सिकलसेलमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला वेग; ५९.६२ लाखांची तपासणी पूर्ण
– आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि.५ : राज्यातील सिकलसेल या आनुवंशिक आजाराविरुद्ध सुरू असलेल्या अभियानाला वेग देण्यात आला असून आतापर्यंत ५९ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित तपासणी १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर म्हणाले की, सिकलसेलमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने मिशन मोडमध्ये काम सुरू केले आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान आदिवासी बहुल जिल्ह्यांतील आमदारांसोबत बैठक घेऊन स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून त्याअंतर्गत ‘अरुणोदय’ अभियान सुरू करण्यात आले आहे.
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, १५ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या मोहिमेत ० ते ४० वयोगटातील ७३.८४ लाख व्यक्तींची तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ५९.६२ लाख व्यक्तींची तपासणी पूर्ण झाली असून त्यात १,७१४ सिकलसेल रुग्ण आणि २८,३९८ सिकलसेल वाहक आढळले आहेत. अभियानापूर्वी व नंतर एकत्रितपणे राज्यात २२,६८८ सिकलसेल रुग्ण आणि २,०८,९५२ वाहकांचे निदान झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment