संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचे निर्मिती प्रकल्प गतीने पूर्ण करावेत
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•पायाभूत सुविधा मुख्यमंत्री वॉर रूम बैठकीत विविध प्रकल्पांचा आढावा
मुंबई, दि, ४: महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातील अडचणी दूर कराव्यात. कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विलंबाने काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलेही नवीन काम संबंधित यंत्रणेने देऊ नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित पायाभूत सुविधा मुख्यमंत्री वॉर रूम बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस प्रकल्पांचा आढावा घेताना ते बोलत होते.
कुठल्याही परिस्थितीत पायाभूत सुविधांचे प्रकल्प हा तीन ते साडेतीन वर्षांमध्ये पूर्ण झाला पाहिजे, असे निर्देश देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, निविदा प्रक्रिया राबवताना त्यामध्ये कंत्राटदाराने मागील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लावलेल्या कालावधीच्या निकषाचाही समावेश असावा. कंत्राटदारांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विलंब केल्यास देशाचे व पर्यायाने राज्याचे नुकसान होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये होणारा विलंब खपवून घेतला जाणार नाही. प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये अनेक अडचणी असतात. मात्र यंत्रणांनी अडचणींवर मात करीत पुढे वाटचाल केली पाहिजे.
No comments:
Post a Comment