Wednesday, 6 April 2022

 जलतरणपटूंना भावी उपक्रमांसाठी राज्य शासन सहकार्य करणार.

-क्रीडा मंत्री सुनील केदार.

            मुंबई, दि.6 : राज्यातील जलतरणपटूंना भावी उपक्रमांसाठी राज्य शासन आणि क्रीडा विभागाचे नेहमी सहकार्य राहील,असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

            ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत नागपूर जिल्हा हौशी जलतरण संघटना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग, सागरी साहसी जलतरण प्रशिक्षण केंद्र, जुहू बीच, मुंबई, इंडियन डायव्हर अँड एक्सप्लोरर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ओपन वॉटर स्विमिंगचा प्रसार-प्रचार करण्याच्या दृष्टीने आयोजित सागरी साहशी जलतरण अभियानाचा प्रारंभ गेट वे ऑफ इंडिया येथून झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

            क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले की, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्यातील जलतरणपटूंनी हा एक धाडसी आगळा वेगळा उपक्रम राबविला. क्रीडा क्षेत्रात युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. सहभागी सर्व जलतरणपटूंमध्ये आत्मविश्वास आहे. यामुळे गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी हे 31 कि.मी. अंतर ते वेळेच्या आधी पूर्ण करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

            यावेळी इंडियन नेव्हीचे, जिलेट कोशी, मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी,क्रीडा विभागाचे अधिकारी, नेव्हीचे अधिकारी जलतरणपटूंचे पालक उपस्थित होते. या सागरी जलतरणाचे नेतृत्व नागपूरचे आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळे यांनी केले. या देशातील सर्वात मोठे आणि पहिले सागरी जलतरण अभियान राज्याच्या क्रीडा विभाग, स्काऊट गाईड विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग तसेच मेरीटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात आले.

अभियानाविषयी अधिक माहिती

            गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी अशा अंदाजे 31 किलोमीटर अंतराच्या या अभियानाकरिता राज्यातील पन्नास जलतरणपटूंची निवड करण्यात आलेली आहे. राज्यातील दहा-बारा वर्षे वयोगटापासून ते 60 वर्षे वयोगटापर्यंतच्या जलतरणपटूंचा अभियानामध्ये समावेश आहे. या अभियानामध्ये 3 पॅरास्विमर्सची देखील निवड करण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्यातून 9 जलतरणपटूंची निवड करण्यात आलेली आहे.

             या अभियानाच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त समुद्र, स्वच्छ भारत तसेच ड्राऊनिंग प्रिव्हेन्शनचा देखील संदेश देण्यात येणार आहे.

000000


 




No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi