रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील सपना वाघमारे हिने समाजातील अल्पवयीन विवाहाच्या प्रथेला नकार देत शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. कायद्याचे शिक्षण घेऊन समाजातील महिलांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार तिने केला आहे. तिच्या या जिद्दीचे आणि इच्छाशक्तीचे मंत्री आदिती तटकरे यांनी विशेष कौतुक केले.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, सपना हिला परदेशी शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी तसेच तिच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. कातकरी समाजातील मुलींसाठी तिचे यश प्रेरणादायी असून, शिक्षणाच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते, याचे ती उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
एलएलबीचे शिक्षण पूर्ण केलेल्या सपना वाघमारे हिने सांगितले की, आदिवासी महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. कामानिमित्त स्थलांतर करावे लागत असल्याने अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट राहते आणि त्यांना लवकर विवाह करावा लागतो. त्यामुळे अन्याय व अत्याचाराविरोधात त्यांना प्रभावीपणे आवाज उठवता येत नाही.
“मी त्यांच्यापैकीच एक आहे. कायद्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. महिलांनी शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी व्हावे,” अशी भावना सपनाने व्यक्त केली.
No comments:
Post a Comment