Monday, 20 June 2022

 बालमजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठीसर्वांचा सहभाग आवश्यक

-.                                                       सुशीबेन शाह

            मुंबई, दि. 20 : बालमजूरीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण हरवते. शिक्षण घेण्याच्या वयात एकाही मुलावर मजुरीची वेळ येऊ नये. बालमजुरी प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करून “बाल मजूर मुक्त महाराष्ट्र” साठी स्वयंसेवी संस्थांबरोबरच प्रत्येक शासकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांचे योगदान या प्रक्रियेत आवश्यक असून नागरिकांचा सहभागही आवश्यक आहे, असे मत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.

          जिल्हाधिकारी मुंबई शहर, महिला व बालविकास अधिकारी मुंबई शहर आणि कामगार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिन सप्ताह सांगता समारोहाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केले होते.

            या कार्यक्रमास कोकण विभागाच्या अप्पर आयुक्त शिरीन लोखंडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ज्ञानेश्वर पाताळे, शिक्षण उपनिरिक्षक, रंजना राव, प्रथम संस्थेच्या संचालक फरिदा लांबे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य निलिमा चव्हाण, कामगार उपायुक्त निलांबरी भोसले, महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार आदी उपस्थित होते.

          सुशीबेन शाह म्हणाल्या, आपण एखाद्या शहरात बाल मजुरी विरोधी कारवाया करतो परंतू तीच मुले अन्य राज्यात किंवा जिल्हयात काम करताना आढळतात. त्यामुळे याबाबत कडक कायदेशीर कारवाई केली पाहिजे. बाल मजुरी प्रश्नाबाबत प्रभावी जनजागृतीसह, बालकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. येत्या वर्षभरात आपण बालमजुर मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न लवकरच साकार करू, असा विश्वास सुशीबेन शाह यांनी यावेळी व्यक्त केला.

             दहावी व बारावी परीक्षेत राज्यातील बालगृहातील विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविले आहे. परंतु यानंतर या मुलांचे पुढे काय होते. त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बालमजूरी मुले का करतात त्यांच्या पालकांशी त्या मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे. यासाठी बालकांच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे, असेही सुशीबेन शाह यावेळी म्हणाल्या.

          सचिव ज्ञानेश्वर पाताळे म्हणाले, बाल कामगार मुलांना शिक्षणाकडे वळविले पाहिजे. अशासकीय संस्थांची यासाठी मदत घ्या. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदेशीर सहाय्य व सल्ला देण्यात येईल.

          अपर आयुक्त शिरीन लोखंडे म्हणाल्या, बाल कामगार विरोधी दिन सप्ताह आपण साजरा केला, याचे फलित आपण लोकांपर्यंत पोहोचलो. आपण या मुलांशी बोलले पाहिजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.

            यावेळी बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी , अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.

            दि. 12 जून ते 20 जून या कालावधीत बाल कामगार विरोधी दिन सप्ताह राबविण्यात आला, या सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात आले याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालविकास विभागाच्या विधी सल्लागार सविता ठोसर यांनी केले तर आभारआय.जे.एम. संस्थेच्या क्लेफा परमार यांनी मानले.

00





     विधान परिषद निवडणुकीत २८५  सदस्यांनी केले मतदान

 

          मुंबईदि. २० : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज विधानभवन येथे पहिले मतदान हरिभाऊ बागडे यांनी केले. दुपारी ४.०० वाजेपर्यंत एकूण २८५ सदस्यांनी मतदान केल्याचे मतदान अधिकारी यांनी जाहीर केले.

 

०००००००


 यंदा आषाढी वारी पालखी सोहळ्यात होणार संविधानाचा गजर;


सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम.

            पुणे, दि. 20 :- कोविड विषयक निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडलेली 'ज्ञानोबा-तुकोबांची' पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात देहू-आळंदी वरून पंढरी कडे प्रस्थान करणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अभिनव संकल्पनेतून यावर्षी पालखी सोहळयात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषा बरोबरच संविधानाचा देखील गजर करण्यात येणार आहे.

            पालखी प्रस्थानाच्या वेळी आळंदी येथून पालखी सोबतच संविधान दिंडी आयोजित करण्यात आली असून दि. 21 जून रोजी आळंदी येथून निघणारी ही संविधान दिंडी पालखी मार्गावर सर्वत्र संवैधानिक मूल्यांचा गजर भजन - कीर्तन, अभंग आदींच्या माध्यमातून करत 10 जुलै रोजी पंढरपूर येथे पोचणार आहे.

अशी असेल संविधान दिंडी :

            दि. 21 जून रोजी आळंदी येथील चऱ्होली फाटा येथे दुपारी 3 वा. या दिंडीचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येईल. या दिवशी सायंकाळी संविधान जलसा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            दि. 22 रोजी संविधान दिंडी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे येथे मुक्कामास येईल, या दरम्यान राज्यातील नामवंत विचारवंत, सांस्कृतिक कलावंत, भजनी मंडळ आदींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेतले जातील.

            दि. 23 (गुरुवार) रोजी पालखी मुक्काम स्थळाजवळ नाना पेठ येथे ‘संविधान जलसा’ हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ज्येष्ठ चित्रपट कलाकार तथा विचारवंत नसिरुद्दीन शहा, निलेश नवलखा, शबाना आझमी, नागराज मंजुळे, रत्नाकर पाठक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

            दि. 24 जून रोजी पासून ते दि. 10 जुलै पर्यंत पालखी सोहळ्यामध्ये संविधान दिंडी संमिलित होऊन, त्यामधून ठिकठिकाणी संविधान जलसा, संविधानावर व संविधानातील मूल्यांवर आधारित प्रवचने कीर्तने, सप्तखंजिरी कीर्तन आदी उपक्रम सुरू राहतील. त्याचबरोबर ठिकठिकाणी संविधान उद्देशिका वाचन व वाटप, अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांबाबत जागृती, संविधानातील हक्क व कर्तव्ये तसेच विविध परिशिष्ट, कलमे आदींचे डिजिटल सादरीकरण, ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून लोकसंवाद, वृक्षारोपण, योजनांच्या माहितीच्या घडी पत्रिकांचे वाटप इत्यादी उपक्रम संपूर्ण वेळ राबवले जाणार आहेत.

            दि. 24 जून ते 10 जुलै पालखी सोहळा व संविधान दिंडी पालखीच्या ठरलेल्या मुक्काम मार्गावर मार्गक्रमण करत जाईल व पालखी दरम्यान पायी दिंडीत तसेच मुक्कामाच्या ठिकाणी वरील उपक्रम राबविण्याचे नियोजन बार्टी मार्फत करण्यात आले असून या संविधान दिंडीचा 10 जुलै रोजी पंढरपूर येथे समारोप होणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

संवैधानिक मूल्यांचा गजर - धनंजय मुंडे

            महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी लाखो भाविक वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देहू-आळंदी येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संमिलीत होतात. देशाचे संविधान देखील आपल्या संतांनी दिलेल्या समता, बंधुभाव व सामाजिक न्याय या मूलतत्वांवर आधारित आहे. आजच्या पिढीला आपल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी, देशाचे नागरिक हे जबाबदार असावेत, या उद्देशाने लाखो भाविकांच्या 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' या जयघोषाच्या निनादात निघणाऱ्या पालखी सोहळ्यात यावर्षी संविधान दिंडी आयोजित करण्यात येत आहे. 

            पालखीच्या या संपूर्ण प्रवासात हरिनाम घोषासह संवैधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश यानिमित्ताने देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 



घरटे माझे तुझ्या अंगणात


 

 


 



Ghat रस्ता

 *कोकण कशेडी घाट बायपास कोकणातील सर्वात मोठा बोगदा माननिय श्री नितीन गडकरी रोड,ट्रान्सपोर्ट-हायवे,केंद्रीय मंत्री यांच्या प्रयत्नाने*👇🏻🌸👇🏻🌸👇🏻


Featured post

Lakshvedhi