ऊसतोड कामगारांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय;
चार महिन्यांसाठी बालगृहात ठेवण्यात येणार
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. २७ : ऊसतोडीसाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांतील मुलींच्या बालविवाहाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासन महत्वपूर्ण पाऊल उचलणार असून, ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कुटुंबांतील मुलींना चार महिन्यांच्या कालावधीसाठी बालगृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजना तसेच राज्य महिला आयोगाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आयुक्त जगदीश मिनियार हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, ऊसतोडीसाठी मोठ्या प्रमाणावर कुटुंबांचे स्थलांतर होत असल्याने अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहतात. काही ठिकाणी अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे प्रमाणही वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थलांतरित कुटुंबांतील मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना चार महिन्यांच्या कालावधीसाठी बालगृहात ठेवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. यामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता जपण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त कार्यालयाचे नूतनीकरण, संगणक खरेदी तसेच विभागाच्या कामकाजात अधिक परिणामकारकता आणण्यासाठी ‘टार्गेट ओरिएंटेड’ कार्यक्रमांवर भर देण्यात यावा. तसेच विविध योजनांचा सखोल अभ्यास करून त्यानंतरच निर्णय घेण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment