रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या शाखा ५० ठिकाणी होणार
- मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. १७ : सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने आगामी वर्षापर्यंत ५० ठिकाणी शाखा सुरू कराव्यात. तसेच या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी मिळेल अशा स्वरूपाची विद्यार्थ्यांची तयारी सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर तयार करून घ्यावी असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.
एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी मंत्री लोढा बोलत होते. या कार्यक्रमाला रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. अमित सैनी, राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकांत पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी, आयुषचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यावेळी उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण नवीन शैक्षणिक धोरणातून 'कौशल्यावर आधारित' शिक्षण देत आहोत. राज्यात मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तीन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेतून राज्यात २ लाख उद्योजक घडविणार आहोत आणि ५० हजार स्टार्टअप्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे., निवडक स्टार्टअप्सना सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राज्यातील ४१७ आयटीआयमध्ये मुख्यमंत्री महाफंड योजनेतून उद्योजक घडविण्यासाठी आयटीआयजवळ जागा उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला सन्मान यामुळे मिळेल.आपण एक कुटुंब आहोत, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शासन पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे आहे असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment