Wednesday, 18 May 2022

फणसाचा राजा

 मंडळी नमस्कार ,

      हरिशचंद्र देसाई यांच्या झापडे येथील बागेला दिलेल्या भेटीत उलगडला गेला तो  एका अवलीयाचा शासकीय कर्मचारी (एक्सरे टेक्निशियन) ते फणसकिंग असा थक्क करणारा प्रवास.

      एक शेतकरी वयाच्या 55 व्या वर्षी फणस लागवडी चा निर्णय घेतो.खर तर हे निवृत्तीचे वेध लागणारे आणि नातवंडाच्यात रमण्याचे वय. पण हा माणूस या वयात देश-विदेशातील फणसाच्या जातीचा अभ्यास करतो, त्या बहुतांश फणसाच्या जातीची रोप मिळवतो..

अश्या 70 ते 80 प्रकारच्या फणसाच्या जातीची 3000 हजार फणसाची झाडे आपल्या झापडे येथील 13 एकर जागेत लावतो.

     बर, एवढ करून एखादा माणूस फणसाच्या फळाची, त्याच्यापासून मिळणा-या  उत्पनाची वाट पहात कोकणी शेतक-या सारखा निवांत राहील ना?

     पण, हा वेडा माणूस  आपल्या IAS ची परिक्षा देत असलेल्या मुलाला चक्क नोकरीचा नाद सोड सांगतो. त्याला  जॅकफ्रुट इंटरनॅशनल परिषदेला घेऊन जातो.मुलाचे मन परिवर्तन करण्यात यशस्वी होतो. आणि मुलाच्या साथीने महाराष्ट्रातील जॅकफ्रुटकिंग म्हणून आपले आणि कोकणचे नांव जगाच्या नकाशावर आणतो.

     बर, हा फणसाच्या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस मग जगाला फणस लागवडीचे पर्यावरण विषयक , आरोग्य विषयक फायदे पटवून देतो.उभ्या महाराष्ट्रात फणस लागवड शेतक-यानी करावी म्हणून फणसाची रोपे तयार करतो.अशी हजारो रोपे विदर्भ , मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्राला पुरवतो.

     आता यंदा ह्या माणसाने साठी पार केली तुम्ही म्हणाल आता शेतकरी म्हणून याने क्षितीज गाठलय आता स्वतःला सिद्ध करायचे काय बाकी राहीलय ?

      पण,संतुष्ट रहाणे म्हणजे जणू शरीराला जडलेली व्याधी असा ह्या माणसाचा पक्का समज असावा.

       म्हणून हा हिमाचल प्रदेशला जातो तेथील दर्जेदार सफरचंदाची रोपे आणतो आणि आपल्या नर्सरीत लावतो मशागत करतो आपल्या 900 काजू झाडांच्या मधे सफरचंदाची यशस्वी लागवड करून दाखवेन असे छातीठोकपणे सांगतो. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि देहबोलीतला आत्मविश्वास 

आपली खात्री पटवते.

      शेतीत अभिनव प्रयोग करणे आणि ते  यशस्वी करून दाखवण्याचा छंद जडलेला हा वल्ली एक दिवस जंगल साफ करायला घेतो आणि ठरवतो यातील एकही जंगली झाड मी तोडणार नाही पण यातून उत्पन्नही मिळवेन.

 हा याचा आणखीन एक संकल्प..!  या झाडांवर ( नैसर्गिक स्टीक वर)मी काळीमिरी ( ब्लॅकपेपर ) च्या वेली सोडेन, मी येथे कृषी पर्यटन करेन. हे त्यांचे आत्मविश्वासपूर्वक बोलणे ऐकल्यावर, जिद्दाला सलाम करणे एवढ एकच काम आपल रहात.

         फणस हेच भविष्यात माणसाचे अन्न असेल असे तत्वज्ञान सांगून हा माणूस थांबत नाही तर पिकलेल्या फणसापेक्षा कच्चा फणस माणसाची भुक भागवेल.. असा सिद्धांत मांडत .आपल्या बागेत  फणासा पासून कुरकुरित चिप्स बनवायचा प्लॅन्ट टाकतो. .फणसापासून बिर्याणी ते कबाब , पकोडा ते डोसा आणि आईस्क्रीम ते मिठाई आणि असेच अन्य खाद्यपदार्थ कसे बनवता येतील याचा ध्यास घेऊन माहीती घेत रहातो...

    पुरूषाचे नशीब पाते-यात  अशी एक जूनी म्हण आहे. ती म्हण हा माणूस सिद्ध करण्यासाठी जणू इरेला पेटला आहे की काय ? हे यांच्या शेतीतील कारवाया ऐकून / पाहून वाटते....चक्क फणसाची हिरवी पाने हा माणूस टनच्या टन विकतो.

आंतरराष्ट्रीय कंपनीची चालून आलेली पार्टनरशीप.. बघू नंतर म्हणून टाळतो.तर दुसरीकडे.. काजूच्या झाडांचा पालापातेरा, जो कधीच कुजत नाही  त्याचे हा खत म्हणून तयार करायच्या मागे लागतो...ही खत निर्मीती भविष्यात फक्त हाच माणूस करू शकेल कारण हा शेतीमधला एडीसन आहे.  

     कल्पवृक्ष कन्येसाठी च्या ऐवजी हा सासू-सास-यांना फणस द्या म्हणतो आणि फणस देखील कसा बहुगुणी आहे सांगत  सासुरवाडी कडून आणलेल्या फणसाच्या जाती पासून देसाई कप्पा नावाची फणसाची नवी जात विकसीत करतो आणि थेट कल्पवृक्षांच्या माहेरघरात केरळात जाऊन विकतो. 

       समस्या , अडचण हे शब्द या माणसाला कुठल्याही शिक्षकाने शिकवले नसावेत किंवा हा त्या दिवशी वर्गात गैरहजर असावा यावर मी ठाम आहे. अहो माकडांचा बंदोबस्त असो गव रेड्यांचा उच्छाद असो यामाणसाकडे जालीम ( रामबाण नको संवेदनशील आहे ) उपाय या माणसाकडून जाणून घ्यावा.

 बर, तांत्रिक समस्या म्हणाल तर त्यात हा टेक्निशियनचा बाप.हजारो मिटर विद्युत वहन विना घट कसे करावे हे प्रात्यक्षिकासह तुम्हाला दाखवून देतो..

      एवढ्याने स्तंभित होऊन जाऊ नका, तुम्हाला हा माणूस फणासाची पिकलेली पिवळी पान विकत घ्यायला लावणार आहे.... अठळा बदामच्या भावात विकणार आहे आणि फणसाचा समानार्थी शब्द हरिशचंद्र देसाई असा तुमच्या

शब्दकोषात बदल करायला भाग पाडणार आहे.

       खर सांगतो एखाद्या फळझाडावर वेड्यासारखं प्रेम करणारी अशी व्यक्ती मी उभ्या आयुष्यात @57 मी पाहिलेली नाही.

       या साठ वर्षाच्या तरुणाला तारूण्य , उर्जा, जिद्द, आत्मविश्वास ईश्वर मुक्त हस्ते प्रदान करेल यात शंका नाही. कारण, फणसाशी ईमान राखणारा हा 

फणस राजा हरिशचंद्र या वरदानास पात्र आहे.  

- प्रदीप कोळेकर

संस्थापक , माय राजापूर


 भेसळयुक्त चहा पावडर जप्तअन्न व औषध प्रशासनाची कारवाई

            मुंबई दि. १७ : शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्न पदार्थाचा ८५ हजार २४० रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे.

            शिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनमंत कुंभारे यांना दि १४ मे २०२२ रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मे ए आर एम ट्रेडर्स ३८, तळमजला, रामगड हटमेंट, शिवडी मुंबई १५ या ठिकाणची तपासणी केली. चहा पावडर या अन्नपदार्थास खाद्यरंग लावून विक्रीसाठी साठा केला असल्याचा आढळला तसेच खाद्यरंग आढळून आला. हा साठा सकृतदर्शनी भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तेथून चहा पावडर व खाद्यरंग या अन्नपदार्थाचे अन्न नमुने घेवून उर्वरित ४२९ किलोग्रॅमचा चहा पावडरचा साठा किंमत ८५ हजार २४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत .

            संबंधित हजर व्यक्ती , पेढीमालक यांचे विरुद्ध शिवडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देण्यात आलेली आहे. ही कारवाई म.ना.चौधरी, सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई व एस.एस.जाधव, सहायक आयुक्त (अन्न), परिमंडळ ३ यांचे मार्गदर्शनाखाली ल.सो.सावळे, अन्न सुरक्षा अधिकारी, र.ज.जेकटे, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.

***


वृत्त

 सिडको प्राधिकरणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे निर्णय


· नवी मुंबई विमानतळाजवळील बांधकामांची उंची जुन्या कलर कोडेड झोनल मॅपनुसार ठेवण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे लिहिणार नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र

· सिडकोच्या 22.05 टक्के योजनेतील त्रिपक्षीय करारनामा करताना सुविधा शुल्क चार समान हप्त्यात द्यायला मंजुरी, बांधकाम मुदतवाढीच्या ना हरकत दाखल्यासाठी एकाचवेळी तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ

· नवी मुंबईतील कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन २०१९ ला लवकरच पर्यावरण विभाग देणार मंजुरी

· सीआरझेडमुळे रखडलेल्या प्रकल्पांची छाननी करून महिन्याच्या आत भोगवटा प्रमाणपत्र देणार

· सिडकोच्या मोठ्या भूखंडांवरील बांधकामासाठी अतिरिक्त ४ वर्षांचा कालावधी देण्याला मंजुरी

· सिडकोमधील प्रलंबित मावेजा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय.

            मुंबई, दि.१७– नवी मुंबईतील सिडकोच्या २२.०५ टक्के योजनेतील त्रिपक्षीय करारनामा करताना भरावयाचे सुविधा शुल्क विकासकांना चार समान हप्त्यात देण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकासकांना बांधकाम मुदतवाढीचा ना हरकत दाखला घेण्यासाठी दरवेळी वेगळा अर्ज न करता एकाचवेळी अर्ज करून तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोच्या मोठ्या भूखंडांवरील बांधकाम पूर्ण करण्यासाठी चार अतिरिक्त वर्षांचा कालावधी वाढवून देण्याला मंजुरी देण्यात आली असून, मावेजा प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

            सिडको प्राधिकरणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे निर्णय घेतले आहेत, त्यात पनवेल येथे नव्याने होत असलेल्या विमानतळाजवळच्या बांधकामांची उंची नव्या कलर कोडेड झोनल मॅपनुसार होत असल्याने २० किलोमीटरच्या संपूर्ण क्षेत्रात ५५.१० मीटर सरासरी मध्य समुद्र पातळीच्या उंचीचे निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांचा या परिसरात नव्याने होणाऱ्या विकासप्रकल्पांना मोठा फटका बसलेला असल्याने ही उंची जुन्या कलर कोडेड झोनल मॅपनुसार ठेवण्यासाठी नगरविकास मंत्री शिंदे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. 

---चौकट.

            नगरविकास विभागाने सिडको प्राधिकरणांतर्गत असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी हे सर्व निर्णय घेतले आहेत. वरकरणी जरी हे विकासकांच्या हिताचे निर्णय वाटत असले तरीही त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना आणि स्थानिक भूमिपुत्रांनाही होणार आहे. तसेच सिडकोच्या उत्पन्नात वाढ होऊन राज्याचा महसूल वाढण्याच्या दृष्टीनेही हे निर्णय उपयुक्त ठरणार आहेत. - एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

नवी मुंबई विमानतळाजवळील उंचीचे निर्बंध ठरवण्यासाठी नगरविकासमंत्री नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहिणार

            नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 20 किलोमीटर अंतरावरील कलर कोडेड झोनल मॅप निष्क्रिय करून 20 किलोमीटरच्या संपूर्ण क्षेत्रात 55.10 मीटर सरासरी मध्य समुद्र पातळीच्या उंचीचे निर्बंध काढून पूर्वी प्रकाशित केलेल्या सीसीझेडएम (कलर कोडेड झोनल मॅप) प्रमाणे उंची पुनर्संचयित करावी अशी मागणी विकासकांनी केली होती. या निर्णयाचा नवी मुंबईत होणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर मोठा परिणाम होत असल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे स्वतः याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.

मावेजा प्रकरणांचा जलद निपटारा करणार

            मावेजा ना-हरकत प्रमाणपत्राबाबत हस्तांतरण/ गहाणखत/ बांधकाम मुदतवाढ/ लीज डीड इत्यादीसाठी वसाहत 12.05% द्वारे प्रत्येक वेळी मावेजा ना-हरकत प्रमाणपत्र मागितले जाते. सदर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बराच वेळ जात असल्याचे निदर्शनास आल्याने ही प्रक्रिया जलद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (मेट्रो सेंटर), पनवेल, रायगड, ठाणे यांना बेलापूर येथे कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर कार्यालय त्याठिकाणी स्थलांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यात आले असून त्याद्वारे ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे.



 राज्य उत्पादन शुल्क विभागाला 59 नवीन वाहने

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण

            मुंबई, दि. 18 : “अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन महसूल वाढीसाठी प्रभावीपणे राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रयत्नशील राहील. यामुळे देश व राज्याच्या महसूलातही मोठी भर पडेल”, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला, या विभागाला 59 नवीन वाहने आज प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या गाड्या विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी दिलेल्या असून गुन्हा अन्वेषणातील कामगिरी उल्लेखनीय करण्यास आणि महसूल उदिष्टाची पूर्तता करण्यास त्यामुळे मदत होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

            विधानभवन समोरील वाहनतळावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन वाहनांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून व वाहनाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा-नायर सिंह, आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इदिसे, संचालक दक्षता व अंमलबजावणी श्रीमती उषा वर्मा, उपाआयुक्त सुनील चव्हाण, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            प्रधान सचिव वल्सा- नायर सिंह म्हणाल्या की, या नवीन गाड्यांच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजात नक्कीच अधिक गती येईल आणि त्याचा चांगला परिणाम होईल. या विभागात अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सऍप क्रमांकही देण्यात आले आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाईस गती आली आहे. नवीन वाहने विभागातील अधिकाऱ्यांना गुन्हा अन्वेषणातील उल्लेखनीय कामगिरी करण्यास सहाय्यभूत ठरतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            या वेळी महिंद्रा अण्ड महिंद्रा, कंपनीचे अधिकारी गुरुप्रिंतसिंग रंधावा, मारोती सुझुकीचे अधिकारी जावेद सय्यद यांनी प्रतिनिधिक स्वरूपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चावी दिली. या नवीन 59 वाहनात महिंद्रा अंड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ मॉडेलच्या 51 स्कॉर्पिओ व मारोती सुझुकी कंपनीच्या इर्टिगा 8 कारचा समावेश आहे. विभागासाठी एकूण 271 वाहने मंजूर करण्यात आली आहेत.


0000



सायली कल्पेश विवाह बंधन


 



 


 

Featured post

Lakshvedhi