विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात
महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण
-राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई, दि. 17 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव आणि प्रतिष्ठा लक्षणीयरित्या वाढली असून ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय ध्येयपूर्तीसाठी आंतरराष्ट्रीय समुदाय, भारतीय प्रवासी आणि राजनैतिक प्रतिनिधी हे महत्त्वाचे भागीदार ठरत आहेत. याचबरोबर विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात महावाणिज्य दूतांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
बॉम्बे जिमखाना येथे गेट वे हाऊस संस्थेमार्फत आयोजित विविध देशांच्या महावाणिज्यदूतांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले की, ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब विविध देशांच्या राजनैतिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत दिसून येते. मुंबईतील कॉन्सुलर समुदाय आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून व्यापार, गुंतवणूक, सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन, व्हिसा सुविधा आणि लोकसंपर्क वाढविण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
मुंबई हे दीर्घकाळापासून जागतिक स्तरावरील महत्त्वाचे शहर राहिले आहे. महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य, नवोपक्रम व उद्योजकतेचे केंद्र; तसेच परकीय गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण म्हणून उदयास आल्याने अनेक देशांनी येथे आपली राजनैतिक आणि व्यापारी कार्यालये स्थापन केली आहेत. महाराष्ट्राने भारताच्या जागतिक संवादासाठी नेहमीच प्रवेशद्वाराची भूमिका बजावली असून विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, मंत्री, राजदूत आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांनी राज्याला भेट दिली आहे. या भेटींमुळे आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्याला चालना मिळाल्याचे राज्यपालांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment