ती’ च्या सक्षमीकरणासाठी...आणखी एक पाऊल
राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना
राज्य शासन महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत विविध सामाजिक व आर्थिक योजनांची अंमलबजावणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने आदिवासी महिलांच्या सशक्तीकरणासाठी 'राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण' योजना सुरू केली आहे.
राणी दुर्गावती नाव हे भारतीय इतिहासात शौर्य, पराक्रम व दूरदृष्टीच्या प्रशासनासाठी आदराने घेण्यात येते. राणी दुर्गावती या आदिवासी समाजातील गोंड वंशाच्या अत्यंत पराक्रमी राणी होत्या, मोगलांशी करण्यात आलेल्या संघर्षात स्त्रीशक्तीचे प्रतिक म्हणून आजही त्यांच्या कार्यासाठी त्यांना स्मरणात ठेवले जाते. त्यांच्या गौरवशाली इतिहासाला स्मरण करत आपल्या देशातील अनेक राज्यांनी त्यांच्या नावाने कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत.
‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेंतर्गत वैयक्तिक महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी ५० हजार रुपयापर्यंतचे अनुदान दिले जाते. त्याचबरोबर सामूहिकरित्या व्यवसाय सुरु करण्यासाठी म्हणजेच, महिला बचत गट किंवा सामूहिक गटांना व्यवसाय सुरु करण्यासाठी ७.५ लाख पर्यंतचे अनुदान या योजनेद्वारे दिले जाते.
महिलांना स्वावलंबी बनविणे, त्यांना व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि समाजातील आर्थिक-सामाजिक प्रगतीत त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळणार आहे.
No comments:
Post a Comment