बाजारपेठेची स्थिरता कृषी विकासाची किल्ली
· संस्थात्मक वित्तीय संरचनेद्वारे एआय फॉर अॅग्रीला गती देणारे ‘ट्रस्ट इंजिन’ या परिसंवादात तज्ज्ञांचे मत
· कृषी क्षेत्रात शासनाची भूमिका, सक्षम बाजारपेठ आणि व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण साधनांची गरज
मुंबई, दि. 22 : कृषी क्षेत्रात शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यासोबतच बाजारपेठ मजबूत राहणेही गरजेचे आहे. उत्पादनाचे प्रमाण, अधिशेष आणि अपयश याबाबत बाजारातून मिळणारे संकेत हे शेकडो वर्षांपासून कृषी व्यवस्थेचा अविभाज्य भाग राहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठेची स्थिरता ही कृषी विकासाची किल्ली असल्याचे मत संस्थात्मक वित्तीय संरचनेद्वारे एआय फॉर अॅग्रीला गती देणारे ‘ट्रस्ट इंजिन’ या परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले.
‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ अंतर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर अॅग्री २०२६) आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेतील संस्थात्मक वित्तीय संरचनेद्वारे एआय फॉर अॅग्रीला गती देणारे ‘ट्रस्ट इंजिन’ या परिसंवादात सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक संजीव डी. रोहिल्ला, अॅक्यूमनचे सहयोगी संचालक (पोर्टफोलिओ) पराग सभलोक, नेदरलँड्स दूतावासच्या कृषी सल्लागार श्रीमती मॅरियन व्हॅन शायक यांनी सहभाग घेतला. या परिसंवादाचे समन्वयक म्हणून अन्न व कृषी संघटना (एफएओ) चे वरिष्ठ धोरण सल्लागार रमन आहुजा यांनी संवाद साधला. कृषी व अन्नप्रणाली विषयक चर्चासत्रात शासनाची निर्णायक भूमिका, सक्षम आणि सशक्त बाजारपेठेची आवश्यकता तसेच कृषी क्षेत्रातील जोखमींचे व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला.
जगातील सुमारे निम्मी लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी कृषी-अन्न प्रणालीवर अवलंबून असल्याने ती विविध नैसर्गिक व आर्थिक जोखमींना सामोरी जाते. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर या जोखमी अधिक तीव्र होण्याची शक्यता असते. त्यामुळे जोखीम व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक व तांत्रिक साधने विकसित करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. या प्रक्रियेत शासकीय उपक्रम, गुंतवणूकदार आणि उद्योजक यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
चर्चेदरम्यान दक्षिणेतील देशांच्या कृषी क्षेत्रातील अनुभवांचा उल्लेख करताना वर्तन बदलाची गरज अधोरेखित करण्यात आली. केवळ धोरणात्मक उपाय पुरेसे नसून मूल्यसाखळीतील सर्व घटकांमध्ये मानसिकतेत बदल आवश्यक आहे. उद्योजक दृष्टीकोन, वित्तीय उत्पादनांची नव्या पद्धतीने रचना आणि गुंतवणुकीची तयारी या बाबींवर भर देण्यात आला. बँकिंग व्यवस्थेतही अधिक सक्रिय आणि परिणामाभिमुख दृष्टिकोन आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता या बदलाला चालना देऊ शकते, मात्र ती डिजिटल व भौतिक या दोन्ही माध्यमांचा समन्वय साधणारी असावी, असेही नमूद करण्यात आले. मानवी स्पर्श आणि प्रत्यक्ष संवाद यांचे महत्व कायम असल्याचे सहभागी तज्ञांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment