Sunday, 21 August 2022

कौशल्य विकास

 उद्धर ग्रामस्थांच्या कौशल्याला वाव देणार

आमदार अतुल भातखळकर यांचा विश्वास

मुंबई, दि. 18 ऑगस्ट (प्रतिनिधी)

          खोपोली परिसरातील उद्धर गाव आणि परिसरातील खेड्या, पाड्यातील ग्रामस्थांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी कौशल्य विकास योजनेतून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. उद्धर येथे आ. भातखळकर यांच्या हस्ते परिसरातील पाच गावांमधील ग्रामस्थांना प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती देण्यात आल्या. स्व. शैलजा दत्तात्रय भातखळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. भातखळकर म्हणाले, उद्धर आणि परिसरातील गावांमधील ग्रामस्थांमध्ये असलेल्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे. त्यांच्याकडील विविध क्षेत्रात असलेले कौशल्य सर्वांपुढे आले पाहिजे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे. भविषयातही या परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवून ग्रामस्थांना जास्तीत जास्त मदत करू. यावेळी उद्धर आणि परिसरातील पाच गावातील ग्रामस्थांना प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती देण्यात आल्या. यावेळी हरी शेट्टी, प्रदीप लांगी, घोसाळकर, पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.      

Saturday, 20 August 2022

वैद्यकीय महाविद्यालय

 येत्या दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावीत.

                                           उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला वैद्यकीय शिक्षण विभागाचा आढाव

               मुंबई, दि. 20: राज्यातील प्रत्येकाला चांगल्या आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात यावीत यादृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने तयारी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

               वैद्‌यकीय शिक्षण विभागाच्या प्रकल्पांना आशियाई विकास बॅंकेमार्फत (एशियन डेव्हल्पमेंट बँक) वित्त सहाय्य आणि आंतरराष्ट्रीय वित्तिय संस्थे(इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशन)सोबतची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिश महाजन, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, वित्तचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, केंद्र शासनाच्या क्षमता बांधणी आयोगाचे सदस्य तथा प्रशासक प्रवीणसिंह परदेशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वित्त व नियोजन विभागाच्या सचिव शैला ए., वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव श्रीकर परदेशी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे आणि इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

               उपमुख्यमंत्री म्हणाले की, वैद्यकीय सुविधा निर्मितीसाठी सन 2030 पर्यंतचा आराखडा विभागाने तयार केला आहे. मात्र त्यापूर्वी चांगल्यात चांगल्या सुविधा, अति विशेषोपचार, आरोग्य सेवा उपलब्ध करण्याचे धोरण असले पाहिजे. यानुसार पहिल्या टप्प्यात वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण आणले आहे. यानुसार इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशनच्या मदतीने प्राथमिक टप्प्यात नागपूर येथे सुपरस्पेशलिटी, तसेच संभाजीनगर आणि लातूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. सार्वजनिक खाजगी भागिदारी तत्वावर वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करताना ते काम वेळेत पूर्ण होईल. तसेच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना याठिकाणी लागू होणे आवश्यक आहे.

               राज्य शासनाने निवडलेल्या जिल्ह्यातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम आणि कार्यान्वयन आणि संबंधित रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी आशियाई विकास बँकेची आर्थिक आणि तांत्रिक मदत घेण्यात येणार आहे. या संस्थांनी राज्य शासनाला पूर्ण सहकार्य करुन अर्थपुरवठा लवकर करावा, जेणेकरुन या महाविद्यालयांच्या उभारणीचे काम येत्या सहा ते सात महिन्यात सुरु होईल, याबाबतचे नियोजन करण्यात यावे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

               शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये तृतीयक वैद्यकीय सेवेची उपलब्धता सुधारणे, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय रुग्णालय उभारण्यावर भर देऊन वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध करणे आणि शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण यांच्या आधारे सक्षम मानवी संसाधनाची उपलब्धता सुधारणे यावर येत्या काळात भर देण्यात येईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

हवामान बदल आणि पूरस्थिती नियंत्रणासाठी राज्य शासनास मदत करण्याची आशियाई विकास बँकेची तयारी

               गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती वारंवार निर्माण होत आहे. ही परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी पूराच्या पाण्याचे नियोजन तसेच गेल्या काही वर्षांपासून होत असलेले हवामान बदलावरील उपाययोजना याबाबत आशियाई विकास बँक महाराष्ट्र शासनाला मदत करणार आहे. आशियाई विकास बँक आता वैद्यकीय शिक्षण शिवाय जलसंपदा विभागाबरोबरही विविध विषयावर एकत्रितपणे तांत्रिक अभ्यास करणार आहे. यापूर्वी आशियाई विकास बँकेने आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ या राज्यांत काम केले असून त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्रालाही होणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

               आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी आणि इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे संबंधित विषयाबाबतचे सादरीकरण केले.

0000


 


 


 



Statrt up

 मुंबईत शनिवारी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा

 

            मुंबईदि. 18 : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 20 ऑगस्ट2022 रोजी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई शहर परिसरातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजक उमेदवारांनी या यात्रेत सहभाग नोंदवावाअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रविंद्र सुरवसे  यांनी केले आहे.

            मुंबई शहरामध्ये 20 ऑगस्ट2022 रोजी स. 10.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत मुंबई विद्यापीठफोर्टएच.आर.कॉलेज व चर्चगेटहिंदुजा कॉलेजचर्नीरोडआणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी सादरीकरण होईल. स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करणाऱ्या प्रतिभागीपैकी जिल्ह्यातून अव्वल 3 विजेते घोषित केले जातील. जिल्हास्तरीय पारितोषिकाचे स्वरूप प्रथम रु. 25 हजारद्वितीय रु. 15 हजार आणि तृतीय रु. 10 हजार असे राहिल. तसेच सर्वात्तम 10 (अव्वल 3 विजेत्यांसह) सहभागींना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळेल.

            महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व नवउद्योजक हे जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या प्रत्यक्ष ठिकाणी किंवा www.msins.in या संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करू शकतात. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (022) 22626303 या दुरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहनश्री. सुरवसे  यांनी केले आहे.

            राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत "महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण-2018" जाहिर करण्यात आले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअपच्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करून त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरीता तसेच राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्यरोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत संपूर्ण राज्यात "महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे" आयोजन करण्यात आले आहे.

00000

इरशाद बागवान/विसंअ/18.8.22


Govinda


 

पुरस्कार

 दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 18 : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून सन २०२१ व २०२२ या वर्षांसाठी दिव्यांग व्यक्तींकरीता राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २८ ऑगस्ट, २०२२ पर्यंत आहे.

            अर्ज, नामांकने www.awards.gov.in या संकेतस्थळावरुन भरण्याचे आवाहन दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून करण्यात आले आहे.

            राष्ट्रीय पुरस्कार २०२१ व २०२२ करिता दि. २८ ऑगस्ट २०२२ पूर्वी प्राप्त अर्ज, नामांकने विचारात घेण्यात येतील. सन २०२१ आणि सन २०२२ करिता स्वतंत्ररित्या अर्ज, नामांकने केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या URL.www.awards.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करुन विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

            पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावरील मार्गदर्शक सूचनांनुसार विचारात घेण्यात येतील, असे दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी कळविले आहे.

सावधान

 जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी करणाऱ्याफसव्या संकेतस्थळांबाबत सावध रहा.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन.

            मुंबई, दि. 18 : जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी करणाऱ्या फसव्या, बनावट संकेतस्थळांबाबत नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालयाचे उपसंचालक तथा उपमुख्य निबंधक जन्म व मृत्यू महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

            भारत सरकारच्या अधिकृत मूळ संकेतस्थळांची नक्कल करुन CRSORGIGIGOOVI.IN, CRSRGIIN, BIRTHDEATONLINE.COM अशा काही फसव्या, बनावट संकेस्थळांच्या माध्यमातून समाजकंटकांद्वारे नोंदण्या केल्या जात आहेत. ही संकेतस्थळे अधिकृत मूळ संकेतस्थळांसारखीच आहेत. नागरिकांकडून जन्म - मृत्यू प्रमाणपत्रांसाठी रक्कम घेतली जात आहे. नागरिकांनी अशा संकेस्थळांवर जन्म – मृत्यू घटनांची नोंदणी करु नये.

            जन्म – मृत्यू नोंदणीसाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, शहरी भागात मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, कार्यकारी अधिकारी, कटक मंडळे (कॅन्टोनमेन्ट बोर्ड), शासकीय आरोग्य संस्थेचे प्रमुख (जर घटना शासकीय आरेाग्य संस्थेत घडली असेल तर) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००००

Covid

Continue.  गृहभेटीद्वारे (हर घर दस्तक) शंभर टक्के लसीकरणाचे प्रयत्न.

•कोविड १९ लसीकरण कमी असलेली गावे, तालुके, वॉर्ड याबाबत माहिती संकलीत करुन प्राधान्याने त्या गावातील लसीकरण सत्रांचे आयोजन.

• जिल्हा, मनपा तसेच तालुकास्तरावर टास्क फोर्स बैठकांचे आयोजन

•सुक्ष्मकृती नियोजन आराखड्याच्या मदतीने लसीकरण सत्रांचे आयोजन व अंमलबजावणी

• लसीकरण सत्रांची संख्या वाढविण्यासोबतच लाभार्थ्यांना सोईच्यावेळी सत्रांचे आयोजन

•कोविन प्रणालीचा सहाय्याने ड्यूलिस्टचा वापर (दुसरा डोस राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी) करुन प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे पाठपुरावा

•’हर घर दस्तक’ अभियानांतर्गत घरोघरी जाऊन लसीकरण झालेल्या व्यक्तीची माहिती घेत लसीकरण राहिलेल्या व्यक्तींचा पाठपुरावा. लाभार्थ्यांना लसीकरण सत्राच्या ठिकाणी नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था

•व्यापक प्रमाणात लसीकरणाबाबत जनजागृती तसेच इतर विभागांचा लसीकरणात सक्रिय सहभाग.

मिशन कवच कुंडल

राज्यात ८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत विशेष कोविड लसीकरणासाठी ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी गावांगावांमध्ये तसेच शहरी भागात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. लसीकरणाच्या दिवशी लाभार्थीना बोलविण्यासाठी गावातील स्वयंसेवक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती यांना जबाबदारी देण्यात आली. ८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत या मोहिमेच्या माध्यमातून नागरीकांना १ कोटी २३ लाख मात्रा देण्यात आल्या.

मिशन युवा स्वास्थ अभियान

            सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ‘मिशन युवा स्वास्थ’ उपक्रम सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कोविड १९ लसीकरण सत्र राबविण्यात आले.या दरम्यान राज्यात एकूण २३२ महाविद्यालयांमध्ये २ हजार ५८० लसीकरण सत्र आयोजित करुन विद्यार्थ्यांना १ लाख ८ हजार मात्रा देण्यात आल्या.

हर घर दस्तक अभियान

• ‘हर घर दस्तक’ अभियान ८ नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ अखेर संपूर्ण राज्यात राबविण्यात आले. १८ वर्षे व त्यावरील वयोगटातील लाभार्थ्यांचे पहिला डोस शंभर टक्के पूर्ण लसीकरण होईल याचे नियोजन करण्यात आले. ज्या नागरिकांचा लसीकरणाचा पहिला तसेच दुसरा डोस राहिला आहे, अशा नागरिकांना या मोहिमेअंतर्गत घरोघरी जावून आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे कोविड १९ लसीकरणाची माहिती देण्यात आली व त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येऊन नजीकच्या लसीकरण केंद्रात लसीकरण करण्यात आले. हर दस्तक या अभियानात ८ नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ अखेर ७१ लाख ६१ हजार ५४९ पहिली मात्रा आणि ८५ लाख २५ हजार ८५१ नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली.

हर घर दस्तक अभियान २.०

            हर घर दस्तक अभियान २.० हे १ जून ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत राबविण्यात आले. १२ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासोबतच तुरुंगातील कैद्याचे कोविड लसीकरण आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना वर्धित मात्रा मोहिमेअंतर्गत घरोघरी जावून आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे कोविड १९ लसीकरणाची माहिती घेण्यात आली. प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येऊन घरीच किंवा नजीकच्या लसीकरण केंद्रात लसीकरण करण्यात आले. १२ ते १८ वयोगटास पहिली मात्रा ३ लाख ३२ हजार ६४०, दुसरी मात्रा – ४ लाख २१ हजार ७४ तर १८ वर्षावरील दुसरी मात्रा ९ लाख २७ हजार ७७७, ६० वर्षावरील वर्धित मात्रा ९ लाख ९५, हजार १३९ नागरिकांना देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी दृष्टिक्षेपात

            आरोग्य कर्मचारी -१२ लाख ९५ हजार ६८८ पाहिली मात्रा, ११ लाख ९५ हजार ७२ दुसरी मात्रा तर ५ लाख १ हजार २५७ कर्मचाऱ्यांना वर्धित मात्रा देण्यात आली.

            फ्रंट लाईन वर्कर-२१ लाख ५० हजार २६६ पहिली मात्रा, २० लाख १० हजार ८२९ दुसरी मात्रा तर ७ लाख ७३ हजार २ फ्रंट लाईन वर्करना वर्धित मात्रा देण्यात आली.

            १२ ते १७ वर्षे वयोगटामध्ये ६८ लाख १३ हजार ३१० पहिली मात्रा, ४६ लाख ३७ हजार ८४४ मुलांनी दुसरी मात्रा घेतली आहे.

            १८ ते ५९ वर्षे वयोगटात ६ कोटी ७७ लाख ४३ हजार ६९ नागरिकांनी पहिली मात्रा, ५६ कोटी ५ लाख १६ हजार ६८० नागरिकांनी दुसरी तर ३३ लाख ५४ हजार ३७७ नागरिकांनी वर्धित मात्रा घेतली.

            ६० वर्षे व त्यावरील नागरिक या गटात १ कोटी ३३ लाख ८९ हजार ७२१ नागरिकांनी पहिली, ११ कोटी ५ लाख, ३१ हजार १८ नागरिकांनी दुसरी तर २७ लाख ११ हजार १४० नागरिकांनी वर्धित मात्रा घेतल्याची नोंद आहे.

            लसीकरणामध्ये हेल्थ वर्कर ४२ टक्केफ्रंट लाईन वर्कर ३९ टक्के१८ ते ५९ वर्षे वयोगट ७ टक्के६० वर्षे व त्यावरील नागरिक २७ टक्के नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे.

            डॉ.सचिन देसाई-महाराष्ट्र राज्य लसीकरण अधिकारी-कोरोना नियंत्रणासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण होणे आणि दोन्ही मात्रा घेतलेल्यांनी लशीची वर्धित मात्रा घेणे आवश्यक आहे. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेस चांगले सहकार्य केले आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी गाफील राहून चालणार नाही. कोविड लसीकरणाच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊन लशीची वर्धित मात्रा घेऊन कोरोनावर पूर्णपणे मात करुया!

 

संकलन

जिल्हा माहिती कार्यालय पुणे


Featured post

Lakshvedhi