Tuesday, 2 June 2026

पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत एसटी

 पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत एसटी परिवाराने यावर्षी ‘७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प’ केल्याची माहिती देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील प्रत्येक आगार, बसस्थानक आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहे. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाची सामूहिक जबाबदारी असून ‘एक वृक्ष – एक जीवन’ हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम एसटी करणार आहे.

यासोबतच “स्वच्छ एसटी – सुंदर एसटी” ही संकल्पना अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व बसस्थानके, बसस्थानक परिसर, एसटी बसेस तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची नियमित स्वच्छता आणि टापटीपपणा राखण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देणे ही एसटीची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

महामंडळाच्या आर्थिक शिस्तीसाठी इंधन बचतीचे महत्व अधोरेखित करत मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेल बचत करण्याचा संकल्प केला आहे. छोट्या-छोट्या बचतीतून मोठी आर्थिक उभारणी शक्य होते. इंधन बचतीमुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणालाही मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi