सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यातील सुमारे १३.९६ हेक्टर क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असून या प्राधिकरणात माझ्यासह सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त, तसेच आनंदराज आंबेडकर, बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी यांचा समावेश असेल. बुद्धभूमी फाउंडेशनने तयार केलेल्या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या जागतिक बुद्धभूमी धम्मकेंद्र प्रकल्प आराखड्यात ६० मीटर उंचीची जागतिक बुद्धमूर्ती, ३२ मजली भगवान गौतम बुद्ध बहुउद्देशीय थीम भवन, महाबोधी महाविहाराची प्रतिकृती, विपश्यना केंद्र, भिक्खू-भिक्खुणी प्रशिक्षण केंद्र, चिल्ड्रेन होम, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, पशु-पक्षी चिकित्सालय, कायदेविषयक सल्ला केंद्र, व्यायामशाळा आणि राष्ट्रीय महापुरुषांची स्मारके प्रस्तावित आहेत.
विशेषतः सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि आध्यात्मिक क्षेत्रांचा समन्वय साधणारा हा प्रकल्प राज्यासाठी प्रेरणादायी ठरेल. सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि बौद्ध पर्यटन यांचा संगम घडवणारा हा प्रकल्प भविष्यात महाराष्ट्राच्या विकासाचा नवा मानबिंदू ठरेल, असा विश्वास मंत्री शिरसाट यांनी यावेळी व्यक्त केला.
या संपूर्ण प्रकल्पाला आवश्यक प्रशासकीय गती देऊन विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश मंत्री शिरसाट यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment