राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी शुभारंभ महिला दिनानिमित्त होत आहे. 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना ‘गार्डसिल-4’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण 9 लाख 84 हजार 414 मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे.
भारतामध्ये महिलांमधील कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून दरवर्षी सुमारे 80 हजार नवीन रुग्ण आढळतात व 42 हजारांहून अधिक मृत्यू होतात. एचपीव्ही प्रकार 16 व 18 पासून संरक्षण देणारी ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. ही मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जाईल. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र शासनाच्या U-WIN या डिजिटल पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment