चला, पाल्यांना मराठी शाळेत घालू या!
प्रवेशासाठी जि.प.च्या शाळा निवडूया !
जून महिना उजाडला की नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागते. घराघरांत मुलांच्या शाळा प्रवेशाची लगबग सुरू होते. आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत प्रवेश द्यावा, हा प्रत्येक पालकासमोरील महत्त्वाचा प्रश्न असतो. अशा वेळी एक मराठी माणूस, एक जबाबदार पालक आणि आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणारा नागरिक म्हणून आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे – ‘आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश का देऊ नये?’
आज आपल्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम शिक्षक, आधुनिक सुविधा आणि संस्कारक्षम वातावरण यामुळे नव्या उंचीवर पोहोचत आहेत. याला आणखी उंचीवर पोहोचविण्यासाठी आवश्यक आहे तो पालकांचा विश्वास! आणि पालक म्हणून आपला सक्रिय सहभाग! केवळ अफवा आणि यंत्रणेसंदर्भातील नकारात्मक दृष्टिकोन यामुळे ग्रामीण भागातील कमी खर्चाची, योग्य गुणवत्तेची आणि संस्कार करणारी एक यंत्रणा आम्ही कमकुवत तर करत नाही ना? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत इतिहास घडवला तो जिल्हा परिषदेच्या शाळांनी या शाळांमधून आजचे उच्चपदस्थ अधिकारी, शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, कवी, लेखक, कृषी तज्ज्ञ, समाज सुधारक तयार झाले आहेत. विशेषतः मराठी माध्यमातून शिकूनही ते कुठेही गुणवत्तेत मागे पडलेले नाही. भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण आमच्या अनेक पिढ्यांनी अनुभवले आहे. अपार कष्ट, अवहेलना सहन करून अशा शाळांमधून शिक्षण घेत त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. देशातील मोठमोठ्या संस्थांवरचे गुणवान जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच तयार झाले आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या आणि विशेषतः जिल्हा परिषद शाळांच्या दारी नेण्याची हीच योग्य वेळ आहे.
No comments:
Post a Comment