Saturday, 18 April 2026

 मिशन कर्मयोगी' मध्ये महाराष्ट्राचा राष्ट्रीय स्तरावर


'टॉप परफॉर्मिंग स्टेट' पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली, 17 : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मिशन कर्मयोगी' उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याने प्रशासकीय प्रशिक्षणात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. साधना सप्ताह २०२६ निमित्त आयोजित विशेष सोहळ्यात महाराष्ट्राला 'टॉप परफॉर्मिंग स्टेट' (उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य) या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांना प्रदान करण्यात आला.


नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित सोहळ्यात, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री तथा कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते साधना सप्ताह 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे मंत्रालय, विभाग आणि राज्यांचा सन्मान करण्यात आला. याच सोहळ्यात महाराष्ट्रातील 'यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी' (यशदा) या संस्थेला 'स्पेशल अवॉर्ड' देऊन गौरविण्यात आले. ई-लर्निंग आणि प्रशासकीय प्रशिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'यशदा'ने आयजीओटी प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून अधिकाऱ्यांना डिजिटल कौशल्यांत सक्षम केल्याबद्दल हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.


क्षमता विकास आयोग आणि 'कर्मयोगी भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान 'साधना सप्ताह' साजरा करण्यात आला. 'तंत्रज्ञान, परंपरा आणि मूर्त परिणाम’ ही यामागची संकल्पना होती. 47 लाख शासकीय कर्मचारी साधना सप्ताहमध्ये सहभागी झालें होते. 33 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी विहित केलेले चार तासांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi