Thursday, 7 April 2022

  🎈 *समाधानाची व्याख्या* 🎈

बंद पडलेली कार रस्त्यावर लावून, मी बस मधे चढलो तर खरं. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली .पुढचा एक जण सहज तेथे बसू शकत होता ....

पण त्याने ती सीट मला दिली.  

पूढच्या stop. वर पुन्हा तेच घडले. पुन्हा आपली सीट त्याने दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा घडला.बर हा माणूस अगदी सामान्य दिसत होता, म्हणजे कुठे तरी मजदूरी करून घरी परत जात असावा ,आता शेवटच्या stop. वर आम्ही सर्वच उतरलो. 

तेंव्हा उत्सुकता म्हणून मी त्याच्याशी बोललो. विचारले की प्रत्त्येक वेळी तुम्ही तुमची सीट दुसऱ्या ला का देत होता ?? तेंव्हा त्याने दिलेले उत्तर हे असे •••••

*मी शिकलेला नाही हो. अशिक्षित आहे मी .एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो . आणि ,पण माझ्या जवळ कोणाला द्यायला काहीच नाही. ज्ञान नाही , पैसा नाही.*

 *तेंव्हा मी हे अस रोजच करतो. हेच मी सहज‌ करू शकतो.*  

दिवसभर काम केल्यानंतर ‌ अजून थोड्या वेळ उभं राहणं मला जमत.

  मी तुम्हाला माझी जागा दिली. तुम्ही मला धन्यवाद म्हणाला ना त्यात मला खूप समाधान मिळाले मी कोणाच्या तरी कामी आलो ना त्याचे .•••कोणाला कायतरी दिल्याच. असं मी रोज करतो *••.माझा नियमच झाला आहे•••* आणि रोज मी आनंदाने घरी जातो.•••उत्तर ऐकून मी थक्कच झालो. त्याचे विचार. व समज बघून याला  

अशिक्षित म्हणायचे का? 

काय समजायचे ?

 कोणाकरिता काही तरी करायची त्याची इच्छा ,

••••ती पण स्वतः ची परिस्थिती अशी असताना . *•••मी कशा रीतीने मदत करू शकतो??*

त्यावर शोधलेला उपाय बघून देव सुध्दा आपल्या या निर्मीती वर खुष असेल 

.माझ्या सर्वोत्तम कलाकृती पैकी ही एक कलाकृती . 

असं दिमाखात सांगत असेल .••••••

        त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या स्वतः ला हुषार शिक्षित समजणारा मी त्याच्या समोर खाली मान घालून स्वतः चे परिक्षण करू लागलो. *किती सहज त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली.* देव त्याला नक्कीच पावला असणार..

मदत ही खूप महाग गोष्ट आहे कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात .•••••

सुंदर कपडे ,हातात पर्स , मोबाईल , डोळ्यांवर गॉगल, चार इंग्लिश चे शब्द येणे म्हणजेच सुशिक्षत का ? हीच माणसाची खरी ओळख का ?

 मोठं घर ,मोठी कार , म्हणजे मिळालेले समाधान का ?? 

 कोण तुम्हाला केंव्हा काय शिकवून जाईल????? व तुमची धुंदी उतरवेलं सांगता येत नाही .•••

   या माणसाच्या संगतीने माझे विचार स्वच्छ झाले. 

   म्हणतात ना •••

    *" कर्म से पहचान होती है इंसानों की ।*

     *वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में "।*

🙏🙏🙏🙏🙏🙏

: देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना, तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात . माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातुनच खरा कळतो.

         चांगले कर्म , चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी एक वेळेस चालेलं . पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही .

        आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत, हे फक्त दोघानांच माहीत असते ..एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा ! त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका , एक "मनाचं बालपण " आणि दुसरे "अंतःकरणातील देवपण "! हे *संपलं कि माणूस संपला !*

Wednesday, 6 April 2022

 मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा आढावा

डेब्रिज काढण्याची आणि नालेसफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

            मुंबई, दि. 6 : येत्या पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती उद्भवणार नाही, यासाठी महानगरातील सर्व राडारोडा (डेब्रिज) काढण्याची कामे आणि नालेसफाईची कामे संबंधित यंत्रणांनी 31 मे 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

            मुंबई महानगरातील पावसाळापूर्व कामांचा विशेषतः राडारोडा (डेब्रिज) व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बैठक घेण्यात आली. बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त श्रीनिवासन, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मुंबई मंडळाचे महाव्यवस्थापक शलभ गोयल, पश्चिम रेल्वेचे जीव्हीएल सत्यकुमार, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासह महानगरपालिका, एमएमआरडीए, पोलीस, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मुंबई महानगरात पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एमएमआरडीए, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पोलीस या विविध विभागांनी कामांना गती द्यावी. मुंबई महानगरात राडारोडा (डेब्रिज) तयार होण्याच्या 450 जागा असून 31 मे पर्यंत हे डेब्रिज साफ करण्याची कार्यवाही एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिकेने करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या. कांदिवली भागात मेट्रोची जी कामे सुरु आहेत, त्याठिकाणी अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यात यावी. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गामधील 47 कल्व्हर्ट तसेच मुंबई महानगरातील रेल्वे ट्रॅकवरील 40 कल्व्हर्ट स्वच्छ करुन घेण्याची कार्यवाही युद्धपातळीवर पूर्ण करुन घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाला दिले. डास, मच्छरांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यावर विशेष भर द्यावा, असे सांगून ज्या भागांमध्ये मेट्रोसह इतर सार्वजनिक कामे सुरु असतील त्या भागात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेऊन डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी संबंधित कंत्राटदारांना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले. संभाव्य वादळ, अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता उंच इमारतींवर बांधकामासाठी लावण्यात आलेल्या क्रेन्समुळे दुर्घटना घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी संबंधित विकासकांना सूचना द्याव्यात असे सांगून अतिवृष्टीच्या काळात किनारपट्टी भाग, कोळीवाड्यातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास त्यासाठी अगोदरच सुविधा उपलब्ध करुन ठेवण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

            मुंबईत पावसाळापूर्व कामांसाठी विविध विभागांनी केलेल्या नियोजनाचे आणि सुरु असलेल्या कामांचे महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी सादरीकरण केले.

००००





 

 केंद्रीय पुरातत्व विभागाने महाराष्ट्राच्या स्थळांच्या रखरखावाविषयीविधीमंडळात अहवाल सादर करावा

- डॉ. नीलम गोऱ्हे        

            नवी दिल्ली, दि. 6 : महाराष्ट्रातील एकवीरा देवी मंदीर, लेण्याद्री मंदिरासोबतच अन्य ऐतिहासिक, धार्मिक स्थळे, जी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात येतात त्यावर झालेल्या रखरखावाच्या खर्चाविषयी अहवाल विधीमंडळाच्या पटलावर पुरातत्व विभागाने सादर करावा, याबाबतचे निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केले असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

           डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले, राज्यातील जी ऐतिहासिक स्थळे, मंदिरे, स्मारके केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात येतात. इच्छा असून देखील राज्यातील जनतेला तसेच राज्यशासनाला अशा स्थळांचे नविनीकरण, सौंदर्यीकरण, डागडुजी करता येत नाही. तसेच पुरातत्व विभागाकडूनही अनेक वर्षांपासून डागडूजी होत नसल्याची शंका डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. त्यामुळे अशा स्थळांची अधिकच दुरावस्था होत चाललेली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागांतर्गत येणा-या राज्यातील स्थळांमध्ये काय काम केले आहे. याविषयी केंद्रीय पुरातत्व विभागाने विधीमंडळात अहवाल सादर करावा, याबाबतचे निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली. लोकसभा अध्यक्ष हे संबंधित विभागाला निर्देशित करतील अशी, अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राशी निगडित असणा-या धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणीभक्ती निवास’ व्यवस्था करण्याचा संकल्प

            महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पाऊलखुणा देशभर आढळतात. विशेषत्वाने मध्यप्रदेश, हरीयाणा, उत्तरप्रदेश या ठिकाणी उमटून दिसतात. अशा स्थानांवर येणा-या भाविकांची तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘भक्ती निवास’ बांधण्‍याचा संकल्प उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबांळकर यांच्या मार्गदर्शनात पुढील काळात या कामासंबधी आखणी केली जाईल अशी, माहितीही त्यांनी योवळी दिली.

आमदार अधिक प्रभावीपणे संसदीय आयुधांचा वापर करतील

            महाराष्ट्रातील जवळपास 100 आमदारांसाठी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले असून संसदीय आयुधांचा वापर आमदार अधिक प्रभावीपणे करतील, अशी अपेक्षा उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

            लोकसभा सचिवालयातील पार्लमेंटरी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसिस (PRIDE), राष्ट्रकुल संसदीय मंडळ आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील आमदारांसाठी 5 आणि 6 एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. 

            आपल्या मतदार क्षेत्रातील प्रश्न, समस्या प्रभावीपणे सदनात मांडण्यात यावे, तसेच संसदीय नियमावलीची माहितीची जाणीव व्हावी यासाठी या प्रशिक्ष‍ण शिबीराचा लाभ होईल, अशी आशा डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली. आमदारांकडून येणा-या सूचनेवरून भविष्यात विधीमंडळात देशातील उत्तम काम करणाऱ्या खासदारांची व्याख्याने आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

            मंगळवारी सकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याहस्ते या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी उपसभापती डॉ गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या.

            आजच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार, खासदार गिरीश बापट, अरविंद सावंत, वंदना चव्हाण, सत्यपाल सिंग यांची व्याख्याने आयोजित आहेत.

००००





 पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी

- उपमुख्यमंत्री अजित पवार.

• शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा.

• शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांचे उद्घाटन.

            शिर्डी, दि.०६ : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

            शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार किशोर दराडे, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस उप महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलीसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास ८६० कोटी उपलब्ध करून दिले आहेत. या निधीत पुरवणी मागण्यांद्वारे अधिक वाढ करण्यात येईल. पोलीसांसाठी ५३५ चौरस फुटांच्या साडेसहा हजार सदनिका शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही.

          पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल असे काम पोलीसांनी करू नये, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार या़नी सांगितले.

             गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस दलासोबत इतर विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. जिल्हा नियोजन मधून पोलीसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील, असेही श्री.पवार यांनी सांगितले. 

शिर्डी विमानतळ विकासासाठी १५० कोटी

            शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌. त्यातून कार्गो टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील.

            यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे.

            गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, राज्यातील पोलीसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे. राज्यातील पोलीसांना पुढील दोन महिन्यांत ६ हजार ८५३ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाने राज्य पोलिस राखीव दलामधील पोलीसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचाही निर्णय घेतला.

        कोरोना काळात पोलीसांनी रस्त्यावर येऊन चोवीस तास काम केले. गृह विभाग पोलीसांना घरे व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे‌. राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही. यासाठी काम करावे, असेही गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.

            या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात २ महिला पोलीस व १ पुरूष पोलीस अंमलदारास सदनिकेच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, कार्यकारी अभियंता सुनिल‌ सांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, हिरालाल पाटील यांनी केले.

 जलतरणपटूंना भावी उपक्रमांसाठी राज्य शासन सहकार्य करणार.

-क्रीडा मंत्री सुनील केदार.

            मुंबई, दि.6 : राज्यातील जलतरणपटूंना भावी उपक्रमांसाठी राज्य शासन आणि क्रीडा विभागाचे नेहमी सहकार्य राहील,असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

            ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत नागपूर जिल्हा हौशी जलतरण संघटना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग, सागरी साहसी जलतरण प्रशिक्षण केंद्र, जुहू बीच, मुंबई, इंडियन डायव्हर अँड एक्सप्लोरर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ओपन वॉटर स्विमिंगचा प्रसार-प्रचार करण्याच्या दृष्टीने आयोजित सागरी साहशी जलतरण अभियानाचा प्रारंभ गेट वे ऑफ इंडिया येथून झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

            क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले की, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्यातील जलतरणपटूंनी हा एक धाडसी आगळा वेगळा उपक्रम राबविला. क्रीडा क्षेत्रात युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. सहभागी सर्व जलतरणपटूंमध्ये आत्मविश्वास आहे. यामुळे गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी हे 31 कि.मी. अंतर ते वेळेच्या आधी पूर्ण करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

            यावेळी इंडियन नेव्हीचे, जिलेट कोशी, मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी,क्रीडा विभागाचे अधिकारी, नेव्हीचे अधिकारी जलतरणपटूंचे पालक उपस्थित होते. या सागरी जलतरणाचे नेतृत्व नागपूरचे आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळे यांनी केले. या देशातील सर्वात मोठे आणि पहिले सागरी जलतरण अभियान राज्याच्या क्रीडा विभाग, स्काऊट गाईड विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग तसेच मेरीटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात आले.

अभियानाविषयी अधिक माहिती

            गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी अशा अंदाजे 31 किलोमीटर अंतराच्या या अभियानाकरिता राज्यातील पन्नास जलतरणपटूंची निवड करण्यात आलेली आहे. राज्यातील दहा-बारा वर्षे वयोगटापासून ते 60 वर्षे वयोगटापर्यंतच्या जलतरणपटूंचा अभियानामध्ये समावेश आहे. या अभियानामध्ये 3 पॅरास्विमर्सची देखील निवड करण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्यातून 9 जलतरणपटूंची निवड करण्यात आलेली आहे.

             या अभियानाच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त समुद्र, स्वच्छ भारत तसेच ड्राऊनिंग प्रिव्हेन्शनचा देखील संदेश देण्यात येणार आहे.

000000


 




 


Featured post

Lakshvedhi