वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन
मुंबई, दि. १३ : मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांना स्वायत्तता देण्यासंदर्भात सविस्तर धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
स्वायत्ततेच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख शासकीय वैद्यकीय संस्थांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन क्षमता आणि आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
समितीत टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बडवे, के.ई.एम. रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. संजय ओक, ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. तसेच महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे प्रबंधक हे समितीचे सदस्य सचिव असतील.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची सध्याची प्रशासकीय व शैक्षणिक संरचना, स्वायत्त दर्जा देण्याची आवश्यकता,संभाव्य लाभ, तसेच देश-विदेशातील यशस्वी मॉडेल्सचा अभ्यास समिती करणार आहे. यामध्ये एम्स, पीजीआय चंदीगड आणि टाटा मेमोरिअलसारख्या संस्थांच्या व्यवस्थापन पद्धतीचा आढावा घेण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment