोफत उपचार करून घेण्याचे पशुपालकांना आवाहन करण्यात आले आहे.
लम्पी हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी त्वरित उपचार सुरू केल्यास तो निश्चितपणे बरा होतो. सध्या या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. मात्र त्यांनी लम्पी रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये.
राज्यामध्ये दि. २० सप्टेंबर, २०२२ अखेर जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर हिंगोली व रायगड अशा २७ जिल्ह्यामधील एकूण १२२९ गावांमध्ये फक्त ११,२५१ जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे त्यापैकी ३८५५ जनावरे उपचाराच्या माध्यमातून रोगमुक्त झाली आहेत.
उर्वरित बाधितांसाठी लस देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि. २० सप्टेंबर रोजी २५ लाख लस मात्रा प्राप्त होणार आहेत. बाधित जिल्ह्यातील जळगाव १२२, अहमदनगर ३३, धुळे १२, अकोला ५४, पुणे २५, लातूर ५, औरंगाबाद ८, सातारा १५, बुलडाणा २५, अमरावती २९, कोल्हापूर ९, सांगली २, वाशिम ४, जालना २, ठाणे ३, नागपूर ३ व रायगड १ अशा ३५२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
दि. २० सप्टेंबर रोजी रोग प्रादुर्भावग्रस्त ८ जिल्ह्यामधील गंभीर जनावरांवर उपचार व मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठातील भिषकशास्त्रातील तज्ज्ञांची १९ पथके नियुक्त करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील ६ पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ दररोज सायं ४ ते ५ दरम्यान दृकश्राव्य माध्यमांद्वारे अधिकाऱ्यांना गंभीर प्रकरणांबाबत मार्गदर्शन व उपचारामध्ये मदत करीत आहेत.
0000000
आरे दुग्ध वसाहत प्रक्षेत्रातील लम्पी त्वचारोग संसर्ग ठिकाणापासून
10 किमीपर्यंत बाधित क्षेत्र म्हणून घोषित
- मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी
मुंबई, दि. 20 : मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांचे आरे दुग्ध वसाहत येथील प्रक्षेत्रातील जनावरांमध्ये लम्पी त्वचारोग या साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आल्याने पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रक्षेत्र या संसर्ग केंद्रापासून (Epicentre) १० किलोमीटर पर्यंत बाधित क्षेत्र (Infected zone) म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.
श्रीमती चौधरी म्हणाल्या, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांचे आरे दुग्ध वसाहत येथील प्रक्षेत्रातील जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोग आजाराचे जनावरे आढळून आले आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, मुंबई उपनगर जिल्हा प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार प्राप्त अधिकारातून आरे दुग्ध वसाहत येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रक्षेत्र या संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटर पर्यंत बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
लम्पी रोगाने बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करुन १० किलोमीटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतुक, बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. वरील ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स (Goat Pox) लसीकरण तत्काळ करण्यात यावे. याकरिता उपआयुक्त पशुसंवर्धन (गुणनियंत्रण), यांनी आरे दुग्ध वसाहत येथे, व बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पशुवैद्यकीय विभाग यांनी आरे दुग्ध वसाहत वगळून मुंबई उपनगर जिल्हा येथे नियोजन करून १०० टक्के लसीकरण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
000000000
प्रवेशद्वार आरोग्य सेवेचे
महाराष्ट्र दर्जेदार, समग्र आरोग्यसेवेचे प्रवेशद्वार
- पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र दर्जेदार आणि समग्र आरोग्यसेवेचे प्रवेशद्वार आहे. भारताच्या आरोग्य पर्यटन बाजारपेठेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. राज्य आरोग्यसेवेच्या पर्यटन क्षेत्रात सतत चांगले बदल करीत असल्यामुळे महाराष्ट्र आरोग्य आणि उपचारांसाठीचे एक पसंतीचे ठिकाण बनले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी धर्मशाला येथे आयोजित राष्ट्रीय पर्यटन परिषदेत केले.
हिमाचल प्रदेश येथे धर्मशालामध्ये केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन सोमवारी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. आज दुसऱ्या दिवशी या राष्ट्रीय परिषदेस राज्याचे पर्यटन मंत्री श्री. लोढा यांच्यासह इतर 11 राज्यांचे पर्यटन मंत्री परिषदेस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
श्री. लोढा यांनी सांगितले, आरोग्य पर्यटन क्षेत्राशी निगडीत पायाभूत सुविधा राज्यात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे आरोग्य पर्यटन क्षेत्रात पहिल्या पसंतीचे राज्य आहे. राज्यात 4 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. 2 प्रमुख बंदरे तर 53 छोटी बंदरे आहेत. जवळपास राज्यात दिड लाख परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचारी वर्ग आहे. शीर्ष वैद्यकीय पर्यटन स्थळांपैकी महाराष्ट्र हे एक प्रमुख आहे. 500 च्या जवळपास योग केंद्र, 1400 रूग्णालय, 1 लाखाच्यावर कौशल्यपूर्ण डॉक्टर्स आहेत. 65 आयुर्वेदिक विद्यालय असल्याची माहिती मंत्री श्री. लोढा यांनी परिषदेत दिली.
श्री. लोढा पुढे म्हणाले, राज्यात ऑर्थोपेडिक आणि सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी बायपास, कृत्रिम गर्भधारणा, कॉस्मेटिक शस्त्रक्रिया, दंत प्रत्यारोपण, कर्करोग उपचार (रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि इतर प्रगत तंत्रज्ञान), नेत्ररोग शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण अशा अवघड शस्त्रक्रियांसाठी तसेच इतर आरोग्यसेवांसाठी राज्यात अनेक नामांकित खासगी तसेच शासकीय रूग्णालये असल्याची माहिती ही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी दिली.
आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण संस्था राज्यात असल्याची माहिती देत मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले, मुंबईत योगसंस्था, इगतपुरीला (नाशिक) निसर्ग उपचार पद्धती, पुणे येथे अय्यंगार योग, गोराई (मुंबई) विपश्यना ध्यान साधना केंद्र, मिकी मेहता यांचे आरोग्य केंद्र, नागपूरला मेडीसीटी, पुण्याला सुविश आरोग्य केंद्र असे राज्यातील विविध ठिकाणी विविध आरोग्याशी निगडीत संस्था असल्याची माहिती दिली.
००००
लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील पाणी पुरवठा योजना व शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण.
जळगाव दि. 20 (जिमाका) :- पाळधी येथे महाराष्ट्रातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 22 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन तसेच शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, राजू भोळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरणगाव येथे ट्रामा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय उभारावे, अशी मागणी केली असता सदर ट्रामा केअर उभारण्याबरोबरच इतर आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. पाळधी गावात 50 खाटांचे ट्रामा सेंटर, पाळधी पोलीस स्थानक, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य उद्यानाची उभारणी करणे, असोदा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक उभारणे, तसेच इतर विकास कामांसाठी देखील सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच कोळी समाजाचे प्रश्न देखील प्राधान्याने सोडविले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले
0000000
कालबाह्यतेचा सापळा... उघडा डोळे
*कालबाह्यतेचा सापळा...*
जानेवारी १९२५...
स्वित्झर्लॅंडच्या जिनिव्हा या शहरामध्ये एक खास उद्योगसमूहाने एक गुप्त सभा आयोजित केली गेली होती.
विजेवर चालणारे प्रकाशदिवे (बल्ब) बनवणारे सर्व आघाडीचे उत्पादक त्या मिटींगमध्ये सहभागी झाले होते.
बल्बचा शोध लागून एव्हाना नव्वद वर्ष झाली होती.
सुरुवातीच्या काळातले बल्ब अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अल्पायुषी होते पण त्यात प्रचंड सुधारणा होत गेल्या.
१९२० पर्यंत तब्बल अडीच हजार तासांचे आयुष्य असणारे दर्जेदार आणि दिर्घायुषी बल्ब बाजारात उपलब्ध व्हायला लागले होते.
जनता बल्बवर खुश होती पण कोणालातरी बल्बचे इतके दिर्घजीवी असणे खटकत होते.
ते कोण होते?
साक्षात बल्ब उत्पादक...
कारण त्यांना वाटत होते की प्रत्येक आवृतीनंतर बल्बचे आयुष्य वाढत जाणे हे त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे.
जिनिव्हाच्या त्या मिटींगमध्ये इंटरनॅशनल जनरल इलेक्ट्रील, ओसराम, फिलिप, टंगस्राम, असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्टिज या सर्व जागतिक आघाडीच्या बल्बनिर्मात्यांनी एक गुप्त करार केला.
आपल्या दिर्घकालीन हितासाठी आणि येणाऱ्या काळात भरघोस नफा मिळवण्यासाठी ते सर्वजण मिळून निकृष्ट दर्जाच्या अल्पायुषी बल्बचीच निर्मिती करतील.
त्या सर्वांनी या कराराचे इमानेइतबारे पालनही केले.
पुर्वी अडीच हजार तास चालणारे बल्ब बाजारातून नामशेष झाले.
१९२५ नंतर बाजारात येणारे बल्ब फक्त एक हजार तास चालू लागले.
आयुष्य घटले आणि साहजिकच बल्बची मागणी वाढली.
खप वाढला.
निकृष्ट दर्जाचे बल्ब आधीच्या किंमतीत विकून कंपन्यांनी ग्राहकांना मनसोक्त लूटले होतेच.
आता आयूष्यमान कमी झाल्यामूळे विक्रीही दुप्पट तिप्पट झाली. बल्ब विक्रेत्यांची चांदीच चांदी झाली.
उत्पादनाचा दर्जा घसरवुनही पैसे कमवता येतात हे नवेच गुपित उद्योगजगताला माहीत झाले. बल्ब कंपन्यांच्या त्या एकत्र येऊन सापळा रचणाऱ्या कंपन्यांना *फिबस कार्टेल* या नावाने ओळखले जाऊ लागले.
वस्तूंचा दर्जा घसरावून पैसे कमवण्याच्या त्यांच्या क्लृप्तीला म्हणतात *प्लॅन्ड ओबसोलेसेंस*.
खरंतर हा सापळा आहे.
मराठीत याला *नियोजित अप्रचलन* असे म्हणता येईल.
सोप्या शब्दात एखादी वस्तू लवकर कालबाह्य करुन ग्राहकाला पुन्हा एक नवी खरेदी करायला भाग पाडणे असे याचे वर्णक करता येईल.
दहा पंधरा वर्षापुर्वीचे मोबाईल फोन चांगले पाच पाच वर्ष चालायचे.
हल्ली मात्र कितीही भारीचा घेतला तरी एक स्मार्टफोन दोन तीन वर्षापेक्षा जास्त टिकूच शकत नाही.
कारण तेच.
*नियोजित अप्रचलन.*
जाणून बुजून फोनची रचनाच अशी केली जाते की तीन चार वर्षात फोन निकामी व्हावा.
जुन्या उत्पादन टिकाऊ असेल तर कंपनीने निर्माण केलेले नवे उत्पादन कोण घेईल?
लाखो कोटी रुपयांचा बिजनेस हवा असेल तर पुर्वीच्याच ग्राहकांना पुन्हा खरेदी करायला भाग पाडले पाहिजे.
आजची बहूतांश उत्पादने याच धर्तीवर बनवली जातात.
पुर्वीचे टीव्ही वीस वीस वर्ष चांगले चालायचे.
आताच्या एल ई डी मधे पाच सात वर्षात पट्ट्यापट्ट्या दिसायला लागतात.
१००० वेळा पुन्हा पुन्हा दाढी करता येईल आणि स्वच्छ करुन पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा टिकाऊ ब्लेड बनवण्याचे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे पण कोणतीही नामांकित कंपनी तशा प्रकारच्या ब्लेड बनवण्यात पुढाकार घेत नाही.
कारण मग सोन्याची अंडी देणारा बिजनेस कायमचा बसेल.
लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती.
आता पेन कचऱ्यात फेकून नविन पेन घ्यायची प्रथा रुजली आहे.
आजही जेव्हा पेनच्या रिफिलचा शोध घेतो तर बहूतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत.
कारण तेच.
मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल?
या नियोजित अप्रचलन नावाच्या विकृत व्यापार फंड्यामूळेच 'वापरा आणि फेका' नावाचा भस्मासुर जन्माला आला.
सुंदर निसर्गाचे एका विशाल कचराकुंडीत रुपांतर व्हायला लागले.
कपडे विटले, फेकून द्या. शुज उसवले, फेकून द्या.
लॅपटॉप खराब झाला, दुरुस्तीऐवजी नवाच घ्या. इस्त्री चालेना झाली, नवीन घ्या.
मिक्सर बिघडला, नवीन घ्या.
वॉशिंग मशीन खराब झाली, नवे मॉडेल घ्या.
पंधरावीस वर्षांखालच्या गाड्यांचे स्पेअरपार्ट मिळत नाहीत आणि उपभोक्ता कंटाळून गाडी कवडीमोल भावात विकून नवी गाडी घेण्याच्या तयारीला लागतो.
एकदा माऊस किबोर्ड खराब झाला की फेकून द्यावा लागतो.
लाईटच्या माळा, चार्जर, हेडफोन इत्यादी इलेक्ट्रीक उपकरणांना दुरुस्त करणे ही संकल्पनाच आता मोडकळीला आलेली आहे.
फुटबॉल किंवा क्रिकेटमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक संघामध्ये नव्या प्रकारच्या जर्सीची ब्रॅंड न्यु डिझाईन लॉंच केली जाते.
संघ तोच.
खेळाडू तेच.
प्रत्येक मौसमात अवतार मात्र नवा असतो.
कारण प्रेक्षकांना शर्टपॅंटचे नवे जोड विकायचे आहेत.
चाहत्यांना सामन्याला जाताना मागच्या वेळीचा शर्ट घालताना लाज वाटते.
सर्वजण त्यांच्याकडे गरीब आहे असा दृष्टिकोन टाकतील म्हणून तो आपल्या आवडत्या संघासाठी नवी जर्सी आनंदाने खरेदी करतो.
भारतात कमी असले तरी विदेशांमध्ये ही क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसते.
नियोजित अप्रचलनाचा आणखी एक छोटा भाऊ आहे.
तो म्हणजे *समंजस अप्रचलन* (पर्सिव्हड ऑबसोलेसेंस).
यामध्ये तुमची कार आता जुनी झाली आहे, पर्यायाने तुम्ही आऊटडेटेड झाले आहात असे तुमच्या मनावर बिंबवण्यात येते.
जाणूनबुजुन आणि प्रयत्नपुर्वक तुमच्या वापरात असलेल्या जुन्या वस्तूंविषयी तुमच्या मनात उदासीनता आणि न्युनगंड निर्माण केला जातो.
एखादी वस्तू विकत घेतली नाही तर तुमचे व्यक्तिमत्व अधुरे अपुर्ण आहे असे जाहिरातींच्या माध्यमातून सुप्त मनावर पुन्हा पुन्हा ठसवले जाते.
साधे भोळे आणि खोट्या प्रतिष्ठेपायी या चतुर लोकांनी रचलेल्या जाळ्यात अलगद अडकतात.
स्वतःला उच्चशिक्षित मानणारा सुजाण श्रीमंत वर्ग या कंपन्यांच्या तावडीत सापडतो आणी आवश्यकता नसताना कधी मजबुरीने नवी खरेदी करतो.
त्यांना वारंवार सांगितल्या गेलेल्या उत्पादनांची ते आज्ञा पाळल्यासारखी निमूटपणे खरेदी करतात.
कधी दिखावा करण्यासाठी, कधी छाप पाडण्याच्या नावाखाली, कधी स्वतःचा अहं पोसण्यासाठी, कधी स्टेटस मेंटेन करण्याच्या नावाखाली अव्याहत खरेदी सुरुच असते.
कोणतीही नवी खरेदी करण्याआधी मला या वस्तूची खरंच तीव्र गरज आहे का याचा समग्र विचार करण्याची त्यांची आकलनशक्तीच त्यांनी हळूहळू गमावलेली असते.
लठ्ठ पगार कधीही एकटा येत नाही.
येताना तो चंगळवादालाही सोबत घेऊन येतो.
नवश्रीमंतांच्या बाबतीत तर हे हमखास घडते.
महागड्या ठिकाणी पार्ट्यांना जाणे.
आधी भरपुर वाढून घेणे आणि नंतर जात नाही म्हणून ताटात तसेच अन्न टाकून देणे ही याचीच लक्षणे असतात.
आर्थिक सुबत्ता असूनही ज्याने संयम गमवला नाही आणि जो सत्व पाळू शकला तोच खरा भाग्यवान.
वस्तूंना रुपयां-पैशात तोलणारी माणसं खरी कर्मदरिद्री.
ती बनवण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती, त्याच्या निर्मितीसाठी घेतले गेलेले कष्ट या सर्वांचे मोल ज्याला समजले तो खरा सुजाण...
बिजनेस माईंडच्या चतुर पण मुठभर लोकांनी पर्यावरणाचा बट्ट्याबोळ केला आहे.
स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी उभ्या जनतेला आणि त्यासोबत निसर्गाला त्यांनी स्वतःच्या दावणीला बांधले आहे.
श्रीमंत लोकांच बरं आहे.
ते फक्त पैसे देऊन किंमत चुकवतात.
गरीब लोक आपलं आयुष्य देऊन अप्रचलनात बळी जातात.
जल-प्रदुषण, भु-प्रदुषण आणी हवा-प्रदुषणाचे सर्वात गंभीर परिणाम त्या देशातील दारिद्र्यरेषेवर झगडणाऱ्या नाजुक नाशवंत लोकसंख्या घटकावरच होतो.
हे बदलायला हवे.
तुम्ही तयार आहात का?
प्रत्येक खरेदी सजगपणे करा.
वापरा आणि फेकाच्या गोंडस सापळ्यात अडकू नका.
अप्रचनलाचे नवे बळी
बनू नका...!!
पवित्र खाद्य
🤘टाईमपास गुरूजीः- सांगा मुलांनो, जगात सर्वात पवित्र खाद्य कोणते ?
?
बराच वेळ झाला, कोणीच उत्तर दिले नाही....
शेवटी बंड्या उठला आणि म्हणाला, "सर, मी सांगू ?"
गुरूजीः- सांग बरे !!
बंड्याः- *तंबाखु* ....
कोणत्याही *दिवशी* चालते,
*एकादशीला* चालते,
*द्वादशीला* चालते,
कोणत्याही *सणाला* चालते,
*अमावस्येला* चालते,
*पौर्णिमेला* चालते,
*सकाळी* चालते,
*रात्री* दोन वाजताही चालते,
*३६५ दिवस अहोरात्र*
चालते,
किती ही *पवित्र* वस्तू
आणि *कुणाचीही* चालते, शिवाशिव नाही,
*अंत्यसंस्काराच्या* वेळीही
चालते व *जन्मावेळीही* चालते. हिला खायला केंव्हाच बंधन
नाही,अगदी जगन्मान्य,
जातपात नाही, धर्म नाही,
चोळून खातात, मळून देतात,
चुना लावून खातात,
भाग्यवान वनस्पती आहे हो !!
पैशापेक्षा जास्त जपतात
आणि न विसरता खिशात
घेतात.
सगळे विसरतील पण *तंबाखु* विसरणार नाहीत.
समोरच्याला वेळ देणार नाही पण *तंबाखु* खाण्यासाठी कोपर्यात जाऊन मळणार.
अतिप्रिय खाद्य.
९०० रूपये किलो आहे हो ही !!
*काजूपेक्षा* महाग पण गरीबातला गरीब खातो.
काजू कधी खिशात ठेवतो का ?
नाही.
पण ही खिशातल्या आतल्या कप्प्यात राहते. अगदी *हृदयाला* कवटाळून असते.
नाही का ?
उद्या शाळेत बंड्याचा सत्कार समारंभ आहे !!! सर्वांनी या ....
😀😀😀😀
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
