सौर पंप योजनेत महाराष्ट्राचा लवकरच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
सौर पंप योजना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत असून, जागतिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड महाराष्ट्राच्या नावावर होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “दिवसा पंप आणि रात्री घराला मोफत वीज – अशा खर्च बचतीच्या संकल्पना आता वास्तवात येत आहेत.
शासन नैसर्गिक शेतीची संकल्पना मिशन म्हणून राबवणार असून उत्पादन खर्च कमी करत शेतीला शाश्वत करण्यावर भर देत आहे.
राज्य सरकार दरवर्षी ₹५,००० कोटी कृषी क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे कारण शेतीत गुंतवणूक केल्यावरच शेतीची उत्पादकता, आर्थिक लाभ वाढवता येणार असून महिला बचत गट, फूड प्रोसेसिंग, ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण, शेतरस्ते, सौरग्राम, मूल्यशिक्षण अशा विविध योजनांच्या यशस्वी व्यापक अंमलबजावणीमुळेच खरा विकास शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
क्यूसीआय, व्हीएसकेसी आणि अनुलोम यांच्या माध्यमातून गावांना प्रशिक्षण, तांत्रिक मदत आणि उत्कृष्टतेची संधी मिळत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की, गुणवत्ता हीच खरी विकासाची गुरुकिल्ली आहे. विविध अभियान,स्पर्धा यांच्या माध्यमातून सरपंचांना नेहमी स्पर्धात्मक मोडमध्ये ठेवून प्रत्येक गावाला समृद्ध बनवण्याचा संकल्प सर्वांच्या सहभागाने यशस्वी करत समृद्ध महाराष्ट्र घडवू, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
उल्लेखनीय काम करणा-या सरपंचांसोबत संवाद साधून मुख्यमंत्री यांनी यावेळी सर्व सरंपचांचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामविकास, शेती, जलसंधारण, महिला सबलीकरण आणि स्मार्ट गाव या विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
००००
No comments:
Post a Comment