सामान्य प्रशासन विभागाचे विभाजन;
माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग
सामान्य प्रशासन विभागातून माहिती व जनसंपर्क आणि राजशिष्टाचार असे दोन स्वतंत्र विभाग नव्याने निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. गत मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त कायम करताना हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता राज्याच्या ३३ प्रशासकीय विभागांच्या विभाजन- समावेशनानंतर आता स्वतंत्र असे ४६ विभाग अस्तित्वात येणार आहेत.
सध्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सामान्य प्रशासन विभागातंर्गत कार्यरत आहे. राज्य शासनाच्या प्रचार, प्रसिद्ध आणि जनसंपर्कासाठी कार्यरत या महासंचालनालयाची सात विभागीय कार्यालये आहेत. शिवाय उपराजधानी नागपूर येथे संचालक कार्यालय देखील आहे. देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे, तसेच गोवा राज्यात पणजी येथे महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून देखील शासनाच्या जनसंपर्काचे काम केले जाते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या योजना व विकास कामांसह, लोकोपयोगी उपक्रमांसाठी जाणीव जागृतीसह, प्रसिद्धीचे कामकाज चालते. महासंचालनालय मुख्यालय तसेच या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून आपात्त्कालिन परिस्थिती, ते सण - उत्सव आणि तातडीच्या परिस्थितीत शासकीय – प्रशासकीय यंत्रणेसह, माध्यम आणि नागरिकांसाठी संपर्क – संवादासाठी कार्यरत असते. स्वतंत्र विभाग निर्मितीमुळे निर्णय प्रक्रियेत आणि कामकाजात गतिमानता येणार आहे.
No comments:
Post a Comment