Thursday, 18 June 2026

तुकाई उपसा जलसिंचन योजनेची कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा

  

तुकाई उपसा जलसिंचन योजनेची कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा

- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

 

·          अहिल्यानगर जिल्ह्यातील तुकाई व भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेचा आढावा

 

मुंबई, दि. १७ : कर्जत तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ तातडीने उपलब्ध व्हावा, यादृष्टीने तुकाई उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करावीत असे स्पष्ट निर्देश देत, मिरजगाव येथील भैरवनाथ उपसा सिंचन योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव मंजूरीसाठी शासनास  त्वरित सादर करावा अशा सूचना विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिल्या.

            विधानपरिषद सभापती प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व  मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनात  या दोन योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रा.शिंदे म्हणाले, तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे वन्यजीव विभागाच्या आवश्यक त्या परवानगीसह  १५ जुलैच्या आत पूर्ण करुन या योजनेचा शुभारंभ याच दरम्यान व्हावा. तसेच कुकडी धरणातील पाण्याचा लाभ या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळावा.

 या बैठकीत तुकाई उपसा सिंचन योजनेच्या कामांची सद्यस्थिती, आर्थिक व भौतिक प्रगती, उर्वरित कामांचे नियोजन; तसेच विद्युत, यांत्रिकी आणि स्थापत्य विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यानंतर सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, कर्जत तालुक्यातील १९ गावांना पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची असून यासाठी कुकडी डाव्या कालव्यातून पाणी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प राज्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकल्पाकडे लक्ष असून, प्रकल्पासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासणार नाही. त्याअनुषंगाने प्रकल्पाशी संबंधित सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करून, जनसामान्यांना प्रामुख्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळेल यादृष्टीने सर्व यंत्रणानी समन्वय ठेवून कालबद्ध पद्धतीने काम करावे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi