सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. १६ : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानभवन येथे महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले. तसेच एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने चालक-वाहकांवरील कारवाई, आगार व्यवस्थापनातील अडचणी तसेच काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर संघाचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक चर्चा केली. कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा हीच महामंडळाची भूमिका असल्याचे यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment