२५ जूनपासून ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’;
लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवावा
– पालकमंत्री ॲड.आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
- मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस 160 मान्यवराची ऑनलाईन उपस्थिती
मुंबई, दि. ३० : येत्या २५ जूनपासून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’ मध्ये सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री ॲड.आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुमारे 160 मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. तसेच बैठकीस महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच लोकप्रतिनिधी. पोलीस, महापालिका, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
बैठकीत लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक उद्याने, मैदाने, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच काही ठिकाणी अमली पदार्थांच्या वापरासंदर्भातील तक्रारी आणि सूचना मांडल्या. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. शेलार यांनी दिले. नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment