मोर्णा नदी पूररेषांवर पुनर्विचार; आयआयटी मुंबईकडून नव्याने सर्वेक्षण
- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. २६ : नद्यांच्या पूररेषांसंदर्भात रेड आणि ब्ल्यू लाईन निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल व वैज्ञानिक पद्धतीने केली जात असून ती कोणत्याही मानवी अंदाजावर आधारित नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल यांनी अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या रेड व ब्ल्यू लाईन संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री महाजन बोलत होते.
अकोल्यातील हरकती व सूचनांच्या पार्श्वभूमीवर या पूररेषांचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे काम आयआयटी मुंबई कडे सोपविण्यात आले आहे. ‘आयआयटी’कडून मागील २५ व १०० वर्षांतील पूरस्थितीचा सखोल व तांत्रिक अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे. संबंधित अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाईल, असे जलसंपदा मंत्री महाजन यांनी सांगितले.
भविष्यात जीवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठीच या पूररेषा निश्चित केल्या जातात, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. ब्ल्यू लाईन ही २५ वर्षांत एकदा येणाऱ्या संभाव्य महत्तम पुराच्या पातळीवर आधारित असते, तर रेड लाईन १०० वर्षांत येणाऱ्या संभाव्य महत्तम पुरासह धरणातील सांडव्यावरून होणाऱ्या महत्तम विसर्गाचा विचार करून निश्चित केली जाते, असेही त्यांनी सांगितले.
संबंधित सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या हरकतींचाही विचार करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी सदस्य ज्ञानेश्वर भारती यांनी चर्चेत सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment