पोलीसांना मालकी हक्काची घरे देण्याबाबत सकारात्मक भूमिका
- गृहराज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. २४ : राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्याच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असून यासाठी विविध स्तरांवर नियोजन सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.
पोलीस गृहनिर्माण महामंडळामार्फत पोलीसांना मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात सदस्य आदित्य ठाकरे यांनी अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले. या चर्चेत सदस्य अमिन पटेल, सुनील जामसूतकर यांनीही सहभाग घेतला.
श्री. कदम म्हणाले की, पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून, विशेषतः मुंबईत सुमारे ४० हजार घरे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे २० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी सुमारे ६ हजार कोटी रुपये शासन देणार असून उर्वरित निधी कर्जाच्या स्वरूपात उभारला जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस वसाहतींचा पुनर्विकास करण्यावरही भर देण्यात येणार आहे. यासाठी ‘पोलीस हाऊसिंग टाउनशिप’ ही संकल्पना राबविण्यात येत असून, ३० जानेवारी २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या टाउनशिपमध्ये केवळ घरे नव्हे, तर शाळा, रुग्णालये आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.
No comments:
Post a Comment