एसटी महामंडळ नवीन आठ हजार बस खरेदी करणार
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
नागपूर, दि. १० :- एसटी उत्पन्नाचे साधन नाही तर राज्यातील ग्रामीण भागापर्यंत प्रवासी वाहतूक सेवा देणारे माध्यम आहे. राज्यातील जनतेला दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आठ हजार नवीन एस.टी. बसेसची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यात तीन हजार आणि दुसऱ्या टप्प्यात पाच हजार बसची खरेदी केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सदस्य सचिन अहिर यांनी विधान परिषदेत या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी ही माहिती दिली. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, श्रीकांत भारतीय,भाई जगताप, अनिल परब, प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत आणि सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले, राज्यात बससेवेची वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. तीन हजार बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून पाच हजार बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच येत्या पाच वर्षात टप्प्या टप्प्यात २५ हजार बसेस खरेदी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment