छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले
· युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन
मुंबई, दि. 12 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्वीकारले.
यूनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात आलेल्या भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास मंत्री ॲड.शेलार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी 11 जुलै 2025 रोजी, यूनेस्कोच्या 47व्या अधिवेशनात, ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पॅरिस येथे स्वीकारले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण, सुरक्षित शासनव्यवस्था आणि लोककल्याण, यासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी हा भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जातो.
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी असा 12 किल्ल्यांचा समूह “जागतिक वारसा स्थळ” म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी 2025 मध्ये मंत्री ॲड. शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते. आता प्रत्यक्ष मानांकन-पत्र मिळाले आहे.
No comments:
Post a Comment