मंडळी नमस्कार ,
हरिशचंद्र देसाई यांच्या झापडे येथील बागेला दिलेल्या भेटीत उलगडला गेला तो एका अवलीयाचा शासकीय कर्मचारी (एक्सरे टेक्निशियन) ते फणसकिंग असा थक्क करणारा प्रवास.
एक शेतकरी वयाच्या 55 व्या वर्षी फणस लागवडी चा निर्णय घेतो.खर तर हे निवृत्तीचे वेध लागणारे आणि नातवंडाच्यात रमण्याचे वय. पण हा माणूस या वयात देश-विदेशातील फणसाच्या जातीचा अभ्यास करतो, त्या बहुतांश फणसाच्या जातीची रोप मिळवतो..
अश्या 70 ते 80 प्रकारच्या फणसाच्या जातीची 3000 हजार फणसाची झाडे आपल्या झापडे येथील 13 एकर जागेत लावतो.
बर, एवढ करून एखादा माणूस फणसाच्या फळाची, त्याच्यापासून मिळणा-या उत्पनाची वाट पहात कोकणी शेतक-या सारखा निवांत राहील ना?
पण, हा वेडा माणूस आपल्या IAS ची परिक्षा देत असलेल्या मुलाला चक्क नोकरीचा नाद सोड सांगतो. त्याला जॅकफ्रुट इंटरनॅशनल परिषदेला घेऊन जातो.मुलाचे मन परिवर्तन करण्यात यशस्वी होतो. आणि मुलाच्या साथीने महाराष्ट्रातील जॅकफ्रुटकिंग म्हणून आपले आणि कोकणचे नांव जगाच्या नकाशावर आणतो.
बर, हा फणसाच्या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस मग जगाला फणस लागवडीचे पर्यावरण विषयक , आरोग्य विषयक फायदे पटवून देतो.उभ्या महाराष्ट्रात फणस लागवड शेतक-यानी करावी म्हणून फणसाची रोपे तयार करतो.अशी हजारो रोपे विदर्भ , मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्राला पुरवतो.
आता यंदा ह्या माणसाने साठी पार केली तुम्ही म्हणाल आता शेतकरी म्हणून याने क्षितीज गाठलय आता स्वतःला सिद्ध करायचे काय बाकी राहीलय ?
पण,संतुष्ट रहाणे म्हणजे जणू शरीराला जडलेली व्याधी असा ह्या माणसाचा पक्का समज असावा.
म्हणून हा हिमाचल प्रदेशला जातो तेथील दर्जेदार सफरचंदाची रोपे आणतो आणि आपल्या नर्सरीत लावतो मशागत करतो आपल्या 900 काजू झाडांच्या मधे सफरचंदाची यशस्वी लागवड करून दाखवेन असे छातीठोकपणे सांगतो. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि देहबोलीतला आत्मविश्वास
आपली खात्री पटवते.
शेतीत अभिनव प्रयोग करणे आणि ते यशस्वी करून दाखवण्याचा छंद जडलेला हा वल्ली एक दिवस जंगल साफ करायला घेतो आणि ठरवतो यातील एकही जंगली झाड मी तोडणार नाही पण यातून उत्पन्नही मिळवेन.
हा याचा आणखीन एक संकल्प..! या झाडांवर ( नैसर्गिक स्टीक वर)मी काळीमिरी ( ब्लॅकपेपर ) च्या वेली सोडेन, मी येथे कृषी पर्यटन करेन. हे त्यांचे आत्मविश्वासपूर्वक बोलणे ऐकल्यावर, जिद्दाला सलाम करणे एवढ एकच काम आपल रहात.
फणस हेच भविष्यात माणसाचे अन्न असेल असे तत्वज्ञान सांगून हा माणूस थांबत नाही तर पिकलेल्या फणसापेक्षा कच्चा फणस माणसाची भुक भागवेल.. असा सिद्धांत मांडत .आपल्या बागेत फणासा पासून कुरकुरित चिप्स बनवायचा प्लॅन्ट टाकतो. .फणसापासून बिर्याणी ते कबाब , पकोडा ते डोसा आणि आईस्क्रीम ते मिठाई आणि असेच अन्य खाद्यपदार्थ कसे बनवता येतील याचा ध्यास घेऊन माहीती घेत रहातो...
पुरूषाचे नशीब पाते-यात अशी एक जूनी म्हण आहे. ती म्हण हा माणूस सिद्ध करण्यासाठी जणू इरेला पेटला आहे की काय ? हे यांच्या शेतीतील कारवाया ऐकून / पाहून वाटते....चक्क फणसाची हिरवी पाने हा माणूस टनच्या टन विकतो.
आंतरराष्ट्रीय कंपनीची चालून आलेली पार्टनरशीप.. बघू नंतर म्हणून टाळतो.तर दुसरीकडे.. काजूच्या झाडांचा पालापातेरा, जो कधीच कुजत नाही त्याचे हा खत म्हणून तयार करायच्या मागे लागतो...ही खत निर्मीती भविष्यात फक्त हाच माणूस करू शकेल कारण हा शेतीमधला एडीसन आहे.
कल्पवृक्ष कन्येसाठी च्या ऐवजी हा सासू-सास-यांना फणस द्या म्हणतो आणि फणस देखील कसा बहुगुणी आहे सांगत सासुरवाडी कडून आणलेल्या फणसाच्या जाती पासून देसाई कप्पा नावाची फणसाची नवी जात विकसीत करतो आणि थेट कल्पवृक्षांच्या माहेरघरात केरळात जाऊन विकतो.
समस्या , अडचण हे शब्द या माणसाला कुठल्याही शिक्षकाने शिकवले नसावेत किंवा हा त्या दिवशी वर्गात गैरहजर असावा यावर मी ठाम आहे. अहो माकडांचा बंदोबस्त असो गव रेड्यांचा उच्छाद असो यामाणसाकडे जालीम ( रामबाण नको संवेदनशील आहे ) उपाय या माणसाकडून जाणून घ्यावा.
बर, तांत्रिक समस्या म्हणाल तर त्यात हा टेक्निशियनचा बाप.हजारो मिटर विद्युत वहन विना घट कसे करावे हे प्रात्यक्षिकासह तुम्हाला दाखवून देतो..
एवढ्याने स्तंभित होऊन जाऊ नका, तुम्हाला हा माणूस फणासाची पिकलेली पिवळी पान विकत घ्यायला लावणार आहे.... अठळा बदामच्या भावात विकणार आहे आणि फणसाचा समानार्थी शब्द हरिशचंद्र देसाई असा तुमच्या
शब्दकोषात बदल करायला भाग पाडणार आहे.
खर सांगतो एखाद्या फळझाडावर वेड्यासारखं प्रेम करणारी अशी व्यक्ती मी उभ्या आयुष्यात @57 मी पाहिलेली नाही.
या साठ वर्षाच्या तरुणाला तारूण्य , उर्जा, जिद्द, आत्मविश्वास ईश्वर मुक्त हस्ते प्रदान करेल यात शंका नाही. कारण, फणसाशी ईमान राखणारा हा
फणस राजा हरिशचंद्र या वरदानास पात्र आहे.
- प्रदीप कोळेकर
संस्थापक , माय राजापूर

No comments:
Post a Comment