Monday, 14 March 2022

 अवैध मासेमारी रोखण्यासाठी कायदा कडक करणार

- मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख

            मुंबई, दि. 14 : कोकण किनारपट्टीतील समुद्र तसेच नद्यांच्या जल प्रदुषणातील वाढ रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. समुद्र तसेच नद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे जल प्रदूषण होऊ नये यासाठी प्रदुषणासंदर्भातील नियमावली आणखी कडक करण्यात आली आहे. त्याचबरोबर परराज्यातील मच्छिमार राज्यात येऊन मासेमारी करतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा कठोर करणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

            मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात तसेच माश्यांच्या उत्पादनासंदर्भात तक्रारी प्राप्त होताच मत्स्यव्यवसाय विभाग कार्यवाही करत असतो. सन 2019 मध्ये एक तक्रार प्राप्त झाली होती. मात्र त्या तक्रारीत काही तथ्य आढळून आले नाही. सन 2020 मध्ये 19 कंपन्यांना तसेच 2021 मध्ये 18 कंपन्यांना क्लोजअप नोटीस पाठविण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

            मच्छिमारीला कृषीचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबतचा पाठपुरावा केंद्राकडे सातत्याने करण्यात येत आहे. तसेच माशांच्या उत्पादन वाढीसाठीही विविध प्रयत्न करीत असल्याचेही श्री.शेख यांनी सांगितले.


            यासंदर्भात विधान परिषद सदस्य सर्वश्री जयंत पाटील, रमेशदादा पाटील, प्रसाद लाड, महादेव जानकर, प्रविण दरेकर, ॲड मनिषा कायंदे यांनी प्रश्न विचारला होता.

000

प्रश्न क्रमांक : 12710

टोईंग तसेच नो-पार्कींगकरिता लवकरच निश्चित कार्यपद्धती

- गृह राज्यमंत्री सतेज पाटील

            मुंबई, दि. 14 : वाहतूक शाखेमार्फत वाहनांना करण्यात येणारे टोईंग तसेच नो-पार्कींग झोनच्या वाहनांकरिता लवकरच एक निश्चित अशी कार्यपद्धती (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करण्यात येत असल्याची माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            या एसओपीमुळे टोईंग तसेच नो पॉर्किंग झोनकरिता झालेल्या दंडाबाबत सामान्य माणसाला कळण्यास मदत होईल, असे गृहराज्यमंत्री म्हणाले.

            यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य प्रविण दरेकर यांनी विचारला होता.

000

प्रश्न क्रमांक : 12113

सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात येणार

- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

            मुंबई, दि. 14 : बृहन्मुंबईतील 41 कोळीवाड्यांपैकी 31 कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून 4 कोळीवाड्यांचे सीमांकन प्रगतीपथावर आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध असल्याने सीमांकन होऊ शकले नाही. तथापि, विरोध कमी झाल्यास त्याही ठिकाणी सीमांकन करण्यात येईल तसेच कोकणपट्टीच्या सर्वंच कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत विधानपरिषद सदस्य रमेशदादा पाटील, ॲड निरंजन डावखरे, प्रसाद लाड, प्रविण दरेकर, भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi