Tuesday, 15 March 2022

 विधानपरिषद लक्षवेधी :

उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार

                                - मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

       मुंबई, दि. 14 : उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक विभागातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून पंचनामे सुरु असून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार या शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत दिली.

          याबाबतची लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी मांडली होती.

          नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाडीबुद्रुक येथील श्री. कैलास सुर्यभान कवडे या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांस 4 लाख इतकी आर्थिक मदतही करण्यात आली आहे, असेही श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

Monday, 14 March 2022

 अवैध मासेमारी रोखण्यासाठी कायदा कडक करणार

- मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख

            मुंबई, दि. 14 : कोकण किनारपट्टीतील समुद्र तसेच नद्यांच्या जल प्रदुषणातील वाढ रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. समुद्र तसेच नद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे जल प्रदूषण होऊ नये यासाठी प्रदुषणासंदर्भातील नियमावली आणखी कडक करण्यात आली आहे. त्याचबरोबर परराज्यातील मच्छिमार राज्यात येऊन मासेमारी करतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा कठोर करणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

            मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात तसेच माश्यांच्या उत्पादनासंदर्भात तक्रारी प्राप्त होताच मत्स्यव्यवसाय विभाग कार्यवाही करत असतो. सन 2019 मध्ये एक तक्रार प्राप्त झाली होती. मात्र त्या तक्रारीत काही तथ्य आढळून आले नाही. सन 2020 मध्ये 19 कंपन्यांना तसेच 2021 मध्ये 18 कंपन्यांना क्लोजअप नोटीस पाठविण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

            मच्छिमारीला कृषीचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबतचा पाठपुरावा केंद्राकडे सातत्याने करण्यात येत आहे. तसेच माशांच्या उत्पादन वाढीसाठीही विविध प्रयत्न करीत असल्याचेही श्री.शेख यांनी सांगितले.


            यासंदर्भात विधान परिषद सदस्य सर्वश्री जयंत पाटील, रमेशदादा पाटील, प्रसाद लाड, महादेव जानकर, प्रविण दरेकर, ॲड मनिषा कायंदे यांनी प्रश्न विचारला होता.

000

प्रश्न क्रमांक : 12710

टोईंग तसेच नो-पार्कींगकरिता लवकरच निश्चित कार्यपद्धती

- गृह राज्यमंत्री सतेज पाटील

            मुंबई, दि. 14 : वाहतूक शाखेमार्फत वाहनांना करण्यात येणारे टोईंग तसेच नो-पार्कींग झोनच्या वाहनांकरिता लवकरच एक निश्चित अशी कार्यपद्धती (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करण्यात येत असल्याची माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            या एसओपीमुळे टोईंग तसेच नो पॉर्किंग झोनकरिता झालेल्या दंडाबाबत सामान्य माणसाला कळण्यास मदत होईल, असे गृहराज्यमंत्री म्हणाले.

            यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य प्रविण दरेकर यांनी विचारला होता.

000

प्रश्न क्रमांक : 12113

सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात येणार

- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

            मुंबई, दि. 14 : बृहन्मुंबईतील 41 कोळीवाड्यांपैकी 31 कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून 4 कोळीवाड्यांचे सीमांकन प्रगतीपथावर आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध असल्याने सीमांकन होऊ शकले नाही. तथापि, विरोध कमी झाल्यास त्याही ठिकाणी सीमांकन करण्यात येईल तसेच कोकणपट्टीच्या सर्वंच कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत विधानपरिषद सदस्य रमेशदादा पाटील, ॲड निरंजन डावखरे, प्रसाद लाड, प्रविण दरेकर, भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

000

 भंडारा जिल्ह्यातील बेला येथील महर्षी विद्या मंदिर शाळेच्याविद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल

- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

           

            मुंबईदि. 14 :  भंडारा जिल्ह्यातील बेला येथील महर्षी विद्या मंदिर शाळेबाबत प्राप्त तक्रारीसंदर्भात कार्यवाही सुरू आहे,  याबाबत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत  दिली.

           भंडारा जिल्ह्यातील बेला येथील महर्षी विद्या मंदिर शाळेच्या गैरव्यवस्थापनाविरूद्ध शासनस्तरावरून कोणती कार्यवाही केली जात आहेलोकप्रतिनिधीव्दारे शाळेची मान्यता रद्द   करावी अशी मागणी असणारी लक्षवेधी विधानसभा सदस्य नरेंद्र भोंडेकर यांनी मांडली होती.

           शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्याभंडारा जिल्ह्यातील बेला येथील महर्षी विद्या मंदिर शाळेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची तपासणी  करू.मात्र शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये हे देखील पाहणार आहे.या शाळेबाबत स्थानिक  लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत सादर केली.

0000

 .पुणे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार

:- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

 

            मुंबई, दि. 14 : पुणे जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नाबाबत शासन संवेदनशील आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत प्राप्त निवेदनांवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.

            पुणे जिल्ह्यातील मावळ व मुळशी  तालुक्यात सहा धरणे आहेत या धरणातील पाणी  दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यास मिळाल्यास दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवाणे तसेच तलावांचे फेर सर्वेक्षण करावे अशी लक्षवेधी सूचना सभागृहात मांडण्यात आली. लक्षवेधीत विधानसभा सदस्य जयकुमार गोरे, धीरज देशमुख, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाग घेतला.

            जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, कृष्णा पाणी तंटा लवादाने प्रती जलवर्षासाठी कृष्णा खोऱ्याबाहेर पाणी वळवण्यासाठी सरासरी व महत्तम मर्यादा ठरवून दिली आहे. कृष्णा खोऱ्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता २ ऑगस्ट २०२८ अन्वये भावे समिती गठित करण्यात आली आहे. तसेच समितीच्या अहवालावर अभ्यास करून पुढील धोरण ठरविण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित केली आहे. तज्ज्ञ समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यावर कार्यवाही होईल. तसेच खडकवासला प्रकल्पांतर्गत जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या मूळ मंजूर प्रकल्पीय अहवालामध्ये एकूण ६५ तलावांचा समावेश असून त्यापैकी ४५ तलावांना सध्या पाणी सोडण्यात येते. मंजूर प्रकल्प अहवालामध्ये समावेश नाही अशा तलावांबाबत उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी क्षेत्रीय व महामंडळ स्तरावर सर्वेक्षण सुरू आहे, हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राप्त निकषानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

:- 

 चंद्रपूर जिल्ह्यातील प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी

भरती प्रक्रियेची चौकशी करणार

:- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

 

            मुंबईदि. 14 : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीची भरतीसंदर्भात प्राप्त तक्रारींची दखल घेवून चौकशी करण्यात येईल अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत  दिली.

                     चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये गैरप्रकल्पग्रस्तांची फेब्रुवारी महिन्यात प्रशिक्षणार्थी म्हणून भरती झाली असून याबाबत चौकशी करण्यात यावी अशी लक्षवेधी विधानसभा सदस्य सुभाष धोटे यांनी सभागृहात मांडली. यावेळी लक्षवेधीच्या चर्चेत विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यांनी भाग घेतला.

                        ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणालेचंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीची  कुठलीही तुकडी फेब्रुवारी महिन्यात सुरू केलेली नाही.तसेच जिल्हा पुनर्वसन अधिका-यांव्दारे देण्यात येणा-या प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्रांची संपूर्ण पडताळणी करण्यात येवून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जर कुठे अवैधरित्या दिले गेले असतील तर  तपासणी करू, यामध्ये जर कोठे गैरप्रकार आढळला तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच सध्या  प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीची निवड प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर पुनर्वसन अधिकारी यांचेमार्फत शासनाच्या विहित पध्दतीचा अवंलब करीत १२८ उमेदवारांची तात्पुरती यादी तयार करून  ३ नोव्हेंबर २०२१ रोजी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली. यावर कोणीही आक्षेप नोंदवलेला नाही परंतु नोंदणीकृत प्रकल्पग्रस्त उमेदवारांव्यतिरिक्त इतर चार व्यक्तींनी नोंदविलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमली आहे याबाबत फेर तपासणीची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे या १२८ उमेदवारांच्या तात्पुरत्या यादीस अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही, तसेच यादीची पडताळणी करण्याची कार्यवाही मुख्य अभियंता महाऔिष्णिक विद्युत निर्मिती केंद्र  चंद्रपूर यांच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.

*****

 चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन

तातडीने बांधण्यासाठी शासन कार्यवाही करणार


- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 14 :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा मौजे चेंबूर येथील भूखंड डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल फाउंडेशन या संस्थेला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ बांधण्यासाठी देण्यात आला होता. बांधकामाची प्रक्रिया पूर्ण न केल्याने फाउंडेशनचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चा करून, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवना’चे बांधकाम पूर्ण करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            बृहन्मुंबई मनपाने ३० वर्षांकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल फाउंडेशनला मौजे चेंबुर येथील भुखंड डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्यासाठी देण्यात आला होता. मात्र, अद्यापपर्यंत बांधकाम अपूर्ण असल्यासंदर्भातील लक्षवेधी विधानसभेचे सदस्य प्रकाश फातर्पेकर यांनी मांडली.

            नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. ते म्हणाले की, १९९५ मध्ये ३० वर्षांकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्यासाठी महानगरपालिकेने संबंधित भूखंड दिला होता. तीन वर्षांत हे काम पूर्ण करणे आवश्यक होते. २००९ मध्ये इमारतीच्या आराखड्यांच्या मंजूरीकरिता वास्तुविशारदाने मनपाकडे अर्ज सादर केला होता. यानंतर 2009 पासून 2014 पर्यंत आलेल्या मंजूरीसाठीच्या प्रस्तावास टप्प्या-टप्प्याने पूर्ण बांधकाम करण्याचे प्रमाणपत्र मनपाने दिले. मात्र, संस्थेच्या तांत्रिक अडचणींमुळे हे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या बांधकामाचा विषय अतिशय संवेदनशील असून, तेथील स्थानिकांना सांस्कृतिक आणि कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी या भवनचा उपयोग व्हावा यासाठी हे भवन तातडीने बांधण्यासाठी शासन कार्यवाही करणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

०००

 विलेपार्ले परीक्षा केंद्रावरील रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याच्या बातमीमध्ये तथ्य नाही

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे विधानपरिषदेत निवेदन.

            मुंबई, दि. 14 : मुंबईतील विलेपार्ले येथे रसायनयशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपद्वारे प्रसारित झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सखोल तपास करीत आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटला या बातमीमध्ये तथ्य नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.

            शनिवार, दि. १२ मार्च २०२२ रोजी इयत्ता बारावीची रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटली अशा प्रकारच्या बातम्या समाजमाध्यमात आहेत. याबाबतची वस्तुस्थिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितली. इयत्ता बारावीची प्रश्नपत्रिका एसएससी बोर्डाच्या नियमानुसार १० मिनिटे अगोदर म्हणजे १०.२० वा. प्रश्नपत्रिका वाचनासाठी वाटप करण्यात येते व प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लिखाण १०.३० वा. सुरू करण्यास सांगितले जाते. विले-पार्ले केंद्र क्रमांक ३६०१, मुंबई येथील केंद्रावर एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर १०.२४ वा. प्रश्नपत्रिकेतील काही भाग आढळून आला. या विद्यार्थीनीच्या मोबाईलमधील प्रश्नपत्रिकेच्या भागाची छाननी केली असता व्हॉट्सअॅपद्वारे काही भाग प्राप्त झाल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सखोल तपास करत आहेत. अध्यक्ष, एसएससी बोर्ड यांनी केलेल्या चौकशीनुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर म्हणजेच १०.२० वा. नंतर मोबाईलवर आढळलेली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटलेली नसून प्रश्नपत्रिकेचा काही भाग प्रश्नपत्रिका वाटप झाल्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रसायनयशास्त्र विषयाचा पेपर फुटला या बातमीमध्ये तथ्य नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री श्रीमती गायकवाड यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

००००



Featured post

Lakshvedhi