Tuesday, 19 July 2022

नियमावली शुल्क

 गेट वे ऑफ इंडिया परिसरात आयोजित कार्यक्रमासाठी

नियमावली आणि शुल्क निर्धारण निश्चित.

               मुंबई, दि. 18 : मुंबई शहराचे मानचिन्ह असलेले गेट वे ऑफ इंडिया हे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे अ गटात असलेले राज्य संरक्षित स्मारक आहे. या स्मारकाच्या परिसरात शासकीय विभाग, खाजगी आणि गैरशासकीय संस्था यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमाकरिता पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नियमावली आणि शुल्क निर्धारण निश्चित करण्यात आले आहे.

            भारतीय सेना दल, हवाई दल आणि नौदलामार्फत कार्यक्रम सादर करण्यात आल्यास कार्यक्रमाचे आणि प्रकाशयोजनेचे कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच पोलीस व निमलष्करी दल यांच्यामार्फतही कार्यक्रम असल्यास कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. शासकीय विभागाचा कार्यक्रम असल्यास प्रत्येक दिवशी कार्यक्रमासाठी 50 हजार रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस 10 हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अव्यावसायिक/स्वयंसेवी संस्था तसेच धर्मादाय संस्थेने कार्यक्रम आयोजित केल्यास प्रत्येक दिवशी कार्यक्रमासाठी 1 लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस 50 हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. व्यावसायिक कार्यक्रम व्यवस्थापन संस्थेने कार्यक्रम आयोजित केल्यास प्रत्येक दिवशी कार्यक्रमासाठी 5 लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस 1 लाख रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विदेशी दुतावासामार्फत आयोजित केला असल्यास कार्यक्रमासाठी 1 लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस 10 हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

            शासकीय विभाग आणि धर्मादाय संस्था/स्वयंसेवी/सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला असल्यास कार्यक्रमासाठी 1 लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस 10 हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. शासकीय विभाग आणि व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला असल्यास कार्यक्रमासाठी 2 लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस 1 लाख रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.विदेशी दुतावास आणि व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला असल्यास कार्यक्रमासाठी 2 लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस 1 लाख रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

            सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मान्यतेने पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक यांनी परवानगी जारी केल्यानंतरच मुंबई पोर्ट ट्रस्ट, सहायक आयुक्त प्रशासन, कुलाब्यातील वाहतूक पोलीस मुख्यालय, भायखळ्याच्या मुंबई फायर बिग्रेडचे उपमुख्य अधिकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ए वार्ड अधिकारी यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे आवश्यक असून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील.

            कार्यक्रमाच्या नियोजित तारखेच्या कमीत कमी 21 दिवस आधी अर्ज संचालनालयास प्राप्त होणे आवश्यक आहे. अर्ज उशीरा प्राप्त होऊन नियोजित तारीख उपलब्ध असल्यास 1 लाख रुपये इतके जलद शुल्क आवेदकांना भरावे लागतील. शासकीय आस्थापनांचे आणि दुतावासांचे अर्ज 15 दिवस आधी संचालनालयास प्राप्त होणे आवश्यक आहे. जाहिराती व व्यावसायिक प्रसिद्धी

चौकशी

 पुण्यातील शाळकरी मुलीवरील अत्याचाराच्या घटनेबाबतत्वरित चौकशी आणि कार्यवाहीचे निर्देश

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

            मुंबई, दि. 18 : कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत कसोशीने तपास करून आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना पुण्याचे पोलीस आयुक्त यांना आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.


            या अनुषंगाने वाहतूक पोलीस व पुणे परिवहन विभाग यांनी संयुक्तरित्या स्कूल बसेसमध्ये नेमण्यात आलेले परिचारक ,वाहनचालक व मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी करावी. या नेमणुकाबाबत काय कार्यवाही झाली, याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत.

            भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून राज्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागात व शालेय बस वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे तसेच प्रत्येक बसमध्ये महिला परिचारक नेमणे याबाबत माहिती देण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी या पत्राद्वारे परिवहन विभागाला दिले आहेत. स्त्री आधार केंद्राच्यावतीने या पीडीतेची विचारपूस करण्यासाठी सामाजिक कार्यकत्यांनी तिची आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासह पोक्सो अॅक्टअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


०००

पाऊस

 वर्धा जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी १३६ मि.मी. पाऊस


            मुंबई, दि. 18 : राज्यात वर्धा जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी १३६ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे.

           कोंकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५.९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहे. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात हा दिनांक ३०.०७.२०२२ पर्यंत सकाळी ०६ वा. पासून ते सायंकाळी ०७ वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आलो असून, सायंकाळी ७ वा. ते सकाळी ६ वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे.

         नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ११३ मिमी एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. लक्ष्मी बॅरेज (मेडीगडा) चे सर्व ८५ दरवाजे उघडले आहेत.

        गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

         वर्धा जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १३६.४ मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या बचावाकरिता एनडीआरएफ (NDRF) टीम व दोन एसडीआरएफ (SDRF)च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्य:स्थ‍िती

      राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आत्ता पर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आत्ता पर्यंत अति वृष्टीमुळे १०५ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १८९ प्राणी दगावले आहेत.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

              मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर -१,रायगड- महाड- १, ठाणे-२,रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२,सातारा-१,सिंधुदुर्ग-१, गडचिरोली -१ शा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ ,वर्धा-२ अशा एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी ७ तुकड्या

       मुंबई -३, पुणे-२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ

राष्ट्रपती निवडणूक




राष्ट्रपती निवडणूक 2022

मतपेटी सीलबंद करुन वाहनाद्वारे मुंबई विमानतळाकडे रवाना.

            मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र विधानभवनातील सेंट्रल हॉल येथील मतदान केंद्रात आज राष्ट्रपती निवडणूक 2022 साठीची निवडणुक प्रक्रिया सायंकाळी 5 वाजता पूर्ण झाली. त्यानंतर मतपेटी (बॅलेट बॉक्स) आणि इतर आवश्यक निवडणूकविषयक साहित्य सीलबंद करुन ते सुरक्षेमध्ये वाहनाद्वारे सायंकाळी मुंबई विमानतळाकडे रवाना करण्यात आले. तेथून रात्री 9.55 वाजताच्या विमानाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतपेटी दिल्लीकडे रवाना होईल.

            यावेळी भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक अमित अग्रवाल, भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव एस. बी. जोशी, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, विधीमंडळाचे उपसचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, दोन्ही राजकीय पक्षाकडील पोलींग एजंट आमदार श्रीकांत भारतीय, आमदार डॉ. वजाहत मिर्जा अथर मिर्झा, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर आदी उपस्थित होते.

००

Monday, 18 July 2022

दिलखुलास


 

दिलखुलास

 दिलखुलास’ कार्यक्रमातमहेश नार्वेकर यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 19 जुलै व बुधवार 20 जुलै रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            मुंबईसारख्या महानगरात आपत्ती व्यवस्थापन हे आव्हानात्मक काम आहे. महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हे कार्य कसे करतो, पावसाळ्यात त्याचे काय नियोजन असते याबाबत सविस्तर माहिती संचालक श्री. नार्वेकर यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली.

महामार्ग

 खेड-भीमाशंकर’ आणि ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा.

            नवी दिल्ली दि. 18 : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ‘खेड - भीमाशंकर’ या मार्गाप्रमाणेच ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्यालाही नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

          केंद्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाची माहिती देणारा ट्विट संदेश आज श्री गडकरी यांनी केला आहे. या निर्णयामुळे एकूण ६६ कि.मी. लांबीच्या या नवीन राष्ट्रीय महामार्गामुळे बनकर फाटा, जुन्नर, घोडेगाव, तळेघर ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे खेड, आंबेगाव व जुन्नर या तीनही तालुक्यांच्या पर्यटन विकासात वाढ होईल तसेच परिसरात सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे.

महामार्गाच्या कामास लवकरच सुरुवात.

            ‘खेड- भीमाशंकर’ या मार्गाप्रमाणेच ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्याच्या बांधकामविषयक कामाचे लवकरच नियोजन करण्यात येणार असून नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील रस्ते-वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने व पर्यटनाला चालना मिळण्याच्या उद्देशाने महामार्गांच्या निर्मितीसाठी व विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याचेही श्री. गडकरी म्हणाले.

000000

Featured post

Lakshvedhi