संवादातून, सर्वांच्या सहभागातून समृद्ध राज्य साकारणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
25 हजार सरपंचासोबत मुख्यमंत्र्यांनी साधला ऑनलाईन संवाद
मुंबई, दि.17 : सरपंच संवाद हा ‘क्यूसीआय’ने तयार केलेला प्लॅटफॉर्म, देशभरातील सरपंचांचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. आज त्याच्यावर पंचवीस हजार सरपंचांसोबत एकावेळी आपण संवाद साधत आहोत ही अभिनंदनीय बाब आहे. या संवादातून ग्रामविकासात आलेली प्रगल्भता लक्षात येते. अशा सशक्त संवादातून निश्चितपणे आपण समृद्ध राज्य आणि समृद्ध देश तयार करू ,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी आयोजित क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया द्वारा तयार केलेल्या ‘सरपंच संवाद’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर राज्यातील तब्बल २५ हजार सरपंचांनी ऑनलाईन सहभाग नोंदवत मुख्यमंत्र्यांसोबत थेट संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी , भारतीय गुणवत्ता परिषदेच्या नियामक मंडळ सदस्य हिमांशु पटे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, यांच्या सह अन्य संबंधित उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्राम विकासाशिवाय राज्याचा व देशाचा विकास होऊ शकत नाही. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत ग्रामविकासाला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या ग्रामसमृद्धीच्या संकल्पनेतील समृद्ध आदर्श गाव निर्माण करण्यासाठी गावाच्या विकासकामांमध्ये लोकसहभाग आणि नेतृत्व या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरणा-या आहेत.
गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच हे परिवर्तनकर्ते आहेत. गावाचे नेतृत्व सरपंच करतात. त्यामुळे सरपंचांची थेट निवडणूक ही परिवर्तनाची मोठी पायरी ठरल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाच्या योजना गावात पोहचवून गावांचा विकास करण्याचे काम सरपंच करतात. सरंपचांनी शेतकरी, महिला, बालक, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि महिला बचत गटांसाठी केंद्र-राज्य सरकारने दिलेल्या निधीचा सर्वोत्तम उपयोग करावा. कारण विविध योजना, अभियानातून गावांमध्ये मूलभूत काम उभे करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जलयुक्त शिवार अभियानात राज्यात झालेले उल्लेखनीय काम ज्यामध्ये या योजनेने केवळ पाणी साठवणूक करत जलसंधारणाचेच काम केले नाही तर जलयुक्त शिवार अभियानातून गावात नेतृत्व, सामूहिक शक्ती यातून किती मोठ्या प्रमाणात परिवर्तन करता येते याची प्रचिती लोकांना आली. या अभियानाने शेतीतील प्रगतीची नवी दिशा दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सगळ्या गावांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. राज्यातील प्रत्येक गाव स्मार्ट ग्राम बनवण्याचा संकल्प व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फायबर नेटवर्कनंतर आता स्टारलिंकच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी गावापर्यंत दिली जाईल. स्मार्ट उपकरणांमुळे उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment