कुडाळमधील आंब्रड सारमाळे धरणाच्या कामात
अनियमितता आढळल्यास कारवाई करणार
- मंत्री संजय राठोड
नागपूर, दि. 13 : कोकणासह राज्यातील सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या पाटबंधारे प्रकल्पांची विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार कोकणातील सर्व प्रकल्पांसह कुडाळमधील आंब्रड सारमाळे धरण प्रकल्पाला विलंब का झाला याची तत्काळ चौकशी करून अनियमितता आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंब्रड सारमाळे धरण प्रकल्पाबाबत सदस्य निलेश राणे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता.
याविषयी मंत्री राठोड म्हणाले की, आंब्रड सारमाळे धरणाच्या माती काम प्रगतीपथावर असून सुमारे ८० टक्के पूर्ण झाले आहे. घळ भरणीचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पास 2022 मध्ये सुप्रमा देण्यात आली. परंतू अद्याप प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. या विलंबाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून चौकशीत काही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यात येईल.
धरण प्रकल्पांच्या मापदंडांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून मापदंडात सुधारणा झाल्यानंतर कोकणात अधिक प्रकल्प मार्गी लागतील, असेही मंत्री श्री.राठोड यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment