मेंढपाळांची भटकंती थांबविण्याच्या दृष्टीने
प्रकल्प राबविण्यासाठी अहवाल सादर करावा
- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. 10 : भटकंती करणाऱ्या मेंढपाळांची माहिती संकलीत करुन त्यांची भटकंती थांबविण्याच्या दृष्टीने प्रायोगिक तत्वावर अर्धबंदिस्त पद्धतीने मेंढीपालन प्रकल्प योजना राबविण्यासाठी अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे दिले.
राज्यातील मेंढपाळांच्या भटकंती व स्थलांतराच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. कृषी मंत्री दत्ता भरणे, आमदार प्रताप अडसड, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन, पुण्यश्लोक अहिल्याबाई महाराष्ट्र मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शीतलकुमार मुकणे, अमरावती मेंढपाळ धनगर विकास मंचचे अध्यक्ष संतोष महात्मे आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री मुंडे म्हणाल्या महाराष्ट्रातील बहुतांश मेंढपाळ मेंढीपालन व्यवसायासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. त्यामुळे त्यांना शिक्षण, आरोग्य, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वैद्यकीय सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणी जीवितहानीच्या घटनाही घडतात. या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी अभ्यास अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अर्धबंदिस्त शेळी व मेंढीपालनासाठी आवश्यक पुढील उपाययोजना करण्यात येतील.
No comments:
Post a Comment