Saturday, 20 December 2025

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी,pl share

 महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी

 -राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 19: महानगरपालिका निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याकरिता आणि आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी. त्याचबरोबर सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुसज्ज ठेवावीत आणि मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यादृष्टीने आतापासूनच काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेच्या तयारीसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची आज दूरचित्र संवादाच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगातील विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, भरारी पथकांच्या माध्यमांतून आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी पुरेशा मनुष्यबळाची व्यवस्था करावी; तसेच कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलीस यंत्रणेसोबत समन्वय साधावा. त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित प्रभागांचे नकाशे, प्रभागातील जागानिहाय आरक्षण, नामनिर्देशनपत्र व शपथपत्राचे नमुने, इतर आवश्यक अधिकारी/ कर्मचारी, आवश्यक साहित्य इत्यादींची त्वरित व्यवस्था करण्यात यावी. मतदारांना सहज व सुलभरित्या मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रांवर किमान सेवा- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शक्य असलेल्या ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे किंवा पिंक मतदान केंद्रांची उभारणी करावी.

सचिव काकाणी यांनी बैठकीत सादरीकरण केले. महानगरपालिकेसंदर्भातील अधिनियम व राज्य निवडणूक आयोगाचे विविध आदेश यासंदर्भात त्यांनी तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले की, उमेदवारांच्या यादीतील आणि मतपत्रिकांवरील उमेदवारांच्या नावांचा क्रम राज्य शासनाने महानगरपालिका निवडणूक नियमात केलेल्या सुधारणेनुसार लावावा. निवडणूक चिन्ह वाटपासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या 5 मे 2025 रोजीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरिता महानगरपालिका आयुक्त यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधावा.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi