माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण
ठाणे, दि. २५ (जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने वाटचाल करत समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करणे, हेच राज्य शासनाचे धोरण आहे. दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू केलेली चळवळ कोणीही थांबवू शकत नाही. माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी आणि अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट येथे दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वन मंत्री गणेश नाईक, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप तसेच मोठ्या संख्येने माथाडी कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी संघटन उभे केले. आपल्या समाजातील लोकांच्या हितासाठी, माथाडी कामगारांच्या विकासासाठी, व्यवस्था उभारण्यासाठी आपले घर-संसार पणाला लावणारे नेते इतिहासात कमीच आढळतात. त्यापैकी दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील एक होते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या कामगारांना चांगले राहणीमान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी चळवळ सुरू केली. या चळवळीला त्यांनी संघटित स्वरूप दिले. अण्णासाहेबांच्या त्यागामुळे आणि प्रयत्नांमुळे माथाडी कामगारांना आवाज मिळाला, सुरक्षा मिळाली आणि पुढील पिढ्यांना स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळाला.
No comments:
Post a Comment