ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजना;
सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार
- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई, दि. २५ : बारवी धरणातील जलसाठा ३५ टक्क्यांवर आल्याने ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तसेच वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजनासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषद सदस्य ॲड.निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. चर्चेत सदस्य माधवी नाईक यांनी सहभाग घेतला, त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, एमआयडीसीच्या मालकीच्या बारवी धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्याने उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
No comments:
Post a Comment